मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांनी स्वतः येऊन चर्चा करावी ! – जरांगे

सरकार सकारात्मक आहे, साहाय्य करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

आंदोलनकर्ते जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोणावळा (जिल्हा पुणे) – मराठा समाज आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासमवेत २५ जानेवारी या दिवशी झालेली चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांची २५ जानेवारीला पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोचले होते. आंदोलकांशी चर्चा करून त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू, असे जरांगे यांनी त्या वेळी सांगितले; परंतु अखेरीस ही चर्चा निष्फळ ठरली.

जरांगे पुढे म्हणाले की, जर-तरला अर्थ नाही. निर्णय झाला तर ठीक अन्यथा ‘चलो मुंबई’ यासाठी आम्ही सिद्ध आहे. निर्णय झाल्यावर आम्ही पुढे जाणार नाही. विशेष म्हणजे ओबीसीमधूनच्या आरक्षणावर स्वत: ठाम असल्याचेही जरांगे यांनी या वेळी सांगितले.

२ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी रांजणगाव गणपति येथे जरांगे यांची भेट घेतली होती. त्या वेळी पहाटे ४ वाजता चर्चेला आरंभ झाला होता. जरांगे यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यावर निर्णय घेण्यासाठी २५ जानेवारीला पुन्हा राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला आले होते.

आम्हाला तोडगा काढायचा आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी यावे आणि आमच्याशी चर्चा करावी. आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. हे शिष्टमंडळ नाही. अधिकारी आले होते. त्यांनी पत्रक दिले आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुंबईकरांचे हाल होऊ नयेत म्हणून तोडगा काढावा. आम्हाला सरकारला सहकार्य करायचे आहे. लोणावळा येथे थांबवल्यावर जरांगे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते बोलत होते.

जरांगे पुढे पत्रकारांना म्हणाले की, चर्चा करायला आलेल्यांनी माहिती आणली नव्हती. काही अधिकृत नाही. मी प्रामाणिक आहे. बंद दाराआड मी चर्चा केली नाही. त्यांनी मला नोटीस दिली आहे. माहिती देण्यासाठी सरकारी अधिकारी भेटले. पुन्हा काही जण चर्चा करण्यासाठी येतील. वाटेत आम्ही चर्चा करू.

लोणावळा येथे आल्यावर पत्रकारांनी जरांगे यांना बरेच प्रश्न विचारले. त्या वेळी ते म्हणाले की, सरकारला आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागतील, त्या केल्या तर आम्ही परत फिरू. सरकार आणि प्रशासनातील बडे अधिकारी परत चर्चेला येणार आहेत. आम्ही मुंबईच्या दिशेने चालत आहोत. रस्त्यात एखादे घर किंवा उपाहारगृह येथे त्यांच्याशी चर्चा केली जाईल.

 

 


मनोज जरांगे यांच्या मोर्चेकर्‍यांना नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून येण्यास अनुमती नाही !

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे २४ जानेवारीला लोणावळा येथे पोचले. मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या मुंबईकडे जाण्याच्या नियोजनानुसार नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जायचे आहे; परंतु पोलिसांनी त्यांना नवीन मार्गावरून येण्याची अनुमती दिली नसून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जरांगे यांची रॅली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोचण्यापूर्वीच पोलिसांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला. लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जलद कृती दल आणि बाँब निकामी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.


अनुमती नसूनही आझाद मैदानात व्यासपीठ उभारण्याचे काम चालू !

‘मनोज जरांगे पाटील हे २६ जानेवारी या दिवशी मुंबई येथे येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाची मराठा समाजाने जय्यत सिद्धता केली आहे. आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार करून आझाद मैदानाची अनुमती मागितली होती. आम्ही व्यासपीठ उभारण्याचे कामही चालू केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करू’, असे मराठा आंदोलकांचे नेते वीरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी जरांगे यांना एका नोटिसीद्वारे ‘आझाद मैदानात उपोषण करता येणार नाही’, असे कळवले आहे. मराठा आंदोलनामुळे मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. विशेषतः आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबई येथे आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही. त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील ‘इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क’ मैदान संयुक्तिक राहील, असे पोलिसांनी जरांगे यांना आपल्या नोटिसीद्वारे सूचवले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला ठरलेल्या कार्यक्रमानुसार १२ ते १४ घंटे विलंब झाला आहे.