जुन्नर (पुणे) येथील कुकडेश्वर मंदिराच्या कामासाठी २ कोटींचा निधी संमत !
जुन्नर (जिल्हा पुणे) – स्थानिक आदिवासी समाजाकडून गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील पूर येथील कुकडेश्वर मंदिरावर कळस बांधण्याची मागणी केली जात होती. ‘कुकडेश्वर मंदिराचे सद्यस्थितीत असणारे बांधकाम वजन पेलण्यास सक्षम नसल्याने कळस बांधता येणार नाही’, अशी भूमिका राज्य पुरातत्व विभागाने घेतली होती. हिंदु मंदिरामध्ये कळसाचे मोठे महत्त्व असल्याने कळसाची ही मागणी सातत्याने केली जात होती. कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचे काम करण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले असून कळस बसवण्यापूर्वी मंदिराच्या मजबुतीकरण आणि अन्य कामांसाठी अनुमाने २ कोटी ६ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया १८ जानेवारी या दिवशी चालू झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
याविषयी डॉ. कोल्हे यांनी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याशी चर्चा करून कुकडेश्वर मंदिरावर कळस उभारण्याची मागणी केली होती. डॉ. गर्गे यांनी मंदिराच्या स्थापत्य शैलीचा अभ्यास करून तज्ञ वास्तुविशारदाकडून प्रस्तावित कळसाच्या बांधकामाचा आराखडा आणि अंदाजपत्रक करण्याचे निर्देश साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांना दिले होते. आदिवासी बांधवांच्या भावना आणि खासदार डॉ. कोल्हे यांचा आग्रह लक्षात घेऊन पुरातत्व विभाग, पुणे यांनी मंदिराचे ‘स्ट्रक्चर ऑडिट’ करून घेतले. त्यानुसार प्रथम मंदिराचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. वाहणे यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून पाठपुरावा केला.