२२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ घोषित करा !
अखिल भारत हिंदु महासभेची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सातारा, २२ जानेवारी (वार्ता.) – २२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह अधिवक्ता दत्तात्रय सणस यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने काही दशकांपूर्वी फैजाबाद येथील स्व. ठाकूर गोपालसिंह विशारद यांनी श्रीरामाचे दर्शन आणि पूजेचा मान मिळावा, यासाठी दिवाणी खटला नोंद करून न्यायालयीन लढ्यास प्रारंभ केला होता. यानंतर अनेक दावे-प्रतिदावे झाले. सर्वाेच्च न्यायालयाने श्री रामललाच्या बाजूने दिलेल्या निर्णयाने हिंदु महासभेच्या न्यायालयीन लढ्याची इतिश्री झाली आहे. यामुळे अनेक शतकांचा संघर्ष समाप्त होऊन श्रीरामरायांची पूजा-अर्चा हिंदूंना करता येणार आहे. २२ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रीराम हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत. श्रीराम हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. समस्त हिंदू श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ मानतात. त्यामुळे समस्त हिंदूंच्या धारणेस अनुसरून हिंदु जनभावनांचा आदर राखण्यासाठी केंद्र सरकारने २२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ म्हणून घोषित करावा.