श्रीराम : धर्मसंस्कृती रक्षक !
प्रभु श्रीरामाचे नाव घेताच डोळ्यांपुढे उभी रहाते ती मूर्ती एका स्वयंभू पूर्णपुरुषोत्तमाची ! किमान ८ ते १० सहस्र वर्षांनंतरही तीच मूर्ती तशाच स्वरूपात मनःचक्षूपुढे उभी ठाकते. प्रभु श्रीरामाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सांस्कृतिक वारसा आपल्याला दिला. हा अनमोल ठेवा सहस्रो वर्षे आपण जतन केला. ही सुंदर प्रक्रिया आपल्या संस्कृतीचे असामान्यत्व दर्शवते. पुरातन इतिहासाचा हा दुवा आधुनिक काळाशी जुळवून घेत वाटचाल करायला शिकवण्याचे भाग्य सगळ्याच देशांच्या ललाटी नसते. त्यामुळे जगातील कित्येक देशांची स्थिती ‘न घर का, न घाट का’, अशा प्रकारे सैरभैर झालेली आढळते. अशा स्थितीचा विकृत परिणाम, म्हणजे तेथील नागरिकांची अधांतरी अवस्थेत मार्गक्रमण करणारी मनःस्थिती ! या सगळ्याचा परिणाम, म्हणजे भयावह दिशेने जाणारा सांस्कृतिक प्रवाह ! त्या तुलनेत आम्हा भारतियांना श्रीरामाच्या आदर्शवत् आयुष्याच्या पुण्याईने ठामपणे स्थिरावलेली समाजरचना मिळाली. खरे म्हणजे हे आपले भाग्य !
१. भारतीय समाजरचना श्रीरामाच्या आदर्शवत् आयुष्यावर आधारित !
तसे पहाता देश किंवा संस्कृती या शब्दांचा नेमका अर्थ कोणता ? एखाद्या भूभागावर वास्तव्य करणार्या माणसांची वैचारिक समानता म्हणजेच सांस्कृतिक धारणा ! मनाच्या खोल दरीमध्ये ते समानत्व त्या माणसांना प्रत्येक क्षणी आशेचा किरण दाखवणारे असावे. जीवन तापामध्ये जगण्याची तृष्णा भागवणारे हे तत्त्व तेथील व्यक्तींचा स्वाभिमान जागवण्याजोगे असावे. अशा वास्तवाच्या स्थिर पायावर मनुष्य समूहाचे आयुष्य किती सुसह्य होत जाते. संस्कृतीची महानता पटवणारा हाच तो दुवा ! श्रीरामाच्या आदर्शवत् आयुष्यावर आधारित घडलेली आपली समाजरचना आहे. ती अशीच सहजासहजी घडत आलेली नाही. सहस्रो वर्षांच्या प्रक्रियेची ती फलनिष्पत्ती आहे. येथील जनतेचा त्याग आणि बलीदान यांच्या आधारे तिची उभारणी झालेली आहे. ज्ञात-अज्ञात असा हा इतिहास एकसंघ देशाची स्वप्ने पहाणार्या देशवासियांच्या हृदयांच्या आकांक्षाची ही फलश्रुती आहे. आमच्या बहुतांश भारतियांना बाबर नावाच्या आक्रमकाने श्रीरामाचे अयोध्येतील पुरातन मंदिर ध्वस्त केल्यानंतरचा सुमारे ५०० वर्षांचा रणधुमाळीचा घटनाक्रम तेवढा ठाऊक आहे; परंतु भारताबाहेरून आलेल्या आक्रमकांखेरीज येथील गद्दारांनी श्रीरामाच्या उत्तुंगतेला केलेला विरोध, तो इतिहासाच्या पोटामध्ये गडप झालेला असला, तरी तो काळ नावाच्या पटलावर निश्चितपणे कोरला गेलेला आहे. एखाद्या उच्च विचारसरणीला पराकोटीचा विरोध; परंतु सर्वसामान्य जनतेचा खोल हृदयापासून पाठिंबा ! ही प्रक्रिया काळाच्या साक्षीने घडत आलेली आहे. श्रीरामाचे उत्तुंग व्यक्तीमत्त्व भारतियांच्या हृदयपटलावर सहस्रो वर्षांपासून कोरले गेलेले आहे. साहजिकच जनमानसाने त्याची ‘राष्ट्रपुरुष’ या नात्याने प्रतिष्ठापना कधीच करून ठेवलेली आहे. श्रीरामाचा असीम त्याग, त्याची कुटुंबियांच्या प्रति असलेली निष्ठा, एक पत्नीव्रत, एकवचनी, अशा अनेक गुणांची भव्यता, दिव्यता काळाच्या तराजूमध्ये नेहमी वरचढ ठरलेली आहे. हे गुण संस्कृतीच्या उभारणीमागचे प्रमुख स्तंभ आहेत, हे आम्ही आजही अनुभवतो आहोत. सहस्रो वर्षांच्या भारतीय समाजरचनेचा प्रवाह त्याच स्तंभांच्या आधारे वाटचाल करत आलेला आहे. मनुष्याच्या उच्चतम वाटचालीला प्रभु श्रीरामाने स्वतःच्या जीवनाने आणि आदर्शांनी दिशा दिली आहे. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या गुणविशेषांचा तिला कायम आधार मिळत रहाणार आहे. पृथ्वीचे अस्तित्व अबाधित असेल, तोवर ही प्रक्रिया मानवाच्या अस्तित्वाला साथ देणारी ठरणार आहे.
२. श्रीराम हे एकत्र कुटुंबव्यवस्थेचे जगातील एकमेव उदाहरण !
श्रीराममंदिर आक्रमकाने पाडणे, ५०० वर्षांनंतर मंदिराची पुनश्च उभारणी होणे, त्या आधारे हिंदु धर्माची पुनर्स्थापना जगभरात झालेली याची देही आपण पहात आहोत. ‘हे सारे विधीलिखित घडणारच होते’, इतक्या संकुचित वृत्तीने आपण या घटनाक्रमाकडे पहाणार आहोत का ? असे हे महान कार्य घडण्याची प्रक्रिया त्या कामी लागणारी ऊर्जा, ही या देशाच्या पुण्यवान नागरिकांनी दिली आहे. त्यांच्या सत्कर्माद्वारे उभारणी झालेल्या पुण्याईची ही कमाई आहे. हे सारे आपण दुय्यम ठरवू शकत नाही. खरे तर विधीलिखिताप्रमाणे झालेली मंदिरे पुनर्स्थापना, हिंदु धर्माची जगभरात होत असलेली दैदीप्यमान स्थिती यांमागे एकत्रित त्या पुण्याईचेच अधिक योगदान आहे. आपल्या कुटुंबव्यवस्थेचे आपण उदाहरण घेऊया. तिचा पाया श्रीरामाचा उत्तुंग त्याग आणि साधना यांमुळे घातला गेला आहे. त्याच त्यागाच्या आधारे देशाच्या बांधणीत एकजिनसीपणा प्रत्यक्षात घडत आला आहे. श्रीराम हे एकत्र कुटुंबव्यवस्थेचे जगातील एकमेव उदाहरण आहे. जगभरातील राजांनी, महान व्यक्तीमत्त्वांनी केलेल्या लढायांचा इतिहास हेच तेवढे आपण आतापर्यंत वाचत आणि ऐकत आलेलो आहोत; परंतु मानवाच्या अस्तित्वाचा जो मुख्य पाया, त्या कुटुंबव्यवस्थेचे बीज जे श्रीराम अन् त्यांच्या जीवनकाळात रोवले गेले, त्याचा वटवृक्ष झालेला आज भारत देशाच्या रूपामध्ये उभा ठाकलेला आपण बघत आहोत. स्वतःच्या कर्तबगारीने पूर्ण जगाला घालून दिलेला हा पाठ असून त्याचे अनुकरण करण्यात संपूर्ण जगाचे, मानवजातीचे भले आहे.
३. पुनश्च श्रीरामाच्या नीतीनियमांचा पुरस्कार करणे आवश्यक !
२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संस्कृतीविषयक सहस्रो वर्षांची वाटचाल आणि धारणा यांवर कमालीचे आघात झाले. प्रामुख्याने डळमळीत झालेली आपली कुटुंबव्यवस्थेला, दिवसेंदिवस वाढत जाणार्या घटस्फोटांची संख्या, या गोष्टी कुटुंबव्यवस्थेला अधिक जीर्णावस्थेत नेत आहेत. त्यासह ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या संस्कृतीबाह्य प्रकारांमध्ये सतत होणारी वाढ समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे ? निश्चितच हे प्रश्न संस्कृतीरक्षक देशप्रेमी नागरिकांना अधिक चिंताग्रस्त करून सोडत आहेत. श्रीरामाच्या कणखर कृतीतून साकारलेली आपली कुटुंबविषयक धारणा ! त्या धारणेस वरील प्रकारामुळे कमकुवतपणा येत आहे. एक प्रकारे आपल्या संस्कृतीचा पाया डळमळीत करणारी, आपल्याच लोकांमध्ये फोफावत जाणारी ही असभ्य वृत्ती असून तिला वेळीच आवर घालायला हवा. आपल्या संपूर्ण समाजरचनेस निष्क्रीय करून टाकण्याजोगी शक्ती त्या वृत्तीमध्ये सामावलेली आहे. हा धोका आपण लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. त्यातल्या त्यात दिलासा देणारी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेची घटना असून पुनश्च श्रीरामाच्या नीतीनियमांचा पुरस्कार करत संस्कृतीच्या वाटचालीस बळकटी देणार्या घटनांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे. असे झाले, तरच पुनश्च आपल्या संस्कृतीला बळकटी आणण्याजोगी स्थिती देशांमध्ये निर्माण होऊ शकते. रामराज्य स्थापनेस चालना देणार्या कार्याची खर्या अर्थाने प्रत्यक्षात कार्यवाही होणे आता आवश्यक वाटते. एका अर्थाने प्रभु श्रीरामाचे अपूर्ण राहिलेले कार्य त्याच्याच शुभाशीर्वादाने या देशांमध्ये प्रस्थापित होऊन तुमच्या आमच्या सामूहिक प्रयत्नांना यश देतांना आपल्या संस्कृतीप्रती समाविष्ट असलेली, प्रत्यक्ष श्रीरामाचीच जाज्वल्य निष्ठा याकामी यश देत राहील. याविषयी विश्वास बाळगून आपण प्रत्येकाने प्रयत्नवादी बनणे आवश्यक आहे.
– श्री. महेश पारकर, शिरोडा, गोवा.