धर्म म्हणजे नेमके काय ? जीवनात त्याचा काही उपयोग आहे का ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन करणारी नवीन लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

‘धर्माच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत आणि करताही येतील. व्यापकता आणि उपयुक्तता यादृष्टीने धर्माची अधिक चांगली व्याख्या महाभारतामध्ये सांगितली आहे ती अशी,

धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।
यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।

– महाभारत, पर्व १२, अध्याय १०९, श्लोक ११

अर्थ : जो धारण करतो, त्याला ज्ञानीजन ‘धर्म’ असे म्हणतात. धर्माने सर्व प्रजेला धारण केले आहे. ‘जो धारण आणि पोषण करतो, तो ‘धर्म’ होय’, असा सत्पुरुषांचा निश्चय आहे.

१. धर्माची साधी सोपी व्याख्या आणि व्यक्तीचा विभिन्न स्तरावरील धर्म

‘धारणा’ शब्दाने अभिप्रेत आहे ते असे, मानवी जीवनाची जितकी काही अंगे-उपांगे संभवतात, त्या सगळ्यांमध्ये परस्पर संघर्ष येऊ न देता, त्या त्या व्यक्तीला, कुटुंबाला वा राष्ट्राला उचित अशा अनुरूपतेने शेवटपर्यंत जगता येईल, यथासंभव प्रगती, विकास आणि उन्नती साधेल, अशी बाह्य व्यवस्था अन् आंतरिक भाव, भावना यांच्या संबंधी नीतीनियम वा विधीनिषेध यांची आचारनिष्ठ संकल्पना. ही धारणा ज्याच्यामुळे होते तो धर्म !

आपल्या कल्पनेतील ‘रिलिजन’ शब्दाच्या अर्थापेक्षा धर्म शब्दाचा आपला अर्थ थोडा वेगळा आहे. तो थोडासा समजावून घेतला पाहिजे. सूत्र रूपाने सांगायचे, तर धर्म म्हणजे कर्तव्य + उत्तरदायित्व + विशेष अधिकार + सन्नीती यांचे एकत्रित स्वरूप.

एखाद्या व्यक्तीचा धर्म हा विभिन्न स्तरावर विभिन्नअसतो. गुरूंविषयी शिष्य धर्म, आई-वडिलांविषयी पुत्र धर्म, मुलांविषयी पितृ धर्म, बहीण-भावंडांविषयी भ्रातृ धर्म, राष्ट्राविषयी पौर धर्म इत्यादी.

२. धर्माचे प्रामाणिक आचरण करणारा समाधानी असतो !

मानवी जीवनात कल्याणप्रद समाधानाची प्राप्ती होणे, ही सर्वांत मोठी आिण महत्त्वाची, तसेच सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हटली पाहिजे. मनुष्यमात्राचे सर्व प्रयत्न प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यासाठीच असतात आणि अनुभव असा असतो की, माणूस सुखदुःखाच्या फेर्‍यात सापडला जातो. त्या पलीकडे रहाणार्‍या समाधानाची प्राप्ती फारशी होत नाही. धर्माचे प्रामाणिक आचरण, अन्यथा दुर्लभ असणार्‍या समाधानाची प्राप्ती करून देते. असा ज्ञानी, सदाचारी धार्मिक माणूस स्वतः समाधानी असतो आणि संपर्कात येणार्‍यांचे जीवन समाधानी करण्यात साहाय्य करू शकतो.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. वर्ष १९९८)