श्रीराममंदिरात श्री रामललाच्या आणखी २ मूर्ती स्थापित केल्या जाणार !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठ करण्यासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने एकूण ३ शिल्पकारांना ३ मूर्ती बनवण्यास सांगितले होते. या तिघांपैकी अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड करून ती मंदिरात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता उर्वरित २ मूर्तीही या मंदिरातील वरच्या मजल्यांवर स्थापित करण्यात येणार आहेत, असे न्यासाकडून सांगण्यात आले आहे. या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. यांतील एक मूर्ती काळ्या पाषाणाची आहे, तर दुसरी मूर्ती संगमरवराची पांढर्या रंगाची आहे. या दोघांचीही उंची ५१ इंच इतकीच आहे. या मूर्तीही कमळावर उभ्या असलेल्या आहेत.
१. काळ्या पाषाणातील मूर्ती कर्नाटकातीलच एक शिल्पकार गणेश भट्ट यांनी बनवली आहे. गणेश भट्ट यांनी आतापर्यंत १ सहस्रांहून अधिक मूर्ती साकारल्या आहेत, ज्या केवळ भारतातच नव्हे तर ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका आणि इटली या देशांमध्येही स्थापित केल्या गेल्या आहेत.
२. दुसरी मूर्ती मूर्ती राजस्थानचे शिल्पकार सत्यनारायण पांडे यांनी बनवली आहे. ही मूर्ती मकरानाच्या पांढर्या संगमरवरापासून बनवण्यात आली आहे. सत्यनारायण पांडे जयपूरचे प्रसिद्ध शिल्पकार रामेश्वर लाल पांडे यांचे पुत्र आहेत. त्यांचे कुटुंब गेल्या ७ दशकांपासून संगमरवरी शिल्पे बनवत आहे.