२६ जानेवारी : भारताच्या इतिहासातील सोनेरी पान !
१. स्वातंत्र्याची प्रतिज्ञा आणि सहस्रो लोकांचे प्रयत्न, चिकाटी अन् त्याग यांचा परिणाम !
‘शके १८७१ च्या माघ शु. अष्टमी या दिवशी भारतात सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्याची स्थापना होऊन भरतखंड स्वतंत्र झाले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, या लोकमान्य टिळकांच्या घोषणेची पूर्तता झाली. २६ जानेवारी १९३० या दिवशी जवाहरलाल नेहरूंच्या संदेशानुसार स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. सहस्रो लोकांचे प्रयत्न, चिकाटी अन् त्याग यांमुळे भारताच्या भाग्याचा दिवस उजाडला. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी इंग्रज भारतातून गेल्याने भारत स्वतंत्र झाला.
२. सिद्ध घटनेनुसार राज्य चालवण्यास भारताकडून प्रारंभ !
भारताने स्वतः सिद्ध केलेल्या घटनेनुसार राज्य चालवण्यास प्रारंभ केला. राजधानी देहली येथे अपूर्व सोहळा झाला. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल (राज्यपाल) राजगोपालाचार्य यांनी सकाळी १०.१८ वाजता मिनिटांनी ‘भरतखंड संपूर्ण, स्वतंत्र आणि प्रजासत्ताक गणराज्य झाले’, असे घोषित केले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून देशरत्न बाबू राजेंद्रप्रसाद यांनी शपथ घेतली. ३१ तोफांची सलामी होऊन राष्ट्रपतींचा झेंडा फडकू लागला.
३. प्रजासत्ताकदिनी मिळालेली संपत्ती जपण्याचा नेहरूंकडून जनतेला संदेश !
पांडवांच्या इंद्रप्रस्थ राजधानीच्या वैभवशाली प्राचीन काळाापासून भारताच्या राजधानीने वैभव, उन्नती, उत्कर्ष आणि भरभराट यांचे अनेक दिवस पाहिले. भारताच्या प्रभुत्वसंपन्न जनतंत्रात्मक गणराज्याच्या प्रस्थापनेच्या सूर्याेदयाचा हा दिवस भारताच्या इतिहासात अपूर्व आहे. उद्घाटनाच्या वेळी महामंत्री जवाहरलाल नेहरू यांनी भारतियांना संदेश दिला, ‘‘हा दिवस भारत आणि भारतीय यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आज मिळालेली संपत्ती ही दायित्वाची गोष्ट असून तिला आपण सत्कृत्यांद्वारे डोळ्यांत तेल घालून जपावे; कारण आपले प्रयत्न मंदावल्यास किंवा आपण मार्ग चुकल्यास ती आपल्या हातून निसटण्याचा संभव आहे.’’
(साभार : दिनविशेष, २६ जानेवारी १९५०)