अधःपतित लोकशाहीच्या पुनर्निर्माणासाठी श्री समर्थांचे तत्त्वचिंतन !
१. आजचे स्वकीय हे परकीय संस्कृतीच्या विचारधारेने अंध झाले !
समर्थ रामदासस्वामींचा जीवनकाळ संपून ४०० वर्षांचा काळ लोटला, तरी देश समस्या किंवा संकटे यांतून जातच आहे. तेव्हाची भयावह किंवा चिंताग्रस्त स्थिती होती, तेवढीच किंवा त्यापेक्षाही काकणभर अधिकच आज आहे. त्या काळात क्रूर आणि अमानवीय परकीय आक्रमकांमुळे प्रजा त्रस्त होती. आज स्वकियांच्या हातात प्रशासनाची सूत्रे असली, तरी आजचे स्वकीय हे परकीय संस्कृतीच्या विचारधारेने अंध झाले आहेत. स्वधर्म, स्वदेश, स्वराष्ट्र, राष्ट्रीय अस्मिता, न्याय, नीती आणि राष्ट्राची एकता, अखंडता अन् सार्वभौमत्व, अंतर्बाह्य सुरक्षितता या विषयांचे सखोल चिंतन अन् विचार होत नाही. उलट ज्या ज्या ठिकाणी देश, धर्म, संस्कृती यांच्या पुनरुत्थानाचा विचार मांडला जाईल, त्या त्या ठिकाणी गोबेल्स तत्त्वाचा वापर केला जातो, म्हणजे १०० वेळा खोटे सांगितले, तर ते खरे वाटायला लागते. या कूटनीतीचा अवलंब करून त्यांना जातीय, सांप्रदायिक इत्यादी शेलक्या शब्दांनी त्यांची संभावना करण्यात येते.
या भूमीतच रुजणार्या आणि वाढणार्या धर्म संस्कृतीप्रणीत नीतीमूल्यांचे दिवसेंदिवस अधःपतन होत आहे. त्यांनी परिसीमा गाठल्याचे अमाप भ्रष्टाचार अन् असंख्य घोटाळे यांतून ते निदर्शनास येत आहे. पेट्रोलपासून ते कांद्यापर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. परिणामी सामान्य माणसांना जीवन जगणे असह्य झाले असून आत्महत्या आणि गुन्हेगारी यांचे प्रमाण वाढले आहे.
२. राष्ट्रपुरुषांच्या मार्गदर्शनाकडे पाठ फिरवल्याने कुकर्माची फळे भोगावी लागणे
समर्थ रामदासस्वामींसारख्या राष्ट्रपुरुषांच्या समर्पित जीवनाकडे अन् त्यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनाकडे पाठ फिरवल्याने आज आपण आपल्या कुकर्माची फळे भोगत आहोत. याचे आकलन आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला, विशेषतः परकीय तत्त्वज्ञानाला घट्ट आवळून असणार्यांना अजूनही होत नाही, ही आजच्या लोकशाहीची दुर्दैवी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
३. परकीय विचारांच्या उसनवारीचा परिणाम !
विकृत, विसंगत, अनावश्यक अशा निधर्मी आणि साम्यवादी यांच्या विचारांना आम्ही तत्त्वज्ञानाचा मुलामा देऊन म्हणजे पितळेच्या भांड्याला सोन्याचे पॉलिश देऊन नाचत आहोत. शंभर नंबरी सोन्यासारखे धार्मिक, आध्यात्मिक विश्वकल्याण करू शकणारे तत्त्वज्ञान जवळ असतांना आम्ही परकीय विचारांची उसनवारी करून देशाला सर्व प्रकारच्या संकटांत लोटत आहोत.
४. देशद्रोह्यांना मानवतेची वागणूक कशासाठी ?
रामायण-महाभारत काळापासून ‘दुष्टांचा संहार करावा’, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण असतांना शत्रूराष्ट्रातील देशद्रोही आतंकवादी दानवांना मानवतेची वागणूक का दिली जाते ? सर्वाेच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या अफझल गुरुला केवळ तो मुसलमान आहे; म्हणून फाशीची शिक्षा देण्याची कुणातच हिंमत नसावी ? इतका षंढपणा जगाच्या पाठीवर कुठेही आढळणार नाही.
– अधिवक्ता यशवंत फडणीस (साभार : मासिक ‘प्रसाद’)