…आणि परदास्याचा कलंक मिटला !
‘विश्व हिंदु परिषदेच्या बॅनरखाली देशाच्या कानाकोपर्यात वर्ष १९८४ पासून गुंजलेल्या ‘जय श्रीराम’ नादाने गोव्यालाही पुरते सक्रीय करून ठेवले होते. श्रीराम-जानकी रथयात्रेपासून चालू झालेल्या श्रीरामजन्मभूमीसाठीच्या वेगवेगळ्या अभियानांमुळे गोव्यातील विश्व हिंदु परिषद, रा.स्व. संघ आणि या अभियानात सहभागी झालेल्या अन्य हिंदुत्वनिष्ठ संस्था अन् संघटना यांच्या कार्याला एक वेगळाच रचनात्मक, आव्हानात्मक पैलू लाभला होता. या सर्वव्यापी, सर्वस्पर्शी अभियानांनी हिंदुत्वाचे उधाण गोमंतकात आणले. ही सर्व अभियाने सुरळीतपणे पार पडावीत, यासाठी संघटना आणि प्रतिनिधी यांची एक सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली. या सुकाणू समितीचे मार्गदर्शक होते तपोभूमी पीठाधीश प.पू. श्री ब्रह्मानंदस्वामी महाराज, नीळकंठ तथा आनंदराव भावे आणि शांतारामपंत सरज्योतिषी.
१. श्रीरामजन्मभूमी मुक्ती अभियानाचे टप्पे
अ. प्रारंभीच्या (वर्ष १९८४ मध्ये) ‘श्रीराम-जानकी रथयात्रे’ने गोव्यातील सर्व तालुक्यांपर्यंत जागरणाचा प्रभावी स्पर्श केला.
आ. ‘श्रीरामशिळा पूजन’ या दुसर्या टप्प्यात पूजनाचे गोव्यात २५० ठिकाणी कार्यक्रम झाले. नियोजित श्रीराममंदिर उभारणीसाठी गावागावांतून आणि काही मंदिरांतून आलेल्या श्रीरामशिळा गोळा झाल्या. २ ट्रक भरून या शिळा अयोध्येला रवाना करण्यात आल्या.
इ. अयोध्येतून आलेल्या ‘श्रीराम ज्योतीपूजना’चे अभियान हा तिसरा टप्पा ! ज्योतीपूजनाचे कार्यक्रम गोव्यातील ३०० गावांमध्ये पार पडले. पणजीलगतच्या किनारपट्टीवरील छोट्याशा ओडशेल गावात ‘श्रीराम ज्योती’ कार्यक्रमात प्रज्वलित केलेली, स्वतःच्या घरातील दिव्याची ज्योत गेली ३३ वर्षे विझू न देता या गावचे रहिवासी रामभक्त श्री. केशव दिवकर यांनी मोठ्या श्रद्धेने आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. आजही ते घरी आलेल्या पाहुण्यांना ही ज्योत अभिमानाने दाखवतात.
ई. चौथ्या टप्प्यातील ‘श्रीराम पादुकापूजना’चे कार्यक्रम पुन्हा एकदा याच ३०० गावांत ३८० ठिकाणी घेण्यात आले. या मधल्या काळात लोकजागृतीसाठी साध्वी ऋतंभरादेवी, उमा भारती यांच्या स्वतंत्र जाहीर सभा वेगवेगळ्या वेळी पणजी येथे घेण्यात आल्या, तर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांची सभा म्हापसा येथे श्री बोडगेश्वर मैदानावर घेण्यात आली.
उ. ‘कारसेवा’ हा शेवटचा टप्पा ठरला. वर्ष १९९० आणि १९९२ या दोन्ही वेळा संघर्षात्मक वातावरणात या कारसेवा अयोध्येत झाल्या. दोन्ही कारसेवांमध्ये मिळून ७५० कारसेवकांनी भाग घेतला. त्यात ५३ महिलांचा समावेश होता. पूर्णपणे स्वखर्चाने आणि जीव धोक्यात घालून कारसेवेला गेलेल्या या रामभक्तांनी गोमंतभूमीची श्रीरामजन्मभूमी मुक्तीविषयी असलेली बांधिलकी आणि कटीबद्धता सिद्ध केली.
२. वर्ष १९९० ची पहिली कारसेवा
पहिल्या कारसेवेच्या वेळची अयोध्येतील पार्श्वभूमी तशी चिंता आणि भय निर्माण करणारी होती. या कारसेवेसाठी गोव्यातून गेलेल्या ३०० कारसेवकांना झाशी रेल्वेस्थानकावरच अटक करून अडकवण्यात आले होते. त्यातून निसटलेल्या १५ कारसेवकांनी मात्र आडमार्गाने, सशस्त्र पोलिसांना आणि रात्रीच्या वेळचे प्रखर प्रकाशझोत चुकवत, चिखल-पाणी तुडवत, ६० हून अधिक किलोमीटरचा पायी प्रवास करत अयोध्येत निडरपणे प्रवेश केला.
३. प.पू. श्री ब्रह्मानंदस्वामी यांचा निग्रह
गोव्यातील एक प्रसंग अभिमानास्पद आणि उल्लेखनीय वाटतो. प.पू. श्री ब्रह्मानंदस्वामी महाराज अभियानाचे मार्गदर्शक होते. त्यांनी स्वतः कारसेवेला जायची सिद्धता केली. एका हितचिंतकांनी प्रस्ताव मांडला, ‘स्वामीजींनी आपण कारसेवेसाठी अयोध्येला जात आहोत, हे घोषित करावे; परंतु अयोध्येत न जाता मध्येच सुरक्षित ठिकाणी मुक्काम करावा.’ प.पू. स्वामीजींनी शिष्यांना म्हटले, ‘तुम्ही मठासाठी दुसरा स्वामी बघा. कारसेवेला माझे जाणे नक्की आहे. मी निर्णय पालटणार नाही.’ श्रीराममंदिर अभियानाला नैतिक बळ आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा हा प्रसंग होता.
४. …आणि नेस्तनाबूत झाला बाबरी ढाचा !
वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाच्याचा कायमचा निकाल लावणार्या कारसेवेसाठी गोव्यातून ४५० कारसेवक अयोध्येला गेले. या वेळी उत्तरप्रदेशमध्ये रामभक्त कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखालचे भाजपचे सरकार होते. केंद्रातील काँग्रेसच्या दबावाला दाद न देता मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी कारसेवकांना मुक्तपणे अयोध्येत येऊ दिले. देशभरातून सुमारे साडेसात लाख कारसेवक कारसेवेसाठी अयोध्येत जमले होते. विवादित नसलेल्या खुल्या जागेत प्रत्येकाने चिमूटभर माती टाकून ‘प्रतिकात्मक कारसेवा होणार आहे’, असे घोषित केले होते. या ‘मिळमिळीत’ कारसेवेच्या कल्पनेने बरेच जण निराश झालेले होते; पण आंदोलनाशी असलेल्या बांधिलकीमुळे निराशा व्यक्त झाली नाही. कारसेवकांसाठी विचारपूर्वक व्यवस्था आणि रचना करण्यात आली होती. यानंतर मात्र ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री काही निवडक कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली.
४ अ. तो अकल्पित क्षण जवळ आला ! : ६ डिसेंबर १९९२ या दिवशी सकाळी सगळे सभास्थानी निघाले. सर्व कारसेवकांची सभेला बसण्याची रचना बाबरी ढाच्याकडे पाठ करून होती. व्यासपिठाचे तोंड बाबरी ढाच्याकडे होते. सभा झाल्यावर प्रतिकात्मक कारसेवेसाठी जायचे होते; पण अचानक आमच्या पुढचे कारसेवक मागे माना वळवून बघायला लागले. मग बाकीचेही उठून बघायला लागले. समोर घडणारे अकल्पित दृश्य गोड धक्का देणारे होते, देशाच्या इतिहासाला एक वेगळेच वळण देणारे होते…..ते, म्हणजे बाबरी ढाचा ‘जय जय श्रीराम’ आणि ‘रामलला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे’, या निनादात कोसळला.
५. हुतात्म्यांचे आत्मे कृतकृत्य झाले !
श्रीरामजन्मभूमीकरता गेल्या ५०० वर्षांच्या संघर्षात प्राणांचे बलीदान दिलेल्या ५ लाख रामभक्तांचे आत्मे आज तृप्त आणि कृतकृत्य होत असल्याच्या जाणिवेने अंतःकरण भभरून येत होते, डोळे पाझरतच होते…! गेली ५०० वर्षे भारतवर्षाला हिणवणारा बाबरीचा कलंक धराशायी झालेला आम्हाला पहाता आला, हे आमचे अहोभाग्यच! या समर प्रसंगाच्या आठवणी थोड्याशा धूसर झालेल्या असल्या, तरी त्या अमर आहेत !’
प्रभु श्रीरामचंद्र की जय!
– प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर, माजी गोवा संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.