पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा शासनाधीन !
पुणे – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहरात आखलेल्या धडक मोहिमेत ४७ लाख २२ सहस्र ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि एक वाहन शासनाधीन केले आहे. औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने ही मोहीम राबवण्यात आली. पोलीस ठाण्यात वाहन चालकासह अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. राज्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखूजन्य पदार्थांवर उत्पादन, वितरण आणि साठा करणे, वाहतूक तसेच विक्री यांवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री संदर्भातील माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न विभागाचे सहआयुक्त अ.गो. भुजबळ यांनी केले आहे.