अयोध्यानगरीची, म्हणजेच भविष्यातील भारताची हिंदु राष्ट्राकडे कूच !
प्रभु श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्यानगरीमध्ये अभूतपूर्व सोहळ्याची सिद्धता चालू आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातील रामभक्त अयोध्येत पोचले आहेत. यामध्ये सोहळ्यासाठी जसे निमंत्रित मान्यवर आहेत, तसेच सहस्रोंच्या संख्येने सर्वसामान्य कुटुंबांतील भाविकही अयोध्येत आले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्यानगरीत येणार्या भाविकांची संख्या लाखोंच्या संख्येने असण्याची शक्यता आहे. या भाविकांमध्ये एक आगळावेगळा उत्साह आणि प्रभु श्रीरामाविषयी अनन्यसाधारण भक्तीभाव आहे. हे एवढे भाविक केवळ श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आले आहेत एवढ्यापुरते सीमित नाही, तर या सर्व भाविकांच्या डोळ्यांमध्ये रामराज्याचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्वप्न आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वतीने या सोहळ्यानिमित्त वार्तांकन करतांना अनेक भाविकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ यांचा जयघोष करत ही भावना व्यक्त केली. प्रभु श्रीरामाने भारित झालेली अयोध्येची स्थिती या लेखाच्या माध्यमातून श्रीरामाच्याच कृपेने समस्त हिंदू बांधवांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न !
१. देश-विदेशातून सहस्रावधी भाविकांचे आगमन !
प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच भारताच्या विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत आले आहेत. भारतासह नेपाळ, भूतान, श्रीलंका येथूनही भाविक अयोध्यानगरीत आले आहेत. यांतील अनेक भाविकांना श्री रामललाला (श्रीरामाचे बालक रूप) त्याच्या जन्मभूमीत भव्य मंदिरामध्ये विराजमान झाल्याचे पहाण्याची उत्कंठा आहे. अनेक वृद्ध भाविकांना चालणे शक्य नसल्यामुळे चाकांच्या आसंदीवरून श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी येत आहेत.
२. दर्शनार्थींकडून हिंदु राष्ट्र करण्याची मागणी !
विशेष म्हणजे दर्शना साठी आलेले अनेक भाविक ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष करत आहेत. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वतीने भाविकांचे अभिप्राय घेत असतांना अनेकांनी ‘रामराज्य आणि हिंदु राष्ट्र स्थापन व्हायला हवे’, असा मनोदय व्यक्त केला.
३. मंदिराच्या परिसरात अखंड ‘जय श्रीराम’चा जयघोष !
श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी दर्शना साठी आलेल्या भाविकांची ‘प्रभु श्रीराम’ ही एकच ओळख निर्माण झाली आहे. या ठिकाणी आलेले भाविक कोण कोणत्या प्रदेशातील आहे ? कोणत्या जातीचा आहे ? कोणत्या प्रांतातील आहे ? किंवा कोणता भाषिक आहे ? या सर्व गोष्टी पुसल्या गेल्या आहेत. ‘जय श्रीराम’ म्हणणारा प्रत्येक जण आपला आहे’, या भावाने श्रीरामाच्या जयघोषातच भाविक एकमेकांना प्रणाम (नमस्कार) करत आहेत. दर्शना साठी रांगेत असलेल्या भाविकांमध्ये कुणी श्रीरामाचा नामजप करत आहे, कुणी रामरक्षेचे स्तवन करत आहे, कुणी श्रीरामाची भजने म्हणत आहेत, तर कुणी श्रीरामाचा जयघोष करत प्रभूंच्या दर्शना च्या उत्कंठेत आहेत.
४. भाविकांच्या सोयीसाठी अखंडपणे लंगरची (जेवणाची) व्यवस्था !
अयोध्यानगरीच्या परिसरात अनेक ठिकाणी श्रीरामभक्तांकडून न्याहरी आणि महाप्रसाद यांचे लंगर लावण्यात आलेले आहेत. अयोध्यानगरीत आलेल्या कुणाही भाविकाला उपाशी रहाण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने लंगर लावणारे भाविक अन्य भाविकांना प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यासाठी निमंत्रित करत आहेत. प्रसाद आणि महाप्रसाद झाल्यानंतरही कागदाच्या पत्रावळ्या टाकण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लंगरच्या ठिकाणी केर काढण्याची व्यवस्था आदी सर्व व्यवस्थाही करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक लंगरच्या ठिकाणी नियमित सहस्रो भाविक प्रसाद-महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि तो ग्रहण करून झाल्यानंतर ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत कृतज्ञता व्यक्त करत आहेत. लंगर देणारे भाविकही श्रीरामांची सेवा करत असल्याच्या भावाने येणार्या भाविकांना प्रसाद-महाप्रसादाचे वाटप करत आहेत. या ठिकाणी असलेल्या सर्वांमध्ये प्रकर्षाने सेवाभाव दिसून येत आहे.
५. चित्र आणि प्रतिकृती यांच्या माध्यमातून रामकथेचे दर्शन !
अयोध्यानगरीत प्रवेश करणाच्या सर्व मुख्य मार्गावर चित्रे, मूर्ती, प्रतिकृती, देखावे आदी माध्यमांतून रामकथा साकारण्यात आल्या आहेत. अयोध्यानगरी प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर रामकथेतील घटनांची चित्रे रंगवण्यात आली आहेत, तर मार्गामध्ये प्रभु श्रीराम, मारुतिराया यांच्या विविध मुद्रांमधील प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या प्रतिकृती अप्रतिम असून सजीव असल्याप्रमाणे भासत आहेत.
६. श्रीराममय अयोध्या !
अयोध्येतील प्रत्येक रस्त्यावर श्रीरामाचे चित्र असलेले भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. रस्त्यांवर धर्नुधारी श्रीरामाच्या प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत. अयोध्येच्या परिसरात विविध आखाड्यांद्वारे रामकथांचे कार्यक्रम चालू आहेत. दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक कपाळावर ‘जय श्रीराम’ नामाचा लेप लावत आहे. अयोध्यानगरीतील सर्व दुकानांवर श्रीरामाचे चित्र असलेले ध्वज लावण्यात आले आहेत.
७. पोलिसही करत आहेत श्रीरामाचा जयघोष !
अयोध्यानगरीमध्ये सुरक्षेसाठी उत्तरप्रदेशचे सहस्रो पोलीस, तसेच लष्कराचे सैनिक अखंड पहारा देत आहेत. सर्व ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था असूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे भाविकांना दमदाटी करण्याचा किंवा अनावश्यक अडवण्याचा प्रकार कुठेही आढळून आला नाही. निधर्मीपणाचा साळसूदपणा न दाखवता पोलीसही श्रीरामाच्या नामाचा जयघोष करत भाविकांना सहकार्य करत आहेत.
८. स्वच्छतेसाठी सहस्रो कर्मचारी कार्यरत !
उत्तरप्रदेश सरकार आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा यांचे सहस्रो कर्मचारी स्वच्छता राखण्याचे काम करत आहेत. अयोध्यानगरी मोठ्या प्रमाणात सुसज्ज करण्याचे काम चालू असल्यामुळे सर्वत्र धूळ पसरत आहे. रस्त्यावर साचणारी ही धूळ स्वच्छ करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वाहनाद्वारे रस्ते स्वच्छ केले जात आहेत आणि ते धुण्यातही येत आहेत.
एकूणच अयोध्यानगरीतील सर्व वातावरण प्रभु श्रीरामाने भारित झाले आहे आणि ही रामनामाची लाट वेगाने संपूर्ण देशभरात पसरत आहे. २२ जानेवारीला प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल; परंतु ही प्राणप्रतिष्ठापना केवळ श्रीरामजन्मभूमीमध्ये श्रीरामाच्या मंदिरापुरती सीमित राहिलेली नाही. सध्या अयोध्येमध्ये दिसणारे चित्र भविष्यात भारताची हिंदु राष्ट्राकडे वेगाने होणार्या वाटचालीचेच प्रतीक आहे, हे निश्चित !
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, अयोध्या. (१९.१.२०२४)