श्री रामललाचा एकमेवाद्वितीय असा ११ कोटी रुपयांचा मुकुट !
अयोध्या – हिंदूंना भक्तीची मिळालेली देणगी अद्वितीय नि अलौकिक अशीच आहे. याचा प्रत्यय २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी जगाने प्रत्यक्ष अनुभवला. अर्थात यामागे श्री रामललाची मूर्ती साकारणार्या शिल्पकाराप्रमाणेच त्याचे अलंकार बनवणार्यांची तळमळ आणि भाव ही आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्री रामलला यांच्यासाठी गुजरातच्या सुरत येथून ११ कोटी रुपयांचा रत्नजडित सुवर्ण मुकुट पाठवण्यात आला होता. तो पहातच रहावा, असा डोळ्यात भरून रहाणारा मुकुट होय. भक्ती आणि सूक्ष्म कारागिरीचे प्रतीक असलेली ही भेट सुरत येथील ‘ग्रीन लॅब डायमंड’ आस्थापनाचे मालक मुकेश पटेल यांच्याकडून पाठवण्यात आली आहे.
पटेल सांगतात की, ज्या क्षणी मी प्रभूंसाठी अलंकार अर्पण करण्याच्या शक्यतेविषयी विचार केला, तेव्हाच माझे डोळे पाणावले. तेव्हा माझ्या मनात एकच विचार राहिला, ‘जे काही असेल, ते नेत्रदीपक असायला हवे; कारण राजांचा राजा रामललाच्या माथ्यावर तो विराजमान होणार आहे.’ हा केवळ एक मुकुट नसून भारतातील रामभक्तांची रामाप्रती असलेली श्रद्धा, अढळ विश्वास आणि अतूट भक्ती यांचा पुरावा आहे. यात लक्षावधींची स्वप्ने आणि आशा एकत्रित जोडलेल्या आहेत. आमच्या दोन कारागिरांच्या कामात समर्पणाचा भाव दिसून येत होता. त्यामुळे या मुकुटाची अंतिम झलक ही केवळ पहाण्यासारखी नाही, तर ‘पहातच रहावे’ इतकी सुंदर झाली आहे.
एकमेवाद्वितीय असा हा भगवंताचा मुकुट !
तब्बल ११ कोटी रुपयांचा, ६ किलो वजनाचा आणि ४.५ किलो शुद्ध सोन्याचा हा मुकुट एकमेवाद्वितीय आहे. अगदी बारीक फुलांची कलाकुसर यात करण्यात आली आहे. विविध आकारांचे हिरे, रंगीत माणिके, मोती, नीलम यांसारखी अनेक सुंदर रत्ने यात जडवण्यात आली आहेत. मुकुटाची नक्षी ही यापूर्वी अनेक राजांनी परिधान केलेल्या पारंपरिक मुकुटांप्रमाणेच आहे.