…प्राणप्रतिष्ठेनंतर !
श्रीराम सप्ताह विशेष ! (भाग ७)
अंतिमतः रामलला (श्रीरामाचे बालकरूप) अयोध्यापुरीत विराजमान झाले आहेत ! भारतासह संपूर्ण विश्वात सध्या ‘राम लाट’ पसरली आहे ! प्रत्येक रामभक्ताने श्रीरामाच्या चरणी त्याची भक्ती त्याच्या परीने अर्पण केली. लाखो जण कुठल्या ना कुठल्या अंगाने या सोहळ्यात सहभागी झाले आणि उर्वरित जनतेने त्यांच्या स्थानिक ठिकाणी अत्यंत उत्साहात हा सोहळा साजरा केला. श्रीराम वनवासातून परत आल्यानंतरचे उत्साही, आनंदी वातावरणच जणू जनतेने त्यांच्या त्यांच्या भावानुसार अनुभवले. विलोभनीय मूर्ती, भव्य दिव्य मंदिर, डोळ्यांचे पारणे फेडणारा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हे सारे अनुभवल्याने आता सर्वांनाच अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे !
रामलला प्रत्येकाच्या घरी येणार; म्हणून ‘किती सिद्धता करू आणि किती नको’, असे अनेकांना झाले. अनेक जण म्हणाले, ‘दिवाळीपेक्षाही वेगळे वातावरण वाटत आहे.’ विरोधकांसह सर्वांचाच प्रवास हा ‘राम’नामाच्या प्रचंड मोठ्या सकारात्मक ऊर्जेकडे होतांना दिसत आहे. हनुमानासारखी दास्यभक्ती करून प्रत्येकालाच श्रीरामाला आपल्या हृदयमंदिरात विराजमान करण्याचा उत्कटभाव साधना करणार्यांमध्ये निर्माण झाला आहे. ‘हा भाव प्रत्यक्षात उतरवण्याची संधी श्रीरामाने स्वतःच दिली आहे’, असेही रामभक्त अनुभवत आहेत. जागोजागी झालेले ‘श्रीराम नामसंकीर्तन सप्ताह’, ‘श्रीरामरक्षास्तोत्र पठण’, यज्ञविधी, श्रीरामाच्या गाण्यांची धून, सर्वत्र ‘श्रीरामाचा जयघोष’ आदींमुळे सार्यांच्या मनात आता ‘राम’नाम नकळत जाऊन बसले आहे ! रामनामातील शक्ती इतकी मोठी आहे की, जनता तिच्या दैनंदिन समस्या, दुःख विसरून केवळ श्रीरामासाठी एकत्र येऊन राममय झाली. (अगदी विरोधकांनाही विरोध करण्यासाठी तरी नाईलाजाने का होईना, श्रीरामाचे नाव घ्यावे लागले !) मूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर एक मोठी सकारात्मक ऊर्जा आपोआपच सर्वत्र निर्माण होत असल्याचे अनेक रामभक्त अनुभवत आहेत ! सर्वांना एक प्रकारचे समाधान वाटत आहे. हीच कदाचित् हिंदूंच्या पुढच्या राष्ट्र-धर्म कार्याची ऊर्जा आहे. पंतप्रधानांनीही कठोर अनुष्ठान आणि देशभरातील विविध श्रीराममंदिरांत जाऊन दर्शन घेऊन स्वतःच्या उदाहरणांतून धर्माचरणाचा संदेशच सर्वांना दिला आहे.
आता निर्माण झालेली रामनामाची ऊर्जा अशीच पुढे वाढवत रहाणे, हे हिंदूंचे दायित्व आहे. प्रत्येक देशवासियाने त्याच्या ‘हृदयमंदिरात’ रामाला विराजमान करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्याला त्याचे घर आणि मन दोन्ही स्वच्छ, निर्मळ अन् शुद्ध करायला हवे, तरच देव तिथे वास करील. त्यामुळे रामनामाच्या सकारात्मक ऊर्जेचे आत्मिक ऊर्जेत रूपांतर होईल. प्रत्येकाच्या मनातील सर्व नकारात्मकता, म्हणजे षड्रिपु (काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर) न्यून झाले की, एकूणच वातावरणातील सकारात्मकता वाढेल. हीच ऊर्जा पुढे रामराज्यात परावर्तित होईल.
गेल्या काही दिवसांत सारा देश राममय झाला होता, तरीही कुणी श्रीरामाविषयी अपशब्द काढत होते. एवढेच नव्हे, तर प्राणप्रतिष्ठा सोहळा अजून पूर्णही होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात ४ ठिकाणी धर्मांधांनी दंगलसदृश वातावरण निर्माण केल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आले. रामभक्तांतील आत्मिक ऊर्जाच अशा रावणरूपी आसुरी शक्तींच्या निर्दालनार्थ उभी राहू शकते; अर्थात ती वाढवण्यासाठी रामभक्ती वाढवणे, हे हिंदूंचे आता प्रथम ‘स्व’ आणि ‘राष्ट्र’ कर्तव्य आहे. हिंदूंनी प्रतिदिन रामभक्ती वाढवली, तर श्रीराममंदिरासारखेच रामराज्य येण्याचे स्वप्नही निश्चितच पूर्ण होईल, यात शंका नाही !
जय श्रीराम ।
– सौ. प्रज्ञा जोशी, सनातन संकुल, देवद, पनवेल.
(समाप्त)