अयोध्येत १० दिवसांत १२ सहस्र रामभक्तांनी घेतले प्राथमिक उपचार !
श्वसनाचा त्रास होणार्या रुग्णांची संख्या अधिक
अयोध्या, २५ जानेवारी (वार्ता.) – श्रीरामजन्मभूमीतील नूतन मंदिरात स्थानापन्न झालेल्या रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतील आतापर्यंत १२ सहस्र जणांनी प्रथमोपचाराचा लाभ घेतला. येथील कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास चालू झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी श्वसानाचा त्रास झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे २४ टक्के आहे. अयोध्यानगरीतील शरयु तीरावरील प्राथमिक उपचार केंद्रात जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी ही माहिती घेतली.
१५ जानेवारीपासून ही प्राथमिक उपचार केंद्रे अयोध्यानगरीत चालू करण्यात आली आहेत. यामध्ये श्वसनाच्या विकारानंतर पोटात मळमळणे आणि त्यानंतर ताप येणे या विकारांच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पोटाचे विकार झालेल्या रुग्णांची संख्या १४ टक्के, तर त्वचेला अॅलर्जी झालेल्या रुग्णांची संख्या १३ टक्के इतकी आहे. अयोध्येत रामकथा संग्रहालय, साकेत पेट्रोल पंप, रामेश्वरपुरम, रामजन्मभूमी अशा विविध १८ ठिकाणी राज्याच्या आरोग्य विभागाकडून उपचार केंद्रे उभारण्यात आली असून या सर्व केंद्रांमध्ये एकूण १०४ डॉक्टरांचा समावेश आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत ही उपचार केंद्रे कार्यरत आहेत. रामकथा संग्रहालयातील उपचार केंद्रामध्ये आतापर्यंत सर्वाधिक २ सहस्र २९९ नागरिकांवर प्रथमोपचार करण्यात आले आहेत.
भाविकांना त्वरित उपचार मिळण्यासाठी उपचार केंद्रे ! – डॉ. पियुष गुप्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र, शरयु तीर
अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात येणार्या भाविकांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी ही प्राथमिक उपचार केंद्रे चालू करण्यात आली आहेत. सर्दी, जुलाब, ताप, थकवा येणे, पोट बिघडणे आदी त्रास होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. २ केंद्रांमध्ये आयुर्वेद आणि होमेओपॅथी या उपचारपद्धती अवलंबण्यात येत आहेत. कडाक्याच्या थंडीत हृदयविकाराचा झटका येणे, श्वास घेण्यास अडचण येणे असे त्रास होणारे रुग्णही येत आहेत. श्वसनाच्या विकारावर उपचार करण्यासाठी प्रत्येक उपचार केंद्रावर ऑक्सिजनचे सिलेंडर उपलब्ध आहेत. जीवनरक्षक इंजेक्शनही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांवर औषधे उपलब्ध आहेत.