अगणित कारसेवकांच्या बलीदानामुळेच अयोध्येत श्रीराममंदिर उभे राहिले ! – डॉ. समीर घोरपडे
लांजा शहरातील प्रभु श्रीरामांची भव्य प्रतिकृती
लांजा, २४ जानेवारी (वार्ता.) – ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्री रामलला स्वस्थानी विराजमान झाले आहे. हा क्षण पहाण्यासाठी पुष्कळ मोठा संघर्ष हिंदूंनी केला आहे. अयोध्येत कारसेवा करत असतांना पोलिसांनी क्रूरपणे या कोठारीबंधूंनी गोळ्या घालून हत्या केली. कोठारीबंधूंसारख्या अनेक हिंदूंच्या बलीदानातून अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर आज उभे राहिले आहे, हे आपण अखंड स्मरणात ठेवायला हवे, असे विचार डॉ. समीर घोरपडे यांनी व्यक्त केले. अयोध्येमध्ये झालेल्या प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
शहरातील एस्.टी. स्टॅण्डसमोरील जागेमध्ये प्रभु श्रीरामांची भव्य प्रतिकृती उभारून दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाची ही प्रतिकृती सध्या विशेष आकर्षणाचा, चर्चेचा विषय झालेला आहे. यामुळे सगळ्यांच्या मुखामध्ये ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’ हा एकच शब्द आहे. या वेळी बजरंग दलाचे सर्व बजरंगी आणि उपस्थित नागरिक यांनी अयोध्येतील कारसेवेमध्ये बलीदान केलेल्या कोठारी बंधूना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रम पार पाडण्यासाठी बजरंग दलाच्या वतीने अपार कष्ट घेण्यात आले.