२६ जानेवारीला ओबीसीही मुंबईत येणार !
मुंबई – मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला उत्तर म्हणून आता ओबीसी (अन्य मागासवर्गीय) समाजानेही २६ जानेवारीला मुंबईत येण्याचे नियोजन चालू केले आहे. मेळावे, सभा, जनजागृती या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत केले जात आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
जरांगे यांनी सरकारवर दबाव आणण्यापेक्षा, सरकार काय करू शकते आणि काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे. त्यानुसार आपली भूमिका ठरवायला पाहिजे, असा सल्ला बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून मुंबईत आमरण उपोषण केले जाणार आहे. यासाठी लाखो मराठा आंदोलकांना घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. ‘‘राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला जी.आर्. हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून याच जी.आर्.च्या आधारे ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. एवढे लोकं ओबीसी असतील, तर हा ओबीसींवर अन्याय आहे. हा जी.आर्.रहित करावा. नव्याने देण्यात आलेल्या कुणबी नोंदी रहित कराव्या.’’