प्रजासत्ताकदिन चिरायू होवो !
प्रजासत्ताकदिन म्हणजे भारताचा राष्ट्रीय सण ! या दिवशी प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झालेली असते. खेदाचे म्हणजे ही भावना केवळ एकच दिवस टिकते. या दिवशी केलेली प्रतिज्ञा वर्षभर कार्यरत रहाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताकदिन सोहळा साजरा करत आहोत. ‘हा दिन चिरायू व्हावा’, असे प्रत्येकालाच वाटते; पण त्यात अनेक अडथळे येतात, राष्ट्रावर आघात होतात. धर्महानी होते. असे असतांना हा दिन चिरायू कसा होईल ? त्यामुळे असे प्रकार रोखायला हवेत. भारतात सध्या हिंदुत्वाचे वारे वहात असल्याने हे प्रकार न्यून होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक सकारात्मक घटनाही घडत आहेत. ही एकप्रकारे हिंदु राष्ट्राची नांदीच म्हणावी लागेल.
१. समस्यांचा पाढा !
भारतासमोर सध्या अनेक समस्या ‘आ’ वासून आहेत. द्वेषयुक्त भाषणांतून सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी आटापिटा केला जात आहे. हिंदूबहुल देशात हिंदूंच्या संदर्भात अशी स्थिती निर्माणच कशी होते ? बरे, याविरोधात पेटून उठल्यास हिंदूंचा आवाज दाबला जातो. मध्यंतरी बंगालमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आयोजित केलेल्या शौर्य जागरण यात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली; पण कोलकाता उच्च न्यायालयाने अनुमती दिल्याने यात्रा पार पडली. खलिस्तानवादाने तर भारतातील काही राज्यांत धुमाकूळच घातला आहे. आतंकवादच न्यून म्हणून कि काय, आता खलिस्तानवादही डोकेदुखी ठरत आहे. खलिस्तानवाद्यांचे मूळ लक्ष्य हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यामुळे काही राज्यांतून हिंदू पलायन करत आहेत. खलिस्तानवादाची भीषणता कधी संपणार ? हलाल प्रमाणीकरणाचे षड्यंत्रही मोठ्या प्रमाणात रचले गेल्याने त्याचे बीज संपूर्ण देशात रुजले आहे. मुसलमान धर्मियांकडून ‘हलाल’ची सक्ती हिंदु, जैन आणि शीख यांच्यावरही लादली जात आहे. भारत हलालमुक्त कधी होणार ? मंदिरे तर सरकारीकरणाच्या जोखडातच आहेत. एकट्या कर्नाटक राज्यात ३५ सहस्र मंदिरे सरकारीकरणाच्या विळख्यात अडकलेली आहेत. ही सर्वच मंदिरे सरकारीकरणातून कधी मुक्त होणार ?
२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत नयनरम्य आणि अभूतपूर्व असा रामललाच्या (श्रीरामाचे बालकरूप) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण सर्वांनी अनुभवलाच ! देशामध्ये इतकी सकारात्मक आणि आनंददायी गोष्ट घडत असतांना विरोधक, नव्हे नव्हे भारतद्वेष्टेच आपले विरोधाचे अस्त्र उगारून टपलेले आहेत. काय तर म्हणे, ‘बाबरी आमचीच आहे’, ‘श्रीराम अस्तित्वातच नव्हते’, ‘श्रीराममंदिराचा सोहळा म्हणजे निव्वळ राजकारण आहे’, इत्यादी. सर्वत्र अनागोंदी आणि भोंगळ कारभार चालू आहे. मध्यंतरी बंगालमध्ये ३ साधूंना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. आध्यात्मिकतेचा वारसा लाभलेल्या भारतासाठी हे लाजिरवाणे आहे. मुसलमानांच्या मतांसाठी अनेक दशके चालू असलेले लांगूलचालन अजूनही केले जात आहे. त्याला तर अंतच राहिलेला नाही. कर्नाटकमध्ये इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यासमवेत आक्षेपार्ह छायाचित्रे काढणार्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले. काय ही शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका ! असे कुठलेच क्षेत्र नाही, जे रसातळाला गेलेले नाही. महासत्ता होऊ पहाणार्या भारतासमोरील या समस्यांची शृंखला कधी संपणार ? हे सर्व थांबण्याची वेळ आता समीप येत आहे.
२. आशेचा किरण !
अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून सर्वत्र हिंदुत्वाचे, भक्तीभावाचे आणि संघटिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे भारतीयत्व, हिंदुत्व मनामनांत रुजत आहे. भारताला खर्या अर्थाने संपन्न करण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होत आहेत. इतके दिवस निद्रिस्त आणि निष्क्रीय असणारे हिंदू संघटित होत आहेत. हिंदूंच्या व्यापक संघटनेला झालेला प्रारंभ अनेकविध सकारात्मक घटनांच्या माध्यमातून दिसून येतो. ‘लँड (भूमी) जिहाद’विरोधात हिंदूंनी दिलेल्या लढ्याला मिळालेले यश म्हणजे धर्मांध मुसलमानांनी उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरांहून अधिक बळकावलेली भूमी सरकारने मुक्त केली. महाराष्ट्रातील प्रतापगड (जिल्हा सातारा) आणि पावनगड (जिल्हा कोल्हापूर) यांवरील मुसलमानांनी केलेले अवैध बांधकाम पुरातत्व विभागाने भुईसपाट केले आहे. आता विशाळगड आणि मलंगगडासह अन्य गड कधी अतिक्रमणमुक्त होत आहेत, याची प्रतीक्षा आहे. भारत आज अंतराळक्षेत्रात प्रतिदिन भरारी घेत आहे. याआधी ही भरारी केवळ विज्ञानाच्या बळावर घेता येते, इतकेच ठाऊक होते; पण ‘इस्रो’ ही ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करतांना प्रथम तिरुपति बालाजीच्या चरणी नतमस्तक होते, हे पाहून भारतियांनी यातून योग्य बोध घेतला. हेच हिंदुत्वाला टप्प्याटप्प्याने लाभलेले यश आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये केंद्रशासनाने तीन फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत संमत केले. यानुसार ब्रिटीशकालीन राजद्रोह कायदा रहित करण्यात आला असून देशाच्या विरोधात बोलल्यास तो देशद्रोह ठरेल, तसेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ‘मॉब लिंचिंग’सारख्या (समुहाने केलेल्या हत्या) गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाईल. अशा स्वरूपाचे कायदे संमत होणे, म्हणजे देशाची गुन्हेगारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल आहे. कोलकाता येथील एका महाविद्यालयाने ‘फाटक्या जीन्स आणि आक्षेपार्ह कपडे घालणार नाही’, अशा स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले. भारतीय संस्कृतीची जपणूक होत असल्याचे हे सूचक आहे. प.पू. महेशानंद महास्वामी हंचिनाळ यांनी म्हटले, ‘‘हिंदु संस्कारांमुळे भारत हा जगातील महान देश आहे.’’ या हिंदु संस्कारांच्या बळावरच भारत एक ना एक दिवस ‘महासत्ता’ म्हणून जगात अधिराज्य गाजवेल, हे निश्चित !
आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारतासमोरील राष्ट्र आणि धर्म घातकी समस्या समूळ नष्ट होण्यासाठी कृतीशील होण्याचा संकल्प सर्वच भारतियांनी करूया. तसे झाल्यासच प्रजासत्ताकदिन खर्या अर्थाने चिरायू (चिरकाल टिकणारा) होईल !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.१.२०२४)