Ramlala Jewellery : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील सोनाराने बनवली श्री रामललाची १४ आभूषणे !
लक्ष्मणपुरी (अयोध्या) – श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्री रामललाच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने पाहून प्रत्येक रामभक्ताला त्यांची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा झाली असणार, यात शंका नाही. मूर्तीवरील सर्व आभूषणे लक्ष्मणपुरी येथील ‘एच्.एस्.जे. या आस्थापनाकडून बनवण्यात आली आहेत. सर्व आभूषणे अवघ्या १२ दिवसांत बनवण्यात आल्याची माहिती या आस्थापनाचे मालक अंकुर अग्रवाल यांनी दिली. एकूण १४ आभूषणे बनवण्यात आली आहेत. तसेच श्री रामललाला खेळण्यासाठी हत्ती, घोडे आणि अन्य खेळणीही बनवण्यात आली आहेत. या सर्वांसाठी सोने, हिरे, माणिक आणि पाचू यांचा वापर करण्यात आला आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अंकुर अग्रवाल यांना १ जानेवारी या दिवशी संपर्क करून ५ वर्षांच्या श्री रामललाला म्हणजे त्याच्या वयाला शोभतील, अशी आभूषणे बनवण्यास सांगितली होती.
१. कपाळावरील टिळा १६ ग्राम सोन्यापासून बनवण्यात आला आहे. या टिळ्याच्या मधे ३ कॅरेटचे हिरे आणि शेजारी दोन्ही बाजूने १० कॅरेटचे हिरे बसवण्यात आले आहेत. मधे माणिकचा वापर करण्यात आला आहे.
२. श्री रामललाच्या गळ्यात सुमारे ५०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ५ लड्यांचा हार आहे. यात १५० कॅरेट माणिक आणि सुमारे ३८० कॅरेट पाचू वापरण्यात आले आहेत. मध्यभागी सूर्यवंश चिन्ह आहे.
३. भगवान रामललाच्या गळ्यातील सर्वांत मोठा हार विजयमाला आहे, ज्याचे वजन सुमारे २ किलो आहे. ते २२ कॅरेट सोन्यापासून बनवला आहे. यावर विविध धार्मिक चिन्हे आहेत. यात कमल, शंख, चक्र, कुंड, पारिजात, चंपा और तुळस यांचा समावेश आहे. हा हार मूर्तीच्या पायापर्यंत पोचतो.
४. श्री रामललासाठी बनवण्यात आलेल्या अंगठीमध्ये पाचू बसवण्यात आला आहे. या अंगठीचे वजन ६५ ग्राम आहे. यात ४ कॅरेटचे हिरे आणि ३३ कॅरेटचा पाचू बसवण्यात आला आहे. अंगठीच्या मधे गडद हिरव्या रंगाचा जांबियन पाचू बसवण्यात आला आहे.
५. श्रीरामाच्या उजव्या हातात २६ ग्राम सोन्याची अंगठी आहे. यावरही हिरे आणि माणिक बसवण्यात आले आहेत.
६. श्री रामललाच्या कंबरेला सजवण्यासाठी ७५० ग्रॅम सोन्याचा कमरपट्टा बनवण्यात आला आहे. त्यात ७० कॅरेट हिरे आणि सुमारे ८५० कॅरेट माणिक अन् पाचू आहेत.
७. श्री रामलालासाठी २२ कॅरेट सोन्याचे ४०० ग्रॅमचे ब्रेसलेट बनवण्यात आले आहे.
८. श्री रामललाच्या दोन्ही हातांमध्ये ८५० ग्राम सोन्याचे दोन कडे आहेत. यावर १०० हिरे आणि ३२० पाचू अन् माणिक बसवण्यात आले आहेत.
९. श्री रामललाच्या हातातील धनुष्य आणि बाण हे २२ कॅरेटच्या १ किलो सोन्यापासून बनवण्यात आले आहेत.