अयोध्या येथील श्री राममंदिरातील सोहळ्यानिमित्त शबरी कोल्ला (कर्नाटक) येथील मंदिरात ललिता रुद्र त्रिशती यज्ञ !
बेळगाव – रामदुर्ग तालुक्यातील शबरी कोल्ला येथील मंदिरात अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठाच्या सोहळ्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, या उद्देशाने श्रीराम भक्तांकडून ‘श्री ललिता रुद्र त्रिशती’ यज्ञ करण्यात आला. या यज्ञात २१ जानेवारीला रात्री ११.३० ते २२ जानेवारी सकाळी ७.३० पर्यंत, तसेच २२ जानेवारीला सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहुती देण्यात आल्या. याचे पौरोहित्य सांगली येथील श्री. नाना यादव यांनी केले. या यज्ञात सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन यांसह सर्वश्री विशाल वरे, राजेंद्र कोळी, गणेश पाटील, सिद्धार्थ शिंदे, हिंदुराव शिंदे, राम पोतदार, विशाल पाटील हे श्रीरामभक्त सहभागी होते.
अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ‘‘या यज्ञात ललिता रुद्र त्रिशतीचे ५५ पाठ आणि ३०० बीजमंत्र म्हणण्यात आले. हा यज्ञ करतांना आम्ही सर्वजण एका वेगळ्याच अवस्थेत होतो, तसेच प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाची अनुभूती घेतली.’’
हा यज्ञ ज्या ठिकाणी करण्यात आला, ते मंदिर सुरेबन शहराजवळील खडकाळ टेकडीच्या फाट्यावर वसलेले आहे. हे मंदिर बेळगाव पासून १०७ किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणी प्रभु श्रीराम आणि माता शबरी यांची भेट झाली, तसेच माता शबरीने प्रभु श्रीराम यांना उष्टी बोरे खाऊ घातली. हे मंदिर शबरी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या मागे एक शंकराचे मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना प्रभु श्रीराम यांनी केली आहे.