संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले श्रीराम देतात ! – डॉ. कुमार विश्वास, प्रसिद्ध रामकथाकार
गंगा आरतीने पुणे येथील रामकथेची भाव-भक्तीपूर्ण वातावरणात सांगता !
पुणे – राक्षसांचा वध प्रभु श्रीरामांना असाही करता आला असता; पण आयुष्याच्या वाटेवर संकटांचा, संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले श्रीराम देतात. देशाच्या प्रतिष्ठेवर अनेकदा घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी प्रत्येक देशवासियाने आपल्या भारतमातेच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी योगदान द्यावे, असे मत रामकथेच्या सांगता सत्रात बोलतांना प्रसिद्ध रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केले. डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या रामकथेची गंगा आरतीने भाव-भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली. ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीराम’, ‘पवनसुत हनुमान की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा उद्घोषाने परिसर दुमदुमून गेला. हिमांशू पांडे आणि सहकारी यांनी गंगा आरती केली.
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसांच्या रामकथेच्या शेवटच्या दिवशी रामनगरी तुडुंब भरून गेली. पुणेकर श्रीरामभक्तांनी या भक्तीरसाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती. या श्रीरामकथेला भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे आदी उपस्थित होते.
डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान श्रीराम मार्ग दाखवत रहातात. विनम्रता, शक्ती आणि मानवता यांचे मिश्रण म्हणजे प्रभु श्रीराम !
३ दिवस अितशय रसाळ आणि मधुर वाणीतून रामकथेचे निरूपण केल्याविषयी मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. कुमार विश्वास यांचे आभार मानले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देत त्यांचा कृतज्ञापूर्वक गौरव केला.