अयोध्या येथील श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तुर्भे (वाशी) येथे विविध कार्यक्रम !
नवी मुंबई – तुर्भे (वाशी) येथील परिसरात अयोध्या येथील श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
१. तुर्भे गाव येथील पुरातन श्री रामतनुमाता मंदिरात सकाळी आणि दुपारी श्रीरामरायाची आरती, भजन, नामस्मरण, तसेच सायंकाळी महाआरती आणि प्रसाद आणि दीपोत्सवाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
२. सेक्टर २१ येथील इच्छापूर्ती हनुमान मंदिरात भजन, भंडारा, दीपोत्सव करण्यात आला.
३. आग्रोळी गाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात सकाळी अभिषेक, पूजा, आरती यांसह श्री. चंद्रकात बुवा निधुकर यांनी सुश्राव्य भजन सादर केले. सायंकाळी भव्य शोभायात्रा, महाआरती आणि नंतर महाप्रसाद असे स्वरूप होते.
४. सकल हिंदु समाज वाशीच्या वतीने दत्तगुरुनगर, सेक्टर १५ येथील दत्तमंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. २२ जानेवारी या दिवशी आरती, रामरक्षास्तोत्र पठण, तसेच देवतांचे पूजन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता रथयात्रा श्री दत्तमंदिर प्रांगणात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींचे पूजन करून आरतीनंतर पालखी आणि रथयात्रा काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता वाशीतील पोस्ट कार्यालयाजवळील श्री गणराज चौक येथे ‘श्रीराम रथोत्सव’ आणि ‘दीपोत्सव’ साजरा करण्यात आला. या वेळी मराठी आणि हिंदी भजनांचा सुश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. ३ सहस्र ३३३ दीप प्रज्वलित करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
५. ‘इच्छापूर्ती जागृत श्री सोमेश्वर शिव मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने महात्मा गांधी कॉम्प्लेक्स येथे १७ ते २१ जानेवारीपर्यंत श्रीराम कथावाचन करण्यात आले. २२ जानेवारी या दिवशी भजन, पूजा करून शोभायात्रा काढण्यात आली. दीपोत्सव, महाआरती आणि हनुमानचालीसा यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
६. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून श्रीराम, सीता, हनुमान १२ यांचे १२ फूट उंचीचे पुतळे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. प्रभु श्रीराम यांची विधीवत् पूजा करून प्रभु श्रीराम यांची भजने लावण्यात आली होती. सायंकाळी ‘तेजवूया एक दिवा प्रभु श्रीरामाच्या चरणी’ हा उपक्रम करण्यात आला. तसेच सायंकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात प्रभु श्रीरामाला अभिवादन करण्यात आले.