साधकांच्या जीवनात राम (आनंद) आणणारे आणि ‘रामराज्यासम हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी अवतारी कार्य करणारे श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘९.११.२०१९ या शुभदिनी भगवान श्रीरामाच्या कृपेने श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने ‘अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी भगवान श्रीरामाचीच आहे’, असा निर्णय दिला. तेव्हा अयोध्येत भव्य राममंदिर बांधण्याचे समस्त हिंदूंचे स्वप्न साकार होण्यास प्रारंभ झाला. २२.१.२०२४ या दिवशी अयोध्या नगरीत भव्यदिव्य अशा श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने समस्त हिंदूंच्या रामराज्याच्या, म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आशा पल्लवित होत आहेत. या शुभप्रसंगी अध्यात्माचा प्रचार आणि रामराज्य येण्यासाठी अवतारी कार्य करत असलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांकडून साधना करून घेतल्याने त्यांच्या कृपेने साधकांची आध्यात्मिक प्रगती होणे आणि साधकांना रामराज्याचा आनंद अनुभवता येणे
६.१२.१९९२ या दिवशी बाबरीचा ढाचा पाडला गेला. तेव्हा ‘श्रीरामजन्मभूमीत श्रीराममंदिर लवकरात लवकर निर्माण व्हावे आणि आपणही त्यासाठी काहीतरी करावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘प्रत्येक हिंदु व्यक्तीने साधना करून श्रीरामाला हृदयमंदिरातील सिंहासनावर आरूढ करायला हवे, म्हणजे व्यष्टी साधना करायला हवी. साधकांनी समष्टी साधना म्हणून रामराज्य येण्यासाठी धर्मसेवेत सहभागी झाले पाहिजे.’’ त्या वेळी मला वाटले, ‘जेव्हा साधकाच्या हृदयात श्रीराम असेल, तेव्हा साधकाला सर्व जगत राममय भासून रामराज्याचा आनंद मिळेल. साधकांनी समष्टी सेवा; म्हणून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य केले, तर राममंदिर निर्माण होईल अन् रामराज्य (हिंदु राष्ट्र) येईल.’ परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासारख्या अनेक साधकांकडून ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना करून घेऊन आमचे जीवन राममय, मंगलमय आणि आनंदमय केले, म्हणजेच आमच्या जीवनात रामराज्य आणले आहे.
२. ‘मंदिराचे व्यवस्थापन आणि रक्षण’ यांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार अन् त्यांनी अधोरेखित केलेले साधना करण्याचे महत्त्व !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रचार करत होतो. काही वेळा मंदिरात ग्रंथप्रदर्शन, धर्मजागृतीसाठीचे फलक लावणे आणि सत्संग घेणे, यांसाठी अडचणी येत होत्या. तेव्हा ‘आपलीही मंदिरे असावीत’, असे मला वाटायचे. त्याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मंदिर बांधण्याच्या आधी त्याचे संवर्धन, व्यवस्थापन आणि उद्देश कसा सफल होईल ?’, हे लक्षात घ्यायला हवे. त्या देवतेच्या भक्तांनी मंदिरातील देवाची पूजा आणि व्यवस्थापन पहायला हवे. मंदिरातून धर्मशिक्षण देऊन लोकांना धर्माचरणाकडे आणि साधनेकडे वळवले पाहिजे; परंतु आता तसे होतांना दिसत नाही. पुढे आपत्काळात मंदिरांचे व्यवस्थापन आणि सर्वकाही मंदिरातील देवतेच्या भक्तांना पहावे लागेल; मात्र ते करण्यासाठी देवतेचे भक्त झाले पाहिजे अन् भक्त होण्यासाठी साधना करावी लागणार आहे.’’ सनातनच्या साधकांमध्ये साधनेचे बीज रोवले गेल्याने आणि त्यांना धर्मशिक्षण मिळत असल्याने त्यांना सर्व मंदिरे आपलीशी वाटतात. अयोध्येतील भव्य राममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही आनंदाची पर्वणी आहे.
३. मंदिरातील अपप्रकारांना होत असलेला विरोध
मोगल आक्रमकांनी अनेक मंदिरे लुटली आणि उद्ध्वस्त केली. त्यानंतर शासनाने अनेक मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरे नियंत्रणात घेतली. सध्या काही मंदिरांचे व्यवस्थापक एकत्र येऊन ‘मंदिर सरकारीकरण आणि मंदिरांतील अपप्रकार’ यांच्या विरोधात लढा देत आहेत. ते ‘मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांतील असुविधा आणि भ्रष्टाचार, मंदिरांच्या भूमीचे घोटाळे, मंदिर निधीचा अपवापर’ इत्यादी गोष्टी उघडकीस आणून त्यांवर योग्य ती कारवाई करण्यास शासनाला भाग पाडत आहेत.
४. श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आरंभी ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप करत होते’, असे त्यांनी आम्हाला अभ्यासवर्गात सांगितले होते. त्यांच्या देवघरात रामपंचायतनाची प्रतिमा होती. त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे कांदळी, जिल्हा पुणे येथे श्रीराममंदिर आहे. महर्षींनी जीवनाडीपट्टीतून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीरामाचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे. सप्तर्षींच्या संकल्पाने परात्पर गुरु डॉक्टरांचे आम्हा साधकांना सिंहासनारूढ श्रीरामरूपात दर्शन झाले आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासाठी आणि सर्व साधकांसाठी प्रत्यक्ष श्रीरामच आहेत’, यात तीळमात्र शंका नाही.
त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने त्याच्या भक्तांचा उद्धार करून रामराज्याची स्थापना केली. त्याविषयी ऋषि, रामायण आणि संत यांनी लिहिलेल्या कथांमधून शिकायला मिळते. सांप्रत काळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आचरण, विचार, मार्गदर्शन आणि त्यांचे स्थूल अन् सूक्ष्म अवतारी कार्य यांतून ते श्रीरामच आहेत’, याची प्रत्यक्ष अनुभूती आम्ही साधक घेत आहोत. त्याबद्दल प्रभु श्रीराम आणि श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.१.२०२४)