सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !
सोलापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले. यात विविध मंदिरांची स्वच्छता, प्रभु श्रीरामाचा नामजप, श्रीरामाकडे रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रार्थना आणि प्रतिज्ञा, तसेच उपस्थितांना श्रीरामाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली.
या अभियानात सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, बीड येथील सहस्रो रामभक्त सहभागी झाले होते. अभियानाच्या अंतर्गत रामभक्तांनी सलग ८ दिवस प्रतिदिन श्रीरामाचा भावपूर्ण नामजप केला.
‘चला धागा विणुया प्रभु श्रीरामचंद्रांसाठी’ या उपक्रमात पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह सहस्रो रामभक्तांचा सहभाग !
सोलापूर येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सोलापूर’च्या वतीने ‘चला धागा विणुया प्रभु श्रीरामचंद्रांसाठी’ या उपक्रमाच्या अंतर्गत श्री रामाचे नाम घेत धागे विणत वस्त्र सिद्ध करण्यात आले. हे वस्त्र अयोध्या येथे पाठवण्यात आले. या उपक्रमात सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह सहस्रो रामभक्तांनी नामजप करत २-२ धागे विणण्यात सहगाभ घेतला.
सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि नामपट्टीचे वितरण !
यानिमित्ताने काही रामभक्तांनी त्यांच्या परिसरात प्रभु श्रीरामतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ होण्यासाठी श्रीरामाची माहिती देणारा श्रीराम लघुग्रंथ, सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि नामपट्टी यांचे वितरण केले.
सांगोला येथील श्री अंबिकादेवी मंदिराची स्वच्छता !
सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री अंबिका देवस्थान समिती यांच्या वतीने १७ जानेवारी या दिवशी श्री अंबिकादेवी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी मंदिराचे पुजारी श्री. मयुरेश गुरव, तसेच देवीचे भक्त सर्वश्री सोमा गुरव, साईराज पारसे, सर्वेश गुरव, बालाजी भद्रशेट्टी, अनुराग टिंगरे, अक्षय गायकवाड, शुभम जुंदळे, रुद्रेश स्वामी, निरंजन नवाळे, आशिष कोकरे, सोहम गायकवाड, बालाजी माळी, चैतन्य गुरव, रोहित पवार, प्रवीण जानकर यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वश्री नवनाथ कावळे, विकास गावडे, अजय तेली, प्रशांत राजमाने, अशोक बंडगर, ऋषि अनुसे, संतोष पाटणे, श्रेयस तोडकरी, सौ. स्नेहा कावळे, कु. वैष्णवी तोडकरी, सौ. विजया तोडकरी, सौ. शुभांगी पाटणे यांसह पुष्कळ देवीभक्त सहभागी झाले होते.
सोलापूर येथे प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन
सोलापूर येथील नाकोडा युनिटी येथे २२ जानेवारी या दिवशी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सोसायटीतील अनेक नागरिक उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी उपस्थितांना रामराज्याचे महत्त्व सांगितले. या वेळी उपस्थितांनी ‘लवकरात लवकर रामराज्याची स्थापना होऊ दे’, अशी प्रार्थना केली.