आक्षेपार्ह पोस्ट आणि हर्णेमधील श्रीरामाचा फलक फाडल्याच्या पार्श्वभूमीवर दापोली शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला !

  • ‘ड्रोन’द्वारे शहरावर ठेवण्यात येत आहे लक्ष !

  • पोलिसांचा रुट मार्च (कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे संचलन)

हर्णे पाजपंढरी परिसरात तणाव

दापोली – २२ जानेवारीला अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्री रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी धर्मांधांनी ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केलेली आक्षेपार्ह पोस्ट आणि हर्णे-पाजपंढरी परिसरात लावण्यात आलेला श्रीरामाचा फलक अज्ञाताने फाडला, यांमुळे तालुक्यात हिंदु-मुसलमानांमध्ये सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर २४ जानेवारीच्या रात्री ९ वाजता दापोली पोलीस आणि महसूल विभागाने ‘शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी’, यासाठी ‘रूट मार्च’ काढला. या दोन्ही प्रकरणांमुळे तालुक्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. ‘सीसीटीव्ही’ असलेले वाहन शहरात ठेवण्यात आले असून ‘ड्रोन’द्वारेही शहरावर लक्ष ठेवले जात आहे.

या ‘रुट मार्च’ला दापोली बसस्थानकापासून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर काळकाई कोंड, खोंडा, बुरोंडी नाका, फॅमिली माळ, बाजारपेठ, मासळीबाजार ते पोलीस ठाणे या मार्गावर रुट मार्च काढण्यात आला. शहरात शीघ्रकृती दल, दंगल नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आले आहे. या मध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, पोलीस उपअधीक्षक माईणकर, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, दापोली पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे सैनिक सहभागी झाले होते.

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दापोलीत उपस्थित आहेत.

दापोलीत शांतता समितीची बैठक  

सर्वांनी संयम राखावा ! – उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर

दापोली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांनी घेतली. ते म्हणाले की, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करायला लागेल अशा पद्धतीचे कोणतेही कृत्य युवकांनी करू नये. आपल्या मर्यादा पाळाव्यात. अन्यथा उद्याच्या भावी पिढीवर विपरित परिणाम होऊन त्यांच्या भवितव्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आपल्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना सांभाळा, सर्वांनी संयम राखा, सामाजिक माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाईल, असे संदेश प्रसारित करू नका किंवा स्टेटसला ठेवू नका.

हर्णे येथे प्रभु श्रीरामाचा फलक फाडल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद  

दापोली – तालुक्यातील हर्णे-पाजपंढरी परिसरात लावण्यात आलेला श्रीरामाचा फलक अज्ञाताने फाडल्यामुळे हर्णे पाजपंढरी परिसरात तणाव निर्माण झाला होता.  संशयितांना जोपर्यंत पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पावित्रा हिंदूंनी घेतला. पोलिसांनी दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. या प्रकरणामुळे दापोलीसहीत हर्णेमध्येही पोलिसांनी तातडीने बंदोबस्तासाठी आर.सी.बी. फोर्स पाचारण केले. येथील दीपक खेडेकर यांनी ३ संशयितांविरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.