अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र यांच्या दृष्टीने आध्यात्मिक महत्त्व !
‘२२.१.२०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते अयोध्या येथील भव्य आणि नूतन श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या बालरूपातील (५ वर्षांच्या बालक रूपातील) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या क्षणाची मागील ५०० वर्षांपासून पूर्ण विश्वातील हिंदू आतुरतेने वाट पहाट होते. अनेक हिंदुद्वेषींकडून ‘केवळ मंदिर बांधल्याने काय होणार ?’, असे विधान करून हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दृष्टीने श्रीरामाप्रती भाव असणारे भाविक (साधक) आणि भक्त यांना अयोध्या येथील श्रीराममंदिर पुनर्स्थापनेचे आध्यात्मिक महत्त्व कळावे, या दृष्टीने हा लेख आहे !
१. अयोध्या येथील श्रीराममंदिराची स्थापना, हे समष्टी प्रारब्ध अल्प होऊन समष्टी क्रियमाणात वाढ होण्याचे, म्हणजे शीघ्रतेने हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याचे प्रतीक असणे
‘ज्या वेळी नकारात्मक समष्टी प्रारब्धात वाढ होते, त्या वेळी चैतन्याचा स्रोत असलेली देवळे नष्ट होतात, तर ज्या वेळी सकारात्मक समष्टीच्या क्रियमाणात वाढ होते, त्या वेळी शक्ती आणि तेज यांनी युक्त देवळांची निर्मिती किंवा देवतांचे प्रगटीकरण होण्याची प्रक्रिया घडते’, असे सूक्ष्मातील शास्त्र आहे. मागील अनेक वर्षांपासून (वर्ष १९९९ पासून) (२४ वर्षांहून अधिक कालावधीपासून) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असलेल्या साधकांच्या समष्टी साधनेमुळे, तसेच विविध संतांच्या मार्गदर्शनानुसार विश्वभरातील साधक करत असलेल्या व्यष्टी साधनेमुळे समष्टी प्रारब्धावर परिणाम होतो आणि रज-तम यांचे प्रमाण काही टक्क्यांनी अल्प होते. समष्टी क्रियमाणामुळे सात्त्विकतेत वाढ झाल्याने अयोध्या येथे श्रीराममंदिराची स्थापना शक्य होत आहे. साधकांनी अशा प्रकारे व्यष्टी आणि समष्टी साधना चालू ठेवल्यास समष्टी क्रियमाणात वाढ होईल. त्यामुळे समष्टी प्रारब्ध अल्प होऊन हिंदु राष्ट्राची सुप्रभात शीघ्रतेने होईल. थोडक्यात अयोध्या येथील श्रीराममंदिराची पुनर्स्थापना हे समष्टी प्रारब्ध अल्प होऊन समष्टी क्रियमाणात वाढ होण्याचे, म्हणजेच शीघ्रनेने हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचे प्रतीक आहे !
२. देवळांमुळे समष्टीकडून धर्माचरण होणे आणि त्यामुळे समष्टी प्रारब्ध अल्प होणे
२ अ. समष्टी प्रारब्ध म्हणजे काय ? : एखाद्या देशात काहीच पिकत नसेल किंवा काहीच खनिजे नसतील, तर त्या देशातील लोकांना विविध सुविधा देण्यासाठी आणि देशातील विविध कार्यभार चालवण्यासाठी त्या देशाला इतर देशांकडून कर्ज घ्यावे लागते. या प्रक्रियेमुळे देशातील प्रत्येक नागरिक, म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून वयस्करापर्यंत सर्वांच्या डोक्यावर देशातील कर्जाचा भार असतो. पुढे अन्य देशांनी कर्जफेड मागितल्यावर त्या देशातील लोकांना कर्ज फेडण्यासाठी विविध त्रास सोसावे लागतात. निसर्ग, पंचतत्त्वे आणि राष्ट्र यांच्यात आध्यात्मिक स्तरावर घडणारी ही प्रक्रिया म्हणजे समष्टी प्रारब्ध !
२ आ. समष्टी क्रियमाण म्हणजे काय ? : वर दिलेल्या उदाहरणात इतर देशांच्या कर्जावर जगणार्या देशातील लोकांनी वेळेत जागृत होऊन कर्ज फेडण्यासाठी सामूहिकपणे योग्य उपाययोजना केल्यास त्या देशाला आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवता येते. समष्टीने साधना आणि धर्माचरण करून निसर्ग अन् पंचतत्त्वे यांच्या सात्त्विकतेत वाढ करणे म्हणजे समष्टी क्रियमाण !
२ इ. समष्टी क्रियमाणात वाढ करण्यात देवळांचे महत्त्व : ज्या वेळी बहुसंख्य लोक धर्माचरण आणि साधना यांपासून परावृत्त होतात, त्या वेळी समष्टी प्रारब्धात वेगाने वाढ होते. समष्टी प्रारब्धात वाढ झाल्यामुळे विविध प्रकारची महामारी, युद्ध, नैसर्गिक संकटे राष्ट्रात निर्माण होतात. समष्टी प्रारब्ध ७० टक्क्यांच्या पुढे गेल्यास राष्ट्राला युद्ध, महामारी अशा भीषण संकटांना सामोरे जावे लागते. याउलट समष्टीने खडतर साधना आणि धर्माचरण करून सात्त्विकतेत वृद्धी केल्यास अशा संकटांची झळ अल्प होते. देवळांचे धर्मसंमत योग्य व्यवस्थापन केल्यास काही प्रमाणात का होईना, समष्टीकडून धर्माचरण घडते. या धर्माचरणामुळे समष्टी सात्त्विकतेत वाढ होते. देवळांच्या माध्यमातून समष्टीकडून धर्माचरण व्हावे, यासाठी देवळांना सरकारीकरणातून मुक्त करून त्याचे व्यवस्थापन भक्तांकडे देणे आवश्यक आहे.
२ ई. श्रीराममंदिरामुळे समष्टीकडून मोठ्या प्रमाणात धर्माचरण होणार असल्याने समष्टीच्या सात्त्विकतेत वाढ होणार असणे : श्रीराममंदिराची पुनर्स्थापना हे विश्वातील १३० कोटींहून अधिक हिंदूंच्या आस्थेशी निगडित सूत्र आहे. या सोहळ्यात बहुसंख्य हिंदूंना स्थुलातून सहभागी होता येत नसले, तरी सर्वत्रच्या हिंदूंनी आपापल्या ठिकाणी धर्माचरणाशी निगडित विविध कृती केल्या आहेत, उदा. श्रीराम ज्योत प्रज्वलित करणे, श्रीरामाचा नामजप करणे, श्रीरामतत्त्व आकर्षित करणारी रांगोळी काढणे, श्रीरामाची सात्त्विक आरती-भजन करणे इत्यादी. यामुळे एकूणच समष्टीच्या सात्त्विकतेत वाढ होणार आहे. खर्या कर्महिंदूंनी अशा कृती केवळ एका दिवसापुरत्या मर्यादित न ठेवता श्रीरामाप्रती कृतज्ञता म्हणून आदर्श रामराज्य स्थापन होण्यासाठी प्रतिदिन स्वयं साधना आणि धर्माचरण करणे, तसेच इतरांना शिकवणे अन् यासोबत मंदिर सरकारीकरण, धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ अशा दुष्प्रवृतींच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा संकल्प करावा. या संकल्पासाठी त्यांना श्रीरामाचा आशीर्वादही प्राप्त होईल.
३. श्रीरामाप्रती असलेल्या समष्टी भावामुळे प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी ५० ते १०० टक्के श्रीरामतत्त्व कार्यरत असणार असणे
अन्य कोणत्याही दिवशी श्रीरामतत्त्व ५ टक्के एवढ्या प्रमाणातच कार्यरत असते. याउलट श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ५० ते १०० टक्के श्रीरामतत्त्व कार्यरत असणार आहे. याचे कारण ‘समष्टी भाव’ असे आहे.
‘भाव तिथे देव’, हा अध्यात्मातील सिद्धांत आहे. भाविक त्याच्या आध्यात्मिक पातळीनुसार भावनिक भाव, भाव, भक्ती आणि श्रद्धा यांपैकी एका टप्प्याला असतो. अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणे, या संदर्भात पूर्ण विश्वातील हिंदु भाविकांमध्ये त्यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार भावनिक भाव, भाव, भक्ती आणि श्रद्धा अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक प्रमाणात जागृत असतील. सर्वत्रचा समष्टी भाव जागृत असल्यामुळे या सोहळ्याचा अत्यंत भावपूर्ण लाभ घेण्यासाठी सात्त्विक आणि आध्यात्मिक प्रयत्न करणार्या समष्टीला १०० टक्के श्रीरामतत्त्वाचा लाभ होईल, तर अन्यत्रच्या समष्टीलाही न्यूनतम ५० टक्के लाभ होणार आहे. थोडक्यात अन्य दिवसांच्या तुलनेत या दिवशी समष्टीला १० ते २० पट अधिक प्रमाणात श्रीरामाच्या तत्त्वाचा लाभ होणार आहे.
हिंदु राष्ट्राच्या (रामराज्याच्या) स्थापनेच्या दृष्टीने विविध देवळांची होणारी स्थापना अन् त्याचे होणारे आध्यात्मिक लाभ
श्रीरामाच्या मंदिराची स्थापना होतांना हिंदु समाजात ‘अयोध्या तो झांकी है, काशी, मथुरा, भोजशाला अभी बाकी है । (अर्थ : अयोध्येत रामजन्मभूमी होणे, हा छोटासा प्रारंभ आहे. अजून काशी, मथुरा आणि भोजशाळा येथेही देवळे बांधणे बाकी आहे.)’ अशी घोषणा दुमदुमू लागली आहे. आध्यात्मिकदृष्ट्या या देवळांची स्थापना कशाचे प्रतीक आहे ? आणि ढोबळ मानाने ही प्रक्रिया कधी घडणार ? हे थोडक्यात पुढे दिले आहे.
४. श्रीराममंदिरात श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापित होतांनाच्या काळाचे आध्यात्मिक महत्त्व
भगवान श्रीराम यांचा जन्म सूर्यकुळात झाला होता. श्रीरामाने त्यांच्या पूर्ण जीवनकाळात (अवतारकाळात) ७० टक्के तारक कार्य (भक्तांची आध्यात्मिक उन्नती, रामराज्य स्थापना इत्यादी), तर ३० टक्के मारक कार्य (विविध असुर आणि रावण यांचा वध) केले आहे. यांतून श्रीरामतत्त्वाचे कार्य सूर्यनाडीशी आणि तारक शक्ती प्रधान असल्याचे स्पष्ट होते.
मकरसंक्रांतीला, म्हणजे सूर्याने उत्तरायणात प्रवेश करण्याच्या काळात ब्रह्मांडाची सूर्यनाडी जागृत असते, हे या काळाचे आध्यात्मिक महत्त्व आहे. सूर्यनाडी ही सात्त्विकता, तारक शक्ती आणि आध्यात्मिक उन्नती यांच्याशी निगडित असते. मकरसंक्रांतीच्या पुढील आठवड्यात अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. थोडक्यात ज्या काळात (म्हणजे मकरसंक्रांती नंतरच्या काळात) सूर्याची शक्ती प्रबळ आणि तारक स्वरूपात असते, त्या काळात श्रीराममंदिरात श्रीरामाची मूर्ती स्थापित होत आहे. याच प्रकारे ‘श्रीरामतत्त्व सूर्याशी आणि तारक शक्तीशी निगडित असल्याने श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची संस्थापना होण्याच्या काळात काही अडथळा न येता निर्विघ्नपणे हा सोहळा पार पडणार आहे’, असे लक्षात येते.
५. श्रीरामाच्या मंदिर स्थापनेचे आध्यात्मिक परिणाम
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी निगडित शक्ती एकत्रित असते’, हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. त्यामुळे श्रीरामाच्या मंदिर स्थापनेमुळे श्रीरामाचे तत्त्व पूर्ण समष्टीत प्रक्षेपित होणार आहे. ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील दुष्प्रवृत्तींचा नाश करून सत्प्रवृत्तींचा विकास करणे’, हे श्रीरामतत्त्वाचे अनेक कार्यांपैकी एक कार्य आहे.
श्रीरामाने त्याच्या अवतारकाळात विविध दुष्प्रवृत्तींचा नाश करून सत्प्रवृत्तींचा विकास करण्याची शिकवण स्वतःच्या आचरणातून दिली आहे. श्रीरामाने केलेल्या सत्प्रवृत्तीयुक्त आचरणालाच हिंदु धर्माने ‘आदर्श’ म्हणून स्वीकारले आहे, उदा. एकपत्नीत्व, राष्ट्र स्थापनेसाठी त्याग करणे इत्यादी. (या संदर्भातील सखोल विवेचन ‘श्रीराम : हिंदु संस्कृतीचे सांस्कृतिक पुरुष’ या वेगळ्या लेखात केले आहे.)
६. अयोध्या येथील श्रीराममंदिरात बालरूपातील श्रीरामाची मूर्ती स्थापित होण्यामागील अध्यात्मशास्त्र
श्रीरामाचा जन्म अयोध्या येथे झाला होता. त्यामुळे अयोध्या येथील श्रीराममंदिरात बालरूपातील श्रीरामाची मूर्ती स्थापित केली जात आहे, हे स्थुलातील कारण सर्व हिंदु समाजाला ज्ञात आहे; पण यामागील एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक कारणही आहे. देवतांचे बालरूप हे इच्छाशक्तीचे प्रतीक असते. पुढे इच्छाशक्तीहून क्रियाशक्ती आणि त्यापुढे ज्ञानशक्ती या टप्प्यानुसार अवतार कार्य करतात. अवतार उपासकाला किंवा समाजाला ज्या शक्तीची आवश्यक असते, त्यानुसार विविध देवतांच्या त्या त्या रूपाची आराधना करायला सांगतात. याउलट ज्या वेळी कालमहात्म्यानुसार समष्टीच्या कालचक्रात पालट होतो, त्या वेळी त्या त्या काळातील शक्तीचे प्रतीक असणार्या देवतेचे देऊळ निर्माण होते किंवा देवता प्रगट होते.
सध्याच्या काळात कालमाहात्म्यानुसार समष्टीच्या कालचक्रात पालट होऊन सत्ययुगाच्या दिशेने मार्गक्रमण चालू आहे. या टप्प्याला समष्टीला तारक इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे ईश्वर समष्टीतील विविध जिवांना तसे विचार देऊन काळानुसार आवश्यक त्या देवतातत्त्वाची शक्ती प्रगट करत आहे. त्रेतायुगात झालेला श्रीरामाचा जन्म पुढील काही वर्षांनी होणार्या रामराज्याच्या स्थापनेचे प्रतीक होता. त्याच प्रकारे वर्तमानकाळात अयोध्या येथे बालरूपातील श्रीराममूर्तीची स्थापना पुढील काही वर्षांमध्ये होणार्या हिंदु राष्ट्राच्या, म्हणजे रामराज्याच्या स्थापनेचे प्रतीक आहे. त्रेतायुगात ज्या प्रकारे श्रीरामाला रामराज्य स्थापित करण्यापूर्वी वनवास, सीताहरण असे अनेक कष्ट भोगून रावणाचा वध करावा लागला. त्याच प्रकारे हिंदु समाजालाही भीषण आपत्काळात आक्रमणे, महामारी, युद्ध यांना सामोरे जाऊन मग रामराज्याची पहाट पहायला मिळणार आहे.
वर दिलेल्या सारणीत हिंदु समाजात ‘ज्या देवळांची स्थापना व्हावी’, अशी पुष्कळ तळमळ आहे, त्या संदर्भात दिले आहे. प्रत्यक्षात हिंदु राष्ट्र स्थापनेची सूक्ष्मातील प्रक्रिया प्रथम इच्छाशक्ती, मग क्रियाशक्ती आणि त्यानंतर ज्ञानशक्ती अशी आहे. यामुळे त्या त्या शक्तीशी संबंधित जागृत मंदिरे भारतातील प्रत्येक राज्य, शहर, गाव येथे निर्माण होतच रहातील. ‘सूक्ष्मातील हिंदु राष्ट्राची प्रक्रिया कळण्यासाठी आणि त्याचा आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंना साधना करण्याची बुद्धी व्हावी’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !
७. अयोध्या येथील श्रीराममंदिराची पुनर्स्थापना हे भारताची इच्छाशक्तीकडे वाटचाल होण्याचे प्रतीक असणे
हिंदु धर्म ज्ञानशक्तीयुक्त आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांत विविध प्रकारची आक्रमणे होऊनही हिंदु धर्माचे अस्तित्व टिकून राहिले आहे. याच प्रकारे कलियुगातील ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे ‘रामराज्य’ हे ज्ञानशक्तीयुक्त असल्याने ते १ सहस्र वर्षांपर्यंत अस्तित्वात असेल. ज्ञानशक्तीकडे जाण्यासाठी प्रथम इच्छा ते क्रिया आणि मग क्रिया ते ज्ञान असा प्रवास करावा लागतो. मागील काही वर्षांत हिंदु समाज करत असलेल्या संघटित प्रयत्नांमुळे भारताची इच्छाशक्तीच्या टप्प्याकडे वाटचाल होत आहे. याचे प्रतीक म्हणून श्रीराममंदिराची पुनर्स्थापना होत आहे. यापुढे ‘हिंदूंचे आध्यात्मिक स्तरावरील संघटन होऊन त्यांना क्रियाशक्तीच्या आणि त्यानंतर ज्ञानशक्तीच्या टप्प्याला जाता येऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे सामर्थ्य मिळावे’, अशी प्रभु श्रीराम आणि श्री गुरु यांच्या चरणी प्रार्थना !
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२४, सकाळी ८.१५ ते १०.३९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |