२६ ते २९ जानेवारी या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे ‘भीमा कृषी पशू आणि पक्षी प्रदर्शन’ !
कोल्हापूर, २५ जानेवारी (वार्ता.) – २६ ते २९ जानेवारी या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे ‘भीमा कृषी पशू आणि पक्षी प्रदर्शन’ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. शेतकर्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणे आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता यावे, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन आहे. हे प्रदर्शन मेरी वेदर मैदान येथे भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित आस्थापनांचा सहभाग असून विविध जातीवंत जनावरे, पशूपक्षी, तांदूळ, मध आणि तृणधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे खासदार आणि ‘भीमा उद्योग समुहा’चे प्रमुख धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रसंगी सत्यजित भोसले, प्राध्यापक जे.पी. पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, अशोक सिधनेर्ले यांसह उपस्थित होते.
धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘२६ जानेवारीला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे. २९ जानेवारी या दिवशी होणार्या सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक प्रदर्शन कक्षांचा समावेश असून ‘भागीरथी महिला संस्थे’च्या सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांचा यात समावेश आहे. ज्याद्वारे महिलांनी सिद्ध केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.’’