मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त !
पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चाच्या मार्गावर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह २ पोलीस उपायुक्त, ६ साहाय्यक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १२३ साहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक, १ सहस्र पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्या, दंगल नियंत्रक पथक तसेच गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात असणार आहेत. नगर रस्ता मार्गे हा मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे. २३ जानेवारी या दिवशी मोर्चा खराडी वाघोली परिसरात आर्.के. फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्कामी असेल. तेथे प्रसाधनगृह, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.