…ही तर हिंदु राष्ट्राची पहाट !

‘अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या वादाचा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि एक मर्यादित का होईना; पण आशा पल्लवित झाली. पुढे अनेक अडथळ्यांना तोंड देत अयोध्येतील श्रीराममंदिर आकाराला आले. निश्चित दिनांक ठरला. सर्वत्र निमंत्रणे गेली. त्या दिवशी ‘आम्ही (अधिवक्ते) न्यायालयात येऊ शकणार नाही; म्हणून आमची न्यायालयीन प्रकरणे पुढे ढकलावीत’, अशी सर्वसमावेशक विनंती ही निरनिराळ्या न्यायालयात करण्यात आली. अशा वेळी ‘२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या कालावधीत सर्व केंद्र शासकीय कार्यालये बंद रहातील’, असा आदेश पहाण्यात आला आणि एक सुखद धक्का बसला.

१. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये प्रथमच हिंदूंच्या देवतेच्या प्राणप्रतिष्ठेसाठी शासकीय सुटी घोषित !

आतापर्यंत धार्मिक कारणावरून दिल्या जाणार्‍या सुट्या या केवळ स्थानिक महत्त्वानुसार तेवढ्या विशिष्ट तालुका किंवा जिल्ह्यांपुरत्याच दिल्या जात असत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ही पहिलीच अशी सुटी की, जी धार्मिक कारणावरून आणि त्यातही हिंदूंच्या देवतेच्या प्राणप्रतिष्ठेसाठी दिली जात आहे. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रासहित इतरही काही राज्यशासनांनी सुटी घोषित केली. त्यात भर म्हणून ‘शेअर बाजार’ही (समभाग विक्री बाजारही) २२ जानेवारीला बंद राहिल’, असेही घोषित करण्यात आले. हे एका मागून एक समोर येत असतांना एक गोष्ट नव्याने हळूहळू माझ्यासमोर येत गेली.

(पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

२. केंद्र आणि बहुतांश राज्यशासने यांच्याद्वारे एकप्रकारे प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला मान्यताच !

गेली अनेक वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून हिंदु जनजागृती समिती ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करत आहे. त्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर काळानंतर प्रथमच हिंदु राष्ट्र संकल्पनेला चालना मिळत आहे. भारतभरातूनच नव्हे, तर जगभरातून ‘हिंदु राष्ट्राची प्रेरणा’, हा विचार सर्वत्र पसरवला जात आहे. समितीचे आतापर्यंतचे सर्व कार्य भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत संयमितरित्या पार पडले. ‘हिंदु  राष्ट्राच्या संकल्पनेची वाटचाल चालू असतांना केंद्र आणि बहुतांश राज्यशासने अन् स्वायत्त संस्था यांनीही या राष्ट्रीय पातळीवरील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या कारणावरून सुटी देतांना एकप्रकारे या कार्यक्रमाला मान्यताच दिली आहे’, असे माझ्या मनाला वाटते. ‘ही हिंदु राष्ट्र स्थापनेची पहाट आहे’, असे माझे भाबडे अंतर्मन मला सांगत आहे.

३. भारतवर्षाचा आत्मविश्वास जागा होऊन तो जगाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे !

हा प्रश्न मी केवळ एवढ्या हळव्या भावनेपुरता मानत नाही. धर्माच्या नावावर अखंड देशाचा भाग तोडून मागितला. ‘ते (पाकिस्तान) वेगळे राष्ट्र झाले. मग हिंदु राष्ट्र का नाही ?’, हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडला होता. हिंदूंमध्ये वेगळ्या राष्ट्राची भावना निर्माणच होऊ नये, यासाठी शालेय अभ्यासक्रमापासून सर्व क्षेत्रांत जाणीवपूर्वक उपक्रम राबवण्यात आले. हिंदूंमध्ये अपराधीपणाची एक खोटी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू होता. त्यावर मात करून ‘हा आपला देश आहे’, ‘हे आपले राष्ट्र आहे’, अशी भावनिक ज्योत प्रत्येकांच्या मनात तेवण्याला प्रारंभ झाला आहे. सहस्रो वर्षांचा इतिहास असलेले हे भारत राष्ट्र, ज्याचा गेल्या २ सहस्र ५०० वर्षांचा इतिहास हा लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, अशा भारतवर्षाला मधल्या काही शेकडो वर्षांच्या इतिहासाचा दाखला सतत देऊन त्याच्या आत्मविश्वासावर केल्या गेलेल्या जखमा आता भरून आलेल्या आहेत. मधल्या काळात आलेली ग्लानी आता दूर झालेली आहे. भारतवर्षाचा आत्मविश्वास जागा होऊन तो आता जगाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे.

प्रसिद्ध कवी सुदर्शन फाकिर यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘चलती राहों में यूंही आंख लगी हैं ‘फाकिर’. भीड लोगों की हटा दो कि मैं जिंदा हूं अभी ।’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) सुधाकर चपळगावकर, निवृत्त न्यायाधीश, संभाजीनगर. (२१.१.२०२४)