ठाणे येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेत असल्याचे वास्तव उघड !
|
ठाणे – मुलांच्या दप्तरांमध्ये नशेच्या गोळ्या, गुटख्याच्या पुड्या आणि सिगारेट आढळत आहेत, असे ठाणे शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिकवणीवर्गांचे संचालक अन् सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. २५ जानेवारी या दिवशी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शाळांच्या परिसरात वावरणारे अमली पदार्थांचे तस्कर विद्यार्थ्यांना ई-सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ यांसह अमली पदार्थ पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळांमध्ये ये-जा करणार्या मुलींची छेड काढली जात असल्याचेही शिक्षकांनी पोलीस अधिकार्यांना या वेळी सांगितले.
‘तुम्ही आम्हाला सूचना आणि माहिती द्या. आम्ही नक्की कारवाई करू’, अशी ग्वाही या वेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले.
शिक्षकांनी मांडलेली गंभीर सूत्रे !
१. पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी सेवन करून विद्यार्थी शाळेत येतात. शाळेतही ही मुले नशेत असतात.
२. काही मुले वर्गात नशेच्या गोळ्या आणतात. दप्तरातही सिगारेट आणि गुटख्याच्या पुड्या असतात. हे सर्व ते अन्य मुलांना देतात. परिणामी शाळकरी मुले या विळख्यात सापडत आहेत.
३. शाळेपासून काही अंतरावर असलेल्या पानटपर्यांमध्ये गुटखा, ई-सिगारेट आणि नशेच्या गोळ्या, तसेच अन्य प्रतिबंधित पदार्थ असतात. त्यामुळे पानटपर्यांवर कारवाई करावी.
४. पानटपरीवरील मुले शाळेत येणार्या विद्यार्थिनींची छेड काढतात.
संपादकीय भूमिकासर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे ! |