कारसेवकांचा करण्यात आला सत्कार
पाचल (तालुका राजापूर) परिसरात शोभायात्रेला श्रीरामप्रेमींचा उदंड प्रतिसाद !
पाचल, २३ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे अतिभव्य नूतन श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने श्रीरामसेवकांच्या वतीने परिसरात आयोजित केलेल्या शोभायात्रेला श्रीरामप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. सौंदळ-रायपाटण-पाचल-करक या २० किलोमीटरच्या मार्गावर शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेच्या मार्गावरील रायपाटण येथील २ श्रीराममंदिरे, पाचल येथील हनुमान मंदिर आणि करक येथील श्रीराममंदिर या ठिकाणी आरती करण्यात आली.
शोभायात्रेतील अधिकांश श्रीरामप्रेमींनी भगवा पोशाख, जय श्रीराम लिहिलेल्या भगव्या टोप्या आणि गळ्यामध्ये पट्टा परिधान केला होता. वाहनांना श्रीरामाचे चित्र आणि जय श्रीराम लिहिलेले भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण श्रीराममय झाले होते. शोभायात्रेत श्री रामललाची पालखी, चित्ररथ, ढोलवादन पथक यांचा समावेश होता. ३०० पेक्षा अधिक दुचाकी, १० तीन चाकी, २० चार चाकी वाहनांसह दीड सहस्रपेक्षा अधिक श्रीरामप्रेमी सहभागी झाले होते.
कारसेवक श्री. सुहास सप्रे आणि श्री. संतोष कारेकर यांचा सत्कार !
श्री हनुमान मंदिर, पाचल येथे परिसरातील कारसेवक श्री. सुहास सप्रे आणि श्री. संतोष कारेकर यांचा सत्कार श्री हनुमान मंदिराचे पुजारी श्री. भिकू नारकर यांच्या हस्ते करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. सूत्रसंचालन करतांना श्रीरामसेवक श्री. श्रीकृष्ण नारकर म्हणाले की, कारसेवकांच्या असीम योगदानामुळेच आपल्याला आजचा सुवर्णक्षण लाभत आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य ठरते.