अयोध्येत श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया
‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बघण्याचे दिव्य भाग्य मला मिळाले. श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.
१. प्राणप्रतिष्ठेपूर्वी श्रीराममंदिरातील गर्भगृहातील स्पंदने
२२.१.२०२४ या दिवशी सकाळी १०.१५ वाजता मला गर्भगृहात अंधार जाणवला. गर्भगृहात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अजून व्हायची असल्याने मंदिराच्या कळसातून श्रीरामाचे तत्त्व गर्भगृहात अजून प्रवाहित होत नव्हते. त्यामुळे मला गर्भगृहात अंधार जाणवला. त्या वेळी गर्भगृहातील स्पंदने मला पुढीलप्रमाणे जाणवली. तेव्हा मी माझ्यातील स्पंदनांचाही अभ्यास केला. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा बघतांना माझ्यात काय परिवर्तन होते, हे बघण्याचा माझा उद्देश होता.
वरील सारणीतून लक्षात येते की, प्राणप्रतिष्ठेपूर्वी गर्भगृहात शक्तीचे प्रमाण थोडे अधिक होते. शक्तीची स्पंदने ही सर्वांत न्यून स्तराची असतात.माझ्यामध्ये शांतीचे प्रमाण थोडे अधिक होते; कारण त्या वेळी माझे मन शांत आणि निर्विचार होते.
२. सकाळी १०.३५ – प्राणप्रतिष्ठेसाठी सिद्ध झालेल्या वातावरणातील शक्तीची स्पंदने स्वतःच्या मणिपूरचक्रावर जाणवणे; पण मन शांत असल्याने स्वतःची चंद्रनाडी कार्यरत असणे
प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला आरंभ होण्यापूर्वी ‘अयोध्या नगरी कशी सजली आहे ?’, ‘मंदिर कसे सुशोभित केले आहे ?’ इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण माहिती दाखवत होते. तेव्हा मला माझ्या मणिपूरचक्रावर स्पंदने जाणवली, तसेच माझी चंद्रनाडी कार्यरत होती. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व वातावरण उत्साहाने भारित आणि सिद्ध झालेले होते. त्यामुळे मला शक्तीची स्पंदने मणिपूरचक्रावर जाणवली; पण माझे मन शांत असल्याने माझी चंद्रनाडी कार्यरत होती.
३. सकाळी १०.५० – गर्भगृहात थोडासा प्रकाश येतांना जाणवणे, तेव्हा तेथील भाव आणि चैतन्य यांच्या स्पंदनांमध्ये वाढ होणे, तसेच तेव्हा स्वतःतील भाव अन् आनंद यांच्या स्पंदनांतही वाढ होणे
या वेळी मला ‘गर्भगृहात थोडासा प्रकाश वरून येत आहे’, असे जाणवले. त्यामुळे तेव्हा मी गर्भगृहातील आणि माझ्यातील स्पंदनांचा अभ्यास केला.
गर्भगृहात थोडासा प्रकाश येत असल्याचे जाणवल्याने गर्भगृहातील आधीच्या स्पंदनांची तुलना करता या वेळी गर्भगृहात शक्तीच्या स्पंदनांचे प्रमाण अल्प होऊन भाव आणि चैतन्य यांचे प्रमाण वाढले होते. माझ्यातील स्पंदनांमध्येही भाव आणि आनंद यांचे प्रमाण वाढले होते. तसेच मला माझ्या स्वाधिष्ठानचक्रावर स्पंदने जाणवत होती आणि माझी सूर्यनाडी कार्यरत झाली होती.
४. दुपारी १२ – अकस्मात् स्वतःची सुषुम्ना नाडी कार्यरत होणे, मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवणे आणि आकाशातून चैतन्याचा एक बारीक प्रवाह कळसातून गर्भगृहात प्रवेश करत असल्याचे जाणवणे अन् हे सर्व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरात प्रवेश करत असल्याने घडल्याचे लक्षात येणे
दुपारी १२ वाजता अकस्मात् मला माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाल्याचे जाणवले, तसेच मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली. मला मंदिरातून थंडगार स्पंदनेही येतांना जाणवली. तसेच ‘आकाशातून चैतन्याचा एक बारीक प्रवाह कळसातून गर्भगृहात प्रवेश करत आहे’, असेही जाणवले. ‘हा सर्व पालट अकस्मात् का जाणवू लागला ?’, याचा मी विचार करत होतो, इतक्यात मला
श्री रामललामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात प्रवेश करतांना दिसले. ‘सोहळ्याच्या यजमानांनी मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी प्रवेश केल्यावर सूक्ष्मातील स्पंदनांमध्ये कसा पालट होतो ?’, हे यातून शिकायला मिळाले. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भाव आणि ते या सोहळ्यासाठी ११ दिवस व्रतस्थ राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये आलेले तेज यांमुळे शक्य झाले.
५. दुपारी १२.२० ते १२.३५ – श्री रामललाच्या प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी जाणवलेले सूक्ष्मातील पालट
५ अ. गर्भगृहातील स्पंदनांमधील पालट : प्राणप्रतिष्ठा विधीला आरंभ होण्यापूर्वीच्या गर्भगृहातील स्पंदनांशी तुलना केल्यास प्राणप्रतिष्ठा विधीला आरंभ झाल्यावर गर्भगृहातील आनंदाची स्पंदने १० टक्क्यांवरून ३५ टक्के झाल्याचे लक्षात येते. श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे गर्भगृहातील आनंदाच्या स्पंदनांमध्ये, तसेच प्रकाशात पुष्कळ वाढ झाली. तसेच प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्यामुळे गर्भगृहातील शांतीची स्पंदने ५ टक्क्यांनी वाढल्याचे पुढील सारणीतून लक्षात येते. हे श्रीरामासारख्या उच्च देवतेमुळे घडते.
५ आ. स्वतःतील स्पंदनांमधील पालट : श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर माझ्यातील चैतन्यात थोडी वाढ झाल्याचे पुढील सारणीतून लक्षात येते. हा विधी चालू असतांना १५ मिनिटे माझी सुषुम्ना नाडी कार्यरत होती. श्रीरामासारख्या उच्च देवतेमुळे जशी आपल्यातील चैतन्यात वाढ होते, तशीच आपल्यातील शांतीच्या स्पंदनांमध्येही वाढ होत असल्याचे मला लक्षात आले. प्राणप्रतिष्ठेला आरंभ होण्यापूर्वी माझ्यातील शांतीची स्पंदने २३ टक्के होती, ती प्राणप्रतिष्ठेनंतर ३५ टक्के झाली. शांतीची स्पंदने ही सर्वाेच्च स्तराची असतात आणि अशी उच्च स्तराची स्पंदने उच्च देवतेमुळे लाभतात.
अशा प्रकारे अयोध्येमध्ये स्थापन झालेल्या श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करण्याचे भाग्य मला लाभले. तसेच हा दिव्य सोहळाही मला पहाता आला. नेत्रांमध्ये श्री रामललाला साठवून ठेवता आले. यासाठी मी प्रभु श्रीराम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.१.२०२४)
|