हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी अविरत प्रयत्न करणे आवश्यक ! – पू. राजूदासजी महाराज, महंत, हनुमानगढी, अयोध्या
अयोध्या, २५ जानेवारी (वार्ता.) – हिंदु राष्ट्र नसेल, तर सनातन धर्मही सुरक्षित रहाणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी हिदु राष्ट्राची जोरदार मागणी केली पाहिजे. त्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अयोध्या येथील हनुमानगढीचे महंत पू. राजूदासजी महाराज यांनी केले. २४ जानेवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील आवाहन केले.
या वेळी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्रतिक्रिया देतांना पू. राजूदासजी महाराज म्हणाले, ‘‘संपूर्ण देश राममय, सनातनमय, भगवामय, हिंदुत्वमय आणि राष्ट्रमय झाला आहे. सनातन धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी जगातील कित्येक रामभक्त आणि सनातनी लोक यांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्याग, तपस्या आणि संघर्ष केला आहे. श्रीराममंदिरासाठी ५०० वर्षांच्या लढ्यात ५ लाख रामभक्तांच्या प्राणांची आहुती पडली आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत हिंदूंनी अनेक आघात झेलले आहेत. श्रीरामाच्या मंदिरासाठी हिंदूंनी इतके आघात सोसले ही काही सामान्य गोष्ट नाही. श्रीराममंदिराची जुनी अवस्था बघून लोक हसून म्हणत होते, ‘भव्य श्रीराममंदिर कसे उभारले जाईल ? मंदिर उभारण्याचा प्रयत्न केल्यास गोळीबार होईल. रक्ताच्या नद्या वहातील; परंतु तसे काही न होता श्रीराममंदिर उभारले गेले आहे.’’
हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरच होईल !
हिंदु राष्ट्र म्हणजेच रामराज्य. रामराज्यात सर्व सुखी होते. कुणीही दुःखी नव्हते. हिंदु राष्ट्रामध्ये विश्वबंधुत्वाची भावना आहे. भारतात अनेक पंथ, धर्म, संप्रदाय असून त्यांच्या आचार धर्माच्या पद्धती भिन्न असल्या, तरी ते कुठलाही संघर्ष न करता गुण्यागोविंदाने रहात आहेत. या उलट अन्य देशात एकच धर्म, एकच संप्रदाय मानतात. भारतात प्रत्येक संप्रदायांची पूजाअर्चा करण्याची पद्धती, विचारधारा वेगवेगळी असली, तरी त्यांना भारतात स्वत:चे धार्मिक रितीरिवाज निर्भयपणे, मुक्तपणे आचरणात कोणतेही बंधन किंवा आडकाठी नाही. भारतात लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा विश्वास पू. राजूदासजी महाराज यांनी या वेळी व्यक्त केला.