भारत ‘हिंदु राष्ट्र’ होण्याची अधिष्ठात्री देवता ‘श्रीराम’ असून श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण हे त्याचे प्रयोजन असणे !
‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण आणि श्रीराममूर्तीची पुनर्स्थापना झाली असल्याने संपूर्ण भारतवर्षात आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण आहे. भारतातील सर्व मंदिरांत उत्सव आणि श्रीरामाच्या नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. या वातावरणामुळे काही वर्षांपूर्वी मला आलेल्या अनुभूतींचे स्मरण झाले. त्या अनुभूती आणि श्रीराममंदिर निर्माणाचा भारत ‘हिंदु राष्ट्र’, होण्यासाठी होणारा लाभ येथे दिला आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा चेहरा आवडत नसला, तरी त्यांचे कार्य आणि कार्याची मोठी व्याप्ती पाहून त्यांच्याकडे आकर्षित होणे
वर्ष २००० मध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून माझ्या साधनेला आरंभ झाला. तेव्हा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी ठाऊक होते. मी त्यांचे छायाचित्र पाहिले, तेव्हा मला त्यांचा चेहरा आवडला नव्हता; पण देवाने, म्हणजे श्री गुरूंनीच मला साहाय्य केले. श्री गुरूंनी माझी सात्त्विक बुद्धी जागृत केल्यामुळे माझे विचारचक्र चालू झाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे कार्य आध्यात्मिक आणि सात्त्विक आहे. मग मला त्यांचा चेहरा न आवडण्याचे कारण काय असावे ? यामागे काहीतरी गूढ असावे’, असे मला वाटले. त्यानंतर वर्ष २००२ मध्ये पुणे येथे सनातन संस्थेने ‘सर्व संप्रदाय सत्संग सोहळा’ आयोजित केला होता. त्या सोहळ्याची मोठी व्याप्ती पाहून मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडे आकर्षित झालो. तेव्हापासून माझी साधना चांगली होऊ लागली आणि मी सेवाही केली पाहिजे’,असे मला वाटले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी आलेली अनुभूती
२ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शरीर विशाल असून ते ‘धनुर्धारी श्रीराम’ आहेत’, असे जाणवणे : त्यानंतर एकदा मी माझ्या कार्यालयीन कामानिमित्त मिरज येथे गेलो असतांना मिरज येथील सनातन संस्थेच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मिरज आश्रमात वास्तव्याला होते आणि आश्रमात काही धार्मिक गोष्टींचे चित्रीकरण चालू होते. मला आश्रमात पुष्कळ चैतन्य जाणवल्यामुळे ‘नामजप करत तेथील चैतन्य ग्रहण करावे’, असे वाटले. नंतर साधकांनी मला चित्रीकरण चालू असलेल्या ठिकाणी बोलवल्यामुळे मी ते चित्रीकरण पहायला गेलो. परात्पर गुरु डॉक्टर तिथे आल्यावर माझ्याकडून नकळत त्यांच्याकडे पाहून हात जोडले गेले आणि प्रार्थना झाली, ‘आता येथे जे काही चालू आहे, ते सर्व मला समजू दे.’ त्या क्षणी त्यांच्याकडे पहातांना मला ‘त्यांचे शरीर विशाल दिसून ते ‘धनुर्धारी श्रीराम’ आहेत’, असे जाणवले. तेव्हा माझ्या मनात कुठलीही संकल्पना नव्हती कि मी भ्रमित झालो नव्हतो किंवा मी भावनेच्या आहारीही गेलो नव्हतो. मला जे जाणवले, ते फारच आश्चर्यकारक होते. त्या दिवसापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी कधी किंचितही शंका तर आली नाहीच; उलट माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर दुणावला.
२ आ. धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी भगवंत अवतार घेत असणे : मनुष्यजीवनात धर्म फार महत्त्वाचा असून ‘धर्माला ग्लानी आल्यावर त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मी (भगवान श्रीकृष्ण) अवतार घेतो’, हे श्रीकृष्णाने स्वतःच गीतेमध्ये अध्याय चौथा, श्लोक सातवा अन् आठवा यांमध्ये सांगितले आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। ४-७ ।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ४ (श्लोक ७)
अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा र्हास आणि अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. ।। ४-७ ।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।। ४-८ ।।
– श्रीमद्भगवद्गीता अध्याय ४ (श्लोक ८)
अर्थ : सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रगट होतो. ।। ४-८ ।।
या उक्तीप्रमाणे ‘धर्मस्थापनेसाठी अवतार होतात’, हे माझ्या लक्षात आले आणि मला ‘गुरुदेव श्रीरामाचे अवतार आहेत’, असे दृढतेने जाणवले. त्यानंतर वर्ष २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात झालेल्या नाडीपट्टी वाचनात महर्षींनी डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असे सांगितले.
३. वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांनी श्रीराममंदिराविषयी दिलेला पूर्वसंकेत !
वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु कालिदास देशपांडे बर्याचदा सांगत, ‘सध्या भारतवर्षामध्ये श्रीविष्णूचे किंवा श्रीकृष्णाचे नामस्मरण चालू आहे; पण वर्ष २०२४ पासून पुढे पूर्ण भारतवर्षात श्रीरामाचे नामस्मरण चालू राहील.’ २२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्रीरामललाची (श्रीरामाचे बालरूप) पुनर्स्थापना झाली. त्यामुळे आता खरोखरच सर्व भारतवासियांच्या मनी, हृदयी, ओठी श्रीरामनाम गुंजत आहे. यावरून ‘संत त्रिकालज्ञानी असल्यामुळे त्यांनी तो पूर्वसंकेत दिला होता’, असे आता माझ्या लक्षात आले.
४. भारत ‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी श्रीरामाच्या अनुसंधानात राहून प्रयत्न करणे आवश्यक !
अयोध्येतील श्रीरामाचा सोहळा अवर्णनीय झाला ! गावोगावी श्रीरामाचे चिंतन-स्मरण होऊन तो संपूर्ण दिवस पूर्ण चैतन्यमय झाला. त्यामुळे भारतवर्षाला आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी श्रीरामाकडून अनमोल आशीर्वादाचे बळ प्राप्त झाले. आतापर्यंत अनेक लोकांनी श्रीराममंदिराच्या निर्मितीसाठी आत्मसमर्पण केले; म्हणूनच श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेचे दिव्य दृश्य आज आपण पाहू शकलो. आपण सर्वांनी श्रीराम, श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णु यांचे स्मरण करून राष्ट्राच्या उद्धारासाठी प्रयत्न केल्यास भारत ‘हिंदु राष्ट्र’ हाेण्यास साहाय्य होईल.
५. आताच्या पिढीला अयोध्येला श्रीराम मंदिरासाठी झालेला तीव्र संघर्ष आणि आता होणारी श्रीराममंदिराची पुनर्स्थापना पहाण्याचे भाग्य लाभणे
आमच्या आताच्या पिढीने अयोध्येत श्रीराममंदिरासाठी जे हुतात्मे झाले, तो काळ बघितला आणि आता अयोध्येत श्रीराम मंदिराची पुनर्स्थापना होतांना पाहिली. त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत. ‘हे कार्य विघ्नरहित होऊन भारत ‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी श्रीरामाचे आशीर्वाद मिळावे’, अशी आपण सतत प्रार्थना करूया.
‘सनातन संस्थेच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांसाठी आम्हाला काही प्रमाणात योगदान देण्याचे भाग्य लाभत आहे’, यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा.
|