मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणार्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते पुणे येथे उद्घाटन !
पुणे – जैविक हवाई इंधनासाठी जगभरातील बहुतेक देशांची भारताकडून मोठी अपेक्षा असल्याचे दावोस इथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक व्यापार परिषदेत दिसून आल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले. मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणार्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे उद्घाटन पुरी यांच्या हस्ते २० जानेवारीला झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रकल्पातून शाश्वत जैविक हवाई इंधन अर्थात् ‘एस्.ए.एफ्.’ची निर्मिती होणार आहे. पुण्याजवळील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील प्राज उद्योग समुहाच्या संशोधन आणि विकास विभागात हा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला प्राजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्यासह इंडियन ऑइल आणि अन्य तेल आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधतांना पुरी यांनी या जैविक हवाई इंधनाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यासाठी आवश्यक तो कच्चा शेतमाल उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. ब्राझीलच्या आधी भारतात या जैविक हवाई इंधनाचा प्रकल्प उभा राहिल्याविषयी त्यांनी प्राज उद्योग समुहातील तंत्रज्ञांचे जाहीर अभिनंदन केले आणि ‘हा प्रकल्प खर्या अर्थाने जगासाठी पथदर्शी ठरेल’, असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटनानंतर पुरी यांनी अन्य अधिकार्यांसमवेत प्रकल्पाची पहाणी केली आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी समाधान व्यक्त केले. मद्यार्कपासून बनवलेल्या हवाई इंधनाचा वापर करून गेल्या वर्षी पुणे ते देहली हा विमान प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला होता. त्या वेळी देहली विमानतळावर या विमानाचे स्वागत पुरी यांनीच केले होते.