धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांच्या कृतीशील सहभागामुळे पुणे येथील ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामाचा जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना आदींमुळे अवघे वातावरण राममय !
पुणे – अयोध्येतील श्रीराममंदिरात होत असलेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले. यात श्रीरामाचा जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, रामरक्षास्तोत्र पठण करण्यात आले, तसेच उपस्थितांना श्रीरामाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. हे अभियान कोथरूड, हडपसर, विश्रांतवाडी, राजगुरुनगर, जुन्नर, कात्रज, सिंहगड रस्ता, पाली, भोसरी, तळेगाव, तुळशीबाग, घोडेगाव, मंचर, प्राधिकरण, वल्लभनगर यांसह जिल्ह्यातील विविध मंदिरे, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, सनातन संस्थेचे हितचिंतक, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार यांच्या घरी राबवण्यात आले. या उपक्रमात समाजातील धर्मप्रेमी, तसेच तरुणांसह लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. समाजातील धर्मप्रेमींना उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रामरक्षास्तोत्र पठण, श्रीरामनाम जपाचे आयोजन केले होते. समाजातील कित्येक धर्मप्रेमींनी स्वतःहून नामपट्टी आणि श्रीरामाचे चित्र यांचे वितरण केले.
नामजप केल्यावर अनेक भाविकांनी ‘आनंद मिळाला’, ‘प्रभु श्रीरामाचे चैतन्य अनुभवता आले’, असे सांगितले. या दिवशी हिंदूंनी घरोघरी श्रीरामाची मूर्ती किंवा चित्र यांचे पूजन करून दाराबाहेर पणत्या लावणे, सात्त्विक रांगोळी काढणे, घरावर भगवा ध्वज फडकावणे अशा कृती भावपूर्ण केल्या.
सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि रामरक्षास्तोत्र लघुग्रंथाचे वितरण !
प्रभु श्रीरामतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी श्रीरामाची माहिती देणारे लघुग्रंथ, सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामपट्टीचे पुणे जिल्ह्यात भाविकांना वितरण करण्यात आले. नामपट्टीचे महत्त्व सांगितल्यामुळे त्याला समाजातून उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात अनेक नामपट्ट्यांचे वितरण झाले. या प्रसंगी ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला’ विशेषांकाचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले.
पुणे येथे सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे भावपूर्ण पूजन करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. मोरेवस्ती येथील धर्मप्रेमी सौ. सुवर्णा भोसले यांनी या वर्षी श्री रामलला विशेषांक, नामपट्टी आणि श्रीरामाची चित्रे हळदी-कुंकवाला वाण म्हणून समाजात दिली.
२. हडपसर येथे भाजपचे काळेपडळचे माजी नगरसेवक श्री. मारुति आबा तुपे यांनी श्रीराममंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर सदिच्छा भेट दिली.
३. तुळशीबाग, डहाणूकर कॉलनी (कोथरूड), हडपसर, चिंचवड येथे लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
४. गोकवडी-भोर येथील युवक आणि युवती यांनी ४ मंदिरांमध्ये कणकेचे दिवे लावून, रांगोळी काढून उत्साहाने दीपोत्सव साजरा केला.