आजच्या रावणांविरुद्ध लढण्यासाठी श्रीरामाचे साहाय्य पाहिजे !
प्रभु श्रीरामाचे अयोध्येत मंदिर स्थापन होऊन त्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारीला झाली. या निमित्ताने हिंदु धर्म मानणार्या जर्मनीमधील लेखिका मारिया वर्थ यांनी प्रभु श्रीराम, श्रीराममंदिर, हिंदु धर्म आणि सध्याच्या स्थिती यांविषयी या लेखाद्वारे भाष्य केले आहे. ते येथे देत आहोत.
१. अधर्माच्या नाशासाठी श्रीराममंदिर उभारण्याची हीच वेळ योग्य !
भारतात ५०० वर्षांनी भव्य दिव्य असे काही घडत आहे. खरे म्हणजे हे पूर्वी व्हायला हवे होते. वर्ष १९४७ मध्ये जेव्हा धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली आणि ज्या भारतियांनी इस्लाम धर्म स्वीकारला त्यांना पाकिस्तान मिळाले. त्या वेळी स्वाभाविकपणे हिंदूंनी पुन्हा मागे जाऊन आक्रमणकर्त्यांनी मंदिरे नष्ट करून त्या जागी त्यांचे वर्चस्व राखण्यासाठी उभारण्यात आलेल्या मशिदींच्या जागी पुन्हा स्वतःची हिंदु मंदिरे उभारायला हवी होती. असे असले, तरी भारताने श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये श्रीरामाचे मंदिर उभारले असून ते उभारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. याचे कारण म्हणजे श्रीराम हे धर्माचे प्रतीक आहे, ज्यांनी अधार्मिक शक्तींचा पराभव केला. आता सध्याच्या काळात अधर्म मोठ्या प्रमाणात बळावला आहे आणि त्याच्याशी युद्ध करून त्याला पराभूत केले पाहिजे.
२. अंतिम सत्यापासून वंचित झालेला आधारहीन आणि दिशाहीन हिंदु समाज
सध्या मानवतेची स्थिती ही आधार नसलेली आणि दिशाहीन अशी झाली असून मानवतेला मूल्यांच्या दृष्टीने काहीही अर्थ राहिलेला नाही. ती जागृत होत आहे, असे म्हटले जाते आणि सकारात्मक आहे, असे भासवले जाते. पाश्चिमात्यांमध्ये तिचा प्रसार होत असून भारतीय तरुणांवर काही प्रमाणात तिचा प्रभाव पडत आहे. सध्या सत्य हे अस्तित्वात नसल्यासारखे आहे; कारण प्रत्येकाची स्वतःची सत्याची परिभाषा वेगळी आहे. जीवनाच्या उद्देशाला अर्थ राहिलेला नसून ती वैयक्तिक गोष्ट ठरली आहे. माणसावर आरोग्याला हितकारी नसलेले अन्न, अमली पदार्थ आणि खालच्या दर्जाची करमणूक यांचा भडिमार होत आहे, ज्यामुळे केवळ उत्पादकांचा लाभ होत आहे. ‘सर्वश्रेष्ठ परमेश्वर आणि जीव’, हा विषय युवल नोहा हरारी किंवा स्टेफेन हॉकिंग या प्रसिद्ध तत्त्वज्ञानी अन् शास्त्रज्ञ यांनी हास्यास्पद ठरवला आहे. आतापर्यंत लपलेल्या होत्या, त्या अशा बर्याच भयानक गोष्टी आता उजेडात येत आहेत. हा बिगुल वाजवणार्या प्रसिद्धीमाध्यमांना धन्यवाद दिले पाहिजेत.
३. देव-असुर लढ्यामध्ये आत्म्याला दिव्य शक्तीपासून वंचित करण्याचे असुरांचे प्रयत्न
यात सर्वाधिक वाईट गोष्ट कोणती, तर लैंगिकता, इंद्रिये आणि रक्त किंवा राक्षसी शक्तींना शांत करण्यासाठी गुप्तपणे काम करणार्या समाजातील सदस्यांकडून धार्मिक कृत्यांसाठी बळी देण्यासाठी लहान मुलांची होणारी तस्करी ! अशी माणसे समाजात आज शिखरावर आहेत. हे खरेच अविश्वसनीय आहे; परंतु याविरुद्ध बोलणार्यांना शांत केले जात असल्याने दुर्दैवाने त्यांना विश्वासार्हता मिळत आहे. मायेच्या या जगात देव आणि असुर यांच्यातील लढा कायमस्वरूपी चालू आहे अन् यामध्ये असुरांची बाजू वरचढ आहे, असे वाटते. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतील (अध्याय १६, श्लोक २१) शिकवणीनुसार वासना, राग आणि लोभ ही स्वतःचा नाश करणारी नरकाची द्वारे आहेत. आत्मा आणि त्याची दिव्य शक्ती यांपासून मानवाला वंचित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे काहीतरी वाईट घडण्याची शक्यता आहे.
४. कलियुगातील निराशाजनक अंधारलेल्या स्थितीत भारताचे महत्त्व
या अंधारलेल्या परिस्थितीमध्ये कलियुग जरी त्याचा प्रभाव दाखवत असले, तरी भारत हा आशेचा किरण आहे. अजूनही बर्याच भारतियांची हिंदु धर्मावर श्रद्धा आहे. त्यांना अजूनही त्यांच्यामधील दैवी शक्तीची (आत्म्याची) जाणीव आहे आणि देवतांविषयी भक्ती आहे. भारत हे पृथ्वीवरील एकमेव स्थान आहे, ज्या ठिकाणी प्रतिदिन सहस्रो मंदिरांमधून सर्वांच्या कल्याणासाठी देवतांची पूजा केली जाते. इथे वैयक्तिक संपत्ती, सत्ता आणि इंद्रियांच्या करमणुकीसाठी असुर किंवा सैतानी शक्तींची पूजा केली जात नाही. प्रत्येक सकाळी आणि सायंकाळी जगात ईश्वराची (ओम जय जगदीश हरे) किंवा त्या मंदिरातील विशिष्ट देवतेची आरती केली जाते. या सर्व देवता त्या सत् चित आनंदमय स्वरूपी सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्माशी एकरूप झालेल्या आहेत. देवता या आकाशात नसून त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेल्या त्यांच्या मंदिरात आहेत. मंदिरातील दगडाच्या मूर्तीमध्ये दैवी शक्तीचे प्राण ओतलेले आहेत. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा केली गेली. त्यामुळे अयोध्येतील नवीन बांधलेल्या श्रीराममंदिरामध्ये श्रीरामाचे अस्तित्व निर्माण होईल.
५. हिंदूंच्या मनात अयोध्या आणि श्रीराम यांविषयी असलेली प्रचंड श्रद्धा अन् सर्वश्रेष्ठ स्थान
अयोध्या हे नाव घेताच हिंदूंच्या भावना जागृत होतात. अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी असून ज्या ठिकाणी तो आपल्या लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या भावंडासह वाढला. या ठिकाणी वसिष्ठऋषींनी त्यांना प्राचीन असे ज्ञान प्रदान केले. पुढे राक्षसांशी लढण्यासाठी विश्वामित्रऋषि श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन गेले. पुढे प्रभु श्रीरामाने जनकपुरी येथून सीतेला आणले. नंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या दिवशीच १४ वर्षांच्या वनवासाला निघाले. आपल्या पुत्राचा वियोग झाल्यामुळे श्रीरामाचे वडील दशरथ यांनी देह ठेवला. पुढे भरताने श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले. श्रीराम हे वनवासात असतांना श्रीलंकेमध्ये रावणाचा पराभव करून सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह परत आले अन् त्यांनी सर्वांना आनंददायी असणारे रामराज्य स्थापन केले.
६. प्रत्येक हिंदूमध्ये रामाविषयी प्रेम असल्याने हिंदूंनी श्रीराममंदिराविषयी दिलेला लढा
भारतातील बहुतांश हिंदूंना श्रीरामाच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती आहे. त्यांच्यामध्ये रामायण मुरलेले आहे. आजही गावागावांमध्ये रंगमंचावरून ‘रामायण’ सादर केले जाते, तसेच अनेक आश्रमांमध्ये ‘रामायण’ वाचले जाते आणि यापूर्वी दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका प्रसारित झाली होती, ते त्या वेळीही पुष्कळ लोकप्रिय झाले होते. आपल्या जीवनात आव्हाने समोर असतांना ‘आदर्श कसे वागावे ?’ आणि ‘प्रतिष्ठेने कसे जीवन जगावे ?’, हे सांगणारी ‘रामायण’ ही पवित्र कथा आहे. उदात्त, न्याय देणारा, शूर, दुर्बलांचे नेहमी रक्षण करणारा आणि स्वतःचे वचन पाळणारा असा श्रीराम हा सर्वश्रेष्ठ मानवाचे उदाहरण आहे अन् त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात. त्यामुळेच हिंदूंनी त्यांचे पवित्र स्थान परत मिळवण्यासाठी ५०० वर्षे लढा दिला आणि एवढा त्याग का केला ? याविषयी प्रश्नच उरत नाही. त्यांनी केवळ आक्रमण करणार्यांच्या विरोधात लढा दिला नाही, तर अलीकडच्या दशकामध्ये त्यांना स्वार्थी राजकारणी, साम्यवादी आणि इस्लाम धर्मात धर्मांतरित झालेले हिंदू अशा लोकांशी लढावे लागले; कारण या सर्वांनी ‘श्रीराम हा खरा नाही आणि अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होते’, हे मान्य केले नाही.
७. श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना म्हणजे स्वतःमधील आत्मशक्ती जागृत करण्याचा दिवस !
असो. तो आता भूतकाळ झाला. सध्या भारत हा उत्सव साजरा करण्याच्या स्थितीत आहे. अनेक हिंदूंनी प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला जाऊन या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित राहून स्वतःला पवित्र करण्याचा नवस केला आहे. सर्वत्र रामनामाचा जप केला जात आहे, तसेच भक्तीपर भजने म्हटली आणि ऐकली जात आहेत. श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला १४० कोटी भारतियांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. त्यांनी प्राणप्रतिष्ठेच्या आधी ११ दिवस काही अनुष्ठाने केली आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे, तर ‘मला माझ्यातील दैवी शक्ती जागृत केली पाहिजे.’ पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पुष्कळ मोठे उत्तरदायित्व आहे. त्यांना खरोखर प्रभु श्रीरामाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता असून ते त्याच्याकडे त्यासाठी प्रार्थना करतील.
८. सत्य आणि सदाचरण यांवर आधारित अन् सर्व आक्रमणांपासून अबाधित राहिलेला सर्वश्रेष्ठ हिंदु धर्म !
अशा वेळी पाश्चिमात्य प्रसिद्धीमाध्यमे कोणताही खेद न बाळगता स्वतःला हिंदू म्हणवणार्या पंतप्रधान मोदींवर टीका करू शकतात. अब्राम्हीक धर्म, साम्यवादी आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी नकारात्मक प्रचार करूनही हिंदु लोक हिंदु धर्माला चिकटून रहातात, याचे त्यांना आश्चर्य वाटत असेल. हिंदु धर्मावर सर्व बाजूंनी आक्रमण करण्याचे नियोजन यशस्वी का होत नाही ? आता पुन्हा एकदा अधिक प्रमाणात हिंदू स्वतःची परंपरा सुरक्षित का ठेवू इच्छित आहेत ? तसेच अनेक विदेशीही ‘हिंदु धर्म हा मानवता आणि जगासाठी सर्वांत उत्तम पर्याय आहे’, असे का मानत आहेत ? याचे उत्तर सोपे आहे. हिंदु धर्म हा सत्य आणि सदाचरण यांवर आधारीत आहे. तो आपल्याला ‘मायेतील जग तात्पुरते आहे आणि स्वतःमध्ये असलेला आत्मा अनंत आहे’, याची जाणीव करून देतो. आपल्याला मायेतून सोडवून स्वतःतील दैवी शक्तीची जाणीव करून देणार्या देवतांच्या बाजूने हिंदु धर्म आहे. आपल्याला अज्ञानात ढकलणार्या आणि बंधनात ठेवणार्यांच्या बाजूने हा धर्म नाही.
९. भारतासमोरील आव्हान
असे असले, तरीही भारतासमोर मोठे आव्हान आहे. नवीन धर्माचा स्वीकार करून किंवा नवीन शिक्षणपद्धत लागू करून आपल्या हिंदु पूर्वजांच्या श्रद्धास्थानांना हीन लेखण्याविषयी ज्यांच्या मनावर बिंबवले गेले आहे, त्यांना धर्माविषयीच्या सत्याची जाणीव कशी करून देता येईल, याकडे पहावे लागेल. ‘प्रभु श्रीराम सर्वांना सुबुद्धी देतील’, अशी आशा करूया. सर्वांना त्यांच्या हृदयामध्ये श्रीरामांचे अस्तित्व जाणवू दे.’
सत्यमेव जयते । जय श्रीराम ।
– मारिया वर्थ, जर्मनी (१९.१.२०२४)
प्रभु श्रीराम, त्याचे कार्य, रामराज्य आणि हिंदु धर्म यांचे महत्त्व जे एका जर्मन लेखिकेला कळते, ते भारतातील काँग्रेसवाले, तथाकथित पुरो(अधो)गामी, बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी यांना कळत नाही, हे दुर्दैवी आहे ! – संपादक |