अयोध्येतील श्रीराममंदिर उभारणी आणि हिंदुत्व यांविषयी साधूसंतांचे कार्य !
आम्हा हिंदु धर्मियांना एक अत्यंत वाईट सवय आहे ती म्हणजे विस्मरणाची ! आज काल नवहिंदुत्वनिष्ठ ऊठसूठ विचारत आहे, ‘शंकराचार्य, साधू, संन्यासी या लोकांनी श्रीराममंदिर आणि हिंदुत्व यांकरता काय केले ? आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा नसतो. त्याकरता परिश्रम घ्यायचे नसतात. स्वतःच्या हातात भ्रमणभाष मिळाला की, टंकलेखन करून वाटेल ते प्रश्न विचारून टिंगलटवाळी करणारे आणि प्रश्न विचारणारे यांच्याकरता हा लेख आहे.
१. धर्मसम्राट करपात्रीस्वामी, राजा पाटेश्वरी प्रसाद सिंह, महंत दिग्विजयनाथ आणि के.के. नायर यांनी चालू केले श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन !
ब्रह्मीभूत धर्मसम्राट करपात्रीस्वामी हे अत्यंत कर्मठ आचरण संपन्न संन्यासी होते. स्वातंत्र्यपूर्व काळात गोंडा जिल्ह्यातील बलरामपूर येथील संस्थानिक राजा पाटेश्वरी प्रसाद सिंह होते. धार्मिक स्वभाव आणि टेनिस खेळावर विशेष प्रेम असलेल्या या राजेसाहेबांच्या राज्यात अनेक यज्ञयाग अन् धर्मशास्त्र चर्चा होत असत. अनेक साधूसंत विद्वान तेथे येत असत. तिथे एकदा धर्मसम्राट करपात्रीस्वामीजी आणि राजेसाहेब यांची गाठ पडली अन् स्नेहभाव निर्माण झाला. साधारणपणे वर्ष १९४७ चा प्रारंभ असेल. त्या वेळी ‘श्रीरामजन्मभूमी मुक्त केली पाहिजे’, याकरता कायदेशीर आणि जनआंदोलन यांद्वारे लढा उभारावा’, असे ठरले. त्या वेळचे गोरक्षपीठाचे विद्यमान पीठाधीश महंत दिग्विजयनाथ आणि तत्कालीन फैजाबाद, म्हणजे अयोध्येचे जिल्हा न्यायाधीश असणारे के.के. नायर या समविचारी अन् धर्माभिमानी हिंदु बांधवाची या उपक्रमाला मोलाची साथ मिळाली. ‘स्वातंत्र्य लढा चालू होताच त्यासह श्रीरामजन्मभूमी मुक्त करावी’, असे ठरले. विशेष म्हणजे महंतजी आणि राजेसाहेब हे दोघे लॉन टेनिसचे उत्तम खेळाडू होते. नायरसाहेब हेही उत्तम टेनिस खेळत. टेनिस आणि धर्मप्रेम या गोष्टींमुळे या तिघांची उत्तम मैत्री झाली ती करपात्रीस्वामींसारख्या आचरण संपन्न अन् तपोनिष्ठ विद्वानांमुळे. २२ आणि २३ डिसेंबर १९४९ या दोन दिवशीच्या रात्री श्रीरामजन्मभूमी येथे भगवान श्रीराम अन् अन्य मूर्ती प्रकट झाल्या त्या या ४ महानुभावांमुळेच !
२. धर्मसम्राट करपात्रीस्वामी यांनी ‘हिंदु कोड बिल’ विरुद्ध केलेले आंदोलन आणि त्यांना झालेली अटक
‘स्वातंत्र्यानंतर भारतात हिंदु धर्मियांची धर्मस्थळे यवनांच्या (मुसलमानांच्या) दास्यातून मुक्त झाली पाहिजेत, गोवंश रक्षण झाला पाहिजे’, असा आग्रह धर्मसम्राट करपात्रीस्वामी यांनी धरला आणि या आंदोलनाला प्रचंड लोकाश्रय अन् उत्तर भारतातील काही भागांत राजाश्रय मिळाला. त्या वेळी संपर्क साधने फार नसतांनाही उत्तर भारत, राजस्थान, देहली, गुजरात वगैरे प्रांतात आंदोलन वाढू लागले. वर्ष १९४८ मध्ये स्वामींनी ‘रामराज्य परिषद’ नावाचा राजकीय पक्ष हिंदूंसाठी स्थापन केला. फाळणीनंतर लाखो हिंदूंचे शिरकाण, महिलांवरील बलात्कार, मंदिर विध्वंस असे अनेक प्रकार विशेष समुदायाने करूनही त्यांचे प्रचंड लांगूलचालन काँग्रेसने चालू ठेवले होते. हिंदु मंडळी अंधपणे ‘काँग्रेसखेरीज पर्याय नाही’, असे म्हणून नेमस्त वागत होते. अशा वेळी एक ठिणगी पडली, ती म्हणजे हे आंदोलन वर्ष १९५२ च्या निवडणुकीत या पक्षाने ३ जागा मिळवल्या होत्या. पुढील ३ निवडणुकांत जवळपास १२ ते १३ जागा या रामराज्य परिषद पक्षाने मिळवल्या. पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत केवळ हिंदूंसाठी ‘हिंदु कोड बिल’ आणले अन् त्यात बहुपत्नीत्व बंदी वगैरे त्यात समाविष्ट करण्यात आले. स्वामीजींनी यावर आक्षेप नोंदवला, ‘संपूर्ण भारतात एक कायदा हवा. जर हिंदूंना दोन विवाह करण्यासाठी कायद्याने बंदी आणणार, तर हाच नियम मुसलमानांना लावा. नाही तर हिंदूंनाही बहुपत्नीत्व करण्यासाठी अनुमती द्या.’काँग्रेस सरकारने याला विरोध केला, नव्हे तर अनेक हिंदूंनीही करपात्रीस्वामींची खिल्ली उडवली, ‘एक (बायको) सांभाळणे कठीण ! तिथे २-२ (बायका) काय करायच्या आहेत ? हा संन्यासी याला काय कळणार संसार कसा कठीण असतो ते ?’ करपात्रीस्वामी कंठशोष करून सांगत होते, ‘जर यवनांना बहुपत्नीत्व आणि बहुसंतती जन्माला घालण्यासाठी कायदेशीर मुभा दिली आहे; पण हिंदूंना ती नाही. यामुळे पुढील काळात भारतात यवनांचे प्राबल्य वाढेल आणि हिंदु अल्पसंख्यांक होतील. कायदा दोघांना समान ठेवा अथवा दोघांनाही एकच एकपत्नीत्व कायदा आणि संतती नियमन ठेवा.’ आज आता समान नागरी कायदा आवश्यक वाटत आहे; पण वेळ बरीच निघून गेली आहे. करपात्रीस्वामींना आंदोलनाच्या वेळी कारागृहात ठेवण्यात आले. तिथे त्यांच्यावर यवनांकडून मुद्दाम आक्रमण करण्यात आले. त्यामध्ये त्यांचा एक डोळा लोखंडी रॉड खूपसून फोडण्यात आला. आधीचा राग, म्हणजे ‘श्रीरामजन्मभूमीत राम प्रकटले’, याचा राग काँग्रेस सरकारला स्वामींच्या विरुद्ध होताच, तो बाहेर काढला. पुढे मात्र हे आंदोलन अधिक तीव्र झाले. स्वामीजींसह या लढ्यात अत्यंत महत्त्वाचे एक सहकारी शंकराचार्य होते पुरी पिठाचे पूर्वाम्नाय निरंजन देव तीर्थ आणि विद्यमान पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज ! हे तेव्हा कुमारवयीन होते; पण सक्रीय सहभागी होते.
३. संतांनी पुकारलेले आंदोलन इंदिरा गांधी यांनी क्रौर्यतेने चिरडणे आणि धर्मसम्राट करपात्रस्वामींनी दिलेला शाप !
आता पुढे हिंदु महासभा आणि धर्मसम्राट करपात्रीस्वामी यांचा ‘रामराज्य परिषद’ पक्ष यांचे प्राबल्य उत्तर भारतात वाढू लागले. इंदिरा गांधींच्या लक्षात आले की, हळूहळू हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ऐक्य होत आहे आणि सकल हिंदु समाज एक होऊ लागला आहे. हे पाहून आणि येणार्या निवडणुकीत पराभवाची शक्यता लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी संतमंडळींशी संवाद साधला. ‘निवडणुकीत काँग्रेस बहुमताने निवडून आल्यानंतर लगेचच राज्यघटनेत पालट करून संतमंडळींच्या मागण्या मान्य करू’, असे जाहीर आश्वासन इंदिराजींनी दिले. त्यांच्या शब्दावर सर्वांनी विश्वास ठेवला अन् काँग्रेस बहुमताने निवडून येऊन इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. साम्यवादी आणि मुसलमान यांनी मात्र इंदिरा गांधींवर दबाव आणत हिंदूंच्या मागण्या सरळ सरळ धुडकावून लावल्या. जैन साधु, हिंदु महासभा, ४ पीठांचे शंकराचार्य, विविध आखाड्यातील साधूसंत आणि धर्मसम्राट करपात्रीस्वामी यांनी संसदेला घेराव घालून उपोषण करण्याचे जाहीर केले. जैन मुनी सुशीलकुमार, सार्वदेशिक सभेचे लाला रामगोपाल शालवाले, हिंदु महासभेचे प्रधान प्रा. रामसिंहजी यात अग्रेसर होते. तीन संतांनी आमरण उपोषणाला आरंभ केला. ऋग्वेदिय पूर्वाम्नाय पुरी शंकराचार्य निरंजन देव तीर्थ, संत प्रभुदत्त ब्रह्मचारी, महात्मा संत रामचंद्र वीर यांनी आंदोलनात प्राण फुंकले. ७ नोव्हेंबर १९६६, म्हणजेच गोपाष्टमीच्या दिवशी शांततेत संसदेच्या बाहेर शंकराचार्य, साधूसंत आणि हिंदु महासभा यांच्या वतीने आंदोलन चालू होते अन् इंदिरा गांधींनी आंदोलन दडपण्यासाठी निःशस्त्र साधूसंतांवर गोळ्या चालवल्या. सहस्रो साधू मारले गेले, तुरुंगात डांबले गेले, अक्षरशः शंकराचार्यांसह सर्वांवर गोळीबार झाला, अनेक जण जायबंदी झाले, पोलिसांनी प्रचंड मारहाण केली. या आंदोलनात सध्याचे पुरीचे विद्यमान शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती स्वामी सहभागी होते. तेव्हा ते तरुण आणि विद्यार्थी दशेत होते. आंदोलन दडपण्यात आले, तरीही एक साधू आमरण उपोषणावर ठाम राहिले आणि १६६ दिवसांनी त्यांनी प्राण सोडले. त्यांचे नाव होते महात्मा संत रामचंद्र वीर ! तेव्हा हे आंदोलन क्रौर्यतेने संपवले गेले.असे असतांनाही आज अनेक जण विचारत आहेत, ‘शंकराचार्य आणि साधूसंत यांनी काय केले ?’ गोरक्षनाथ पीठाचे महंत अवैद्यनाथ यांनी तर ‘अयोध्येचा शिलान्यास पूर्वास्पृश्य व्यक्तीच्या हाताने करावा’, असे सांगितले आणि त्याप्रमाणे केलेही होते, हेही अनेकांना ठाऊक नाही. धर्मसम्राट करपात्रीस्वामींनी त्याच वेळी इंदिरा गांधी आणि काँग्रेस यांना शाप दिला होता, ‘तुमचा वंश विच्छेद होईल. जसे तुम्ही साधु संतांना बेसावध असतांना ठार मारले तसेच तुम्ही मराल.’ तुम्ही माना अथवा मानू नका, व्रतस्थ आचरण संपन्न संन्याशाचा शाप गांधी घराण्याला बाधला. बाबराने मंदिर पाडल्यानंतर साधूसंत लढतच होते. पुढे धर्मसम्राट करपात्रीस्वामींनी समाधीपूर्वक देहत्याग केला.
४. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरासाठी केलेले कार्य !
हिंदु, गंगानदी, रामसेतू आणि श्रीराममंदिर यांसाठी द्वारका अन् ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती हे लढले. माजी पंतप्रधान राजीव गांधी त्यांचे भक्त होते. राजीव गांधी यांना सांगून दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ मालिका चालू करण्याचा आग्रह स्वामीजींचाच होता. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती हे करपात्रीस्वामींसह आंदोलनात सहभागी होते. त्यामुळे श्रीरामजन्मभूमी आंदोलन शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यासाठी काही नवे नव्हते. पुढे शहाबानो प्रकरण हाताबाहेर गेले. मुसलमानांच्या लांगूलचालनाकरता काँग्रेसला कायदा पालटावा लागला आणि जनमत राजीव गांधींच्या विरोधात गेले. तेव्हा स्वामीजींनी सांगितले, ‘अजून वेळ गेलेली नाही. भगवान श्रीरामांना शरण जा.’ तेव्हा नाईलाजाने का होईना, राजीव गांधींनी वादग्रस्त जागेवर घातलेले कुलुप न्यायालयात सुरक्षेसाठी हमी देऊन उघडले आणि तंबूत श्रीरामाच्या पूजेचा मार्ग मोकळा झाला. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गीत रेडिओवर म्हटले गेले; म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या नोकरीतून काँग्रेस सरकारने काढले होते. अशा विरोधी विचारी लोकांना सांगून सरकारी वाहिनीवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ दाखवायला लावण्यावरून स्वामीजींना अनेकांनी ‘काँग्रेसी चमचा’ असे संबोधले.)
४ अ. प्रमुख संत आणि महंत यांना संघटित करून श्रीराममंदिरासाठी पुन्हा आंदोलन चालू करणे : निर्मोही अणि अन्य काही आखाड्यांतील संत, महंत वर्ष १९८९ मध्ये माघमेळ्यात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडे आले आणि त्यांनी स्वामीजींना सांगितले, ‘आम्ही आता या लढ्याचे नेतृत्व करू शकत नाही. तुम्ही नेतृत्व करावे. आम्ही सोबत आहोत.’ चित्रकूट पर्वतावर ३ जून १९८९ या दिवशी स्वामीजींनी देशभरातील १ सहस्र प्रमुख संत, महंत यांना बोलावले आणि श्रीराममंदिर पुनर्उभारणीचा शंखनाद केला. सहस्रो साधूसंत, त्यांचे शिष्य आणि बैरागी यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. वर्ष १९८९ मध्ये उत्तरप्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होणार होती. स्वामीजींनी वातावरण तापवले होते. ऑक्टोबर १९८९ मध्ये स्वामीजींनी अनेक विद्वान मंडळी, स्थापत्यशास्त्र तज्ञ, शिल्पकार यांच्यासह अयोध्येत दौरा केला आणि मंदिराचे स्वरूप कसे असावे, याचा अभ्यास केला अन् मंदिराची प्रतिकृती बनवली.न्यायालयात श्रीराममंदिराच्या संबंधाने बाजू भक्कमपणे मांडता यावी, याकरता शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी ‘अखिल भारतीय रामजन्मभूमी पुनरुद्धार समिती’ बनवली. या समितीने रामललाची बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडली. श्रीरामजन्मभूमी आंदोलनात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व साधूसंतांना एकत्र आणले. स्वामीजींनी चारही पिठाचे शंकराचार्य एकत्र आणून अनेक आखाडे, शैव आणि वैष्णव संप्रदायाचे साधूसंत एकत्र केले. सर्व द्वैत आणि अद्वैत वादी सर्व पीठाचार्यांना एकत्र केले. ‘मंदिर भव्य दिव्य बनवायचे, तेही शास्त्रशुद्धपणे बनवायचे. एकही राजकीय व्यक्ती मंदिर व्यवस्थापनात नको. कंबोडियातील अंगकोरवाटप्रमाणे भव्य मंदिर लोक आणि संत यांच्या सहभागातून बनवायची त्यांची प्रचंड इच्छा होती. या आंदोलनात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी अनेकदा कारावास भोगला होता.
५. गंगा नदीला ‘राष्ट्रीय दर्जा’ मिळवून देणारे आणि ‘सेतूसमुद्रम् प्रकल्पा’ला विरोध करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती !
गंगा नदीला ‘राष्ट्रीय दर्जा’ काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात मिळाला. त्याकरता आंदोलन स्वामीजींनी केले होते. ‘रामसेतू हा काल्पनिक अथवा मानवनिर्मित नसून तो राष्ट्रीय संस्कृती आहे’, अशी ठाम भूमिका शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांची होती. ‘रामसेतू काल्पनिक नाही. तो तोडून ‘सेतूसमुद्रम् प्रकल्प’ राबवू नका’, असे डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारला ठामपणे सांगून तो प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्यासाठीचा लढा स्वामींनी दिला होता, हे अनेकांना ठाऊक नाही.
६. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आणि केंद्र सरकारचे प्रस्ताव अमान्य करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती !
नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात श्रीरामजन्मभूमी वाद मिटवण्यासाठी २ प्रयत्न झाले. ते म्हणजे ‘मंदिर आणि मशीद बाजूबाजूला उभारून वाद एकदा मिटवून टाकू’, अशी दोन्ही पंतप्रधानांनी सिद्धता दाखवली होती; पण ‘काशीविश्वनाथाप्रमाणे आमच्या श्रीराममंदिराच्या शेजारी मुसलमानांची जागा मशीद आम्हाला मान्य नाही. तो लाखो लोकांच्या बलीदानाच्या त्यागाचा अपमान असेल. श्रीरामजन्मभूमी पूर्णपणे लढून मिळवू. असले तोडगे नकोच’, असे ठाम सांगून बाहेर पडणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीच होते. अलाहाबाद उच्च न्यायालयात ‘रामजन्मभूमीचे त्रिभाजन करावे’, असा निर्णय झाला. ‘तो आम्हाला मान्य नाही. आम्ही शेवटपर्यंत लढून पूर्ण जागा मिळवू’, हे सांगणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीच होते.
अजूनही पुष्कळ लिहिता येईल; पण एवढेच की, ‘शंकराचार्यांनी काय केले ?’, एवढे विचारू नका. आपण या कार्यातील १ टक्का तरी कार्य केले आहे का पहा ? कारण टीका करणे सोपे असते.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (१६.१.२०२४)