हिंदूंसाठी आणि भारताच्या दृष्टीने श्रीरामाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘श्रीराम’ असे उच्चारले की, प्रत्येक हिंदूमध्ये श्रीरामाशी संबंधित स्मृती जागृत होतात. श्रीराम म्हटले की, त्यासमवेत सीतामाता, लक्ष्मण, हनुमान, रामायण, अयोध्या, राजा दशरथ, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा, भरत, शत्रुघ्न असे सर्व आपल्या मनात येतात. ज्यामध्ये अविनाशी चैतन्य आहे, तेच चिरंतन असते. ‘लाखो वर्षांनंतरही, सहस्रो पिढ्या होऊन गेल्यावरही राम जनमानसात आदरणीय आहे, म्हणजेच तो अविनाशी भगवंत आहे’, हे लक्षात येते. श्रीरामाचे महत्त्व प्रत्येक हिंदूसाठी अनन्यसाधारण आहे. त्याच्याशी संबंधित काही उल्लेखनीय सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीरामाचा इतिहास सांगणारी स्थाने युगानुयुगे अस्तित्वात असणे
अ. श्रीरामाच्या काळाशी संबंधित त्याचे जन्मस्थान अयोध्यानगरी, शरयू नदी, लंका, अशोक वाटिका, रामेश्वरम्, श्रीरामसेतू अजूनही अस्तित्वात आहेत.
आ. भारतातील अनेक स्थाने, उदा. पर्वत, नदी, अरण्ये ही श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झाली आहेत. एवढेच नव्हे, तर ही सर्व स्थाने युगानुयुगे श्रीरामाचा इतिहास सांगत आहेत. त्यात सांगण्यासारखी काही स्थाने, म्हणजे चित्रकूट पर्वत, पंचवटी, दंडकारण्य, किष्किंधा, ॠष्यमुख पर्वत, प्रयाग, गंगा नदी, हंपी, शरावती नदी, रामेश्वरम्, ब्रह्मगिरी पर्वत (त्र्यंबकेश्वर, नाशिक), गंधमादन पर्वत (तिबेट), संजीवनी पर्वत (रूमास्सला पर्वत, श्रीलंका, साभार – संकेतस्थळ ‘आज तक’), धनुष्यकोडी, अशोक वाटिका (श्रीलंका), तिरुपुल्लाणी (तमिळनाडू), जनकपूर (नेपाळ), लेपाक्षी (आंध्रप्रदेश), रामकोट, अमरकंटक, रामटेक, भद्राचलम् (तेलंगाणा) अशी शेकडो स्थाने आहेत.
२. भारतातील ३ सहस्र ६२६ गावांच्या नावात राम असणे
‘राम’ या नावाने आरंभ होणार्या गावांची संख्या भारतात सहस्रोंनी आहे आणि प्रत्येक गाव श्रीरामाची आठवण त्याच्या हृदयात घेऊन वसलेले आहे. रामपूर, रामेश्वरम्, रामनाथपूरम्, रामनगर, रामबन, रामचंद्रपूर, रामगुंडम्, रामगढ, रामावरम् अशा भारतातील ३ सहस्र ६२६ गावांच्या नावात राम हे नाव असल्याचा ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. (साभार – ‘द इंडियन एक्सप्रेस’ संकेतस्थळ)
३. रामसेतू – श्रीरामाचा इतिहास गौरवाने सांगणारे स्मारक !
जागतिक स्तरावर वैज्ञानिकांना चकित करणारा ‘श्रीरामसेतू’ हा मानवनिर्मित दगड-वाळूचा सेतू श्रीरामाचा इतिहास गौरवाने सांगणारे एक स्मारक अजूनही पृथ्वीवर आहे. संशोधकांनी सेतूच्या वर असलेल्या वाळूमध्ये अत्यधिक प्रमाणात किरणोत्सर्गी घटक असल्याचा शोध लावला आहे, तर ‘सेतूच्या खाली असलेला एखादा दगड जेव्हा सेतूतून वेगळा होतो, तेव्हा तो दगड पाण्यात तरंगतो’, असे त्यांच्या लक्षात आले आहे.
४. भारतात श्रीरामाची शेकडो मंदिरे १ सहस्र वर्षे प्राचीन असणे
श्रीरामाच्या नावाने भारतात सहस्रो मंदिरे आहेत. त्यांतील शेकडो मंदिरे १ सहस्र वर्षांपेक्षाही प्राचीन आहेत. काही मंदिरे अशा ठिकाणी बांधण्यात आली आहेत, जेथे श्रीरामाचा चरणस्पर्श झाला आहे. या मंदिरांतील एकेक दगड आणि शिल्प आजही श्रीरामाची कथा आपल्याला सांगत आहेत, तर तेथे प्राणप्रतिष्ठा झालेल्या मूर्ती भक्तांमध्ये श्रीरामाप्रती भाव जागृत करत आहेत.
५. श्रीरामाचा वनगमनाचा पथ सांगणारी २४८ स्थाने आतापर्यंत सापडली असणे
काही श्रीरामभक्तांनी ‘श्रीरामाने १४ वर्षांच्या वनवासात कोणत्या दिशेने आणि कोणकोणत्या गावांतून प्रवास केला ?’, हे शोधण्याचा प्रयत्न केला. या योजनेला त्यांनी ‘श्रीराम वनगमन पथ’ असे नाव दिले. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत २४८ स्थानांची सूची बनवण्यात आली आहे.
६. श्रीरामाची जीवनकथा सांगणारे वाल्मीकि रामायण आणि त्यावरून प्रेरणा घेऊन रामभक्तांनी लिहिलेल्या रामायणांची संख्या ३०० हून अधिक असणे
श्रीराम आणि रामायण हे हिंदूंच्या श्वासात वसलेले आहे, रक्तात मिसळलेले आहे. भारतात जन्म घेतलेल्या श्रीरामाची जीवनकथा सांगणारे ‘रामायण’ वाल्मीकिॠषींनी लिहिले. आजपर्यंत भारतात मूळ वाल्मीकि रामायणावरून प्रेरणा घेऊन अन्य श्रीरामभक्तांनी त्यांच्या भावानुसार वेगवेगळी रामायणे लिहिली आहेत. तुलसी रामायण, कंब रामायण, श्रीरंगनाथ रामायण, कृत्तीवासी रामायण, अद्भुत रामायण, कुमुदेंदु रामायण, कण्णास रामायण, भावार्थ रामायण आदि ३०० पेक्षा अधिक रामायणे भारतात लिहिली गेली आहेत.
७. आशिया खंडातील अनेक देशांत स्थानिक भाषांतून रामायणे लिहून त्याद्वारे श्रीरामाचा आदर्श सांगितला असणे
वैशिष्ट्य म्हणजे म्यानमार (ब्रह्मदेश), इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, चीन आदि देशांमध्ये मूळ रामायणातून प्रेरणा घेऊन त्यांच्या स्थानिक भाषेत वेगवेगळ्या रामायणांची रचना केली आहे. थायलंड येथील आतापर्यंतचे सर्व राजे त्यांच्या नावाच्या आधी रामा १, रामा २, असे लावत आले आहेत. बँकॉकच्या आधी थायलंडमधील ‘अयुधया’ (अयोध्याचा अपभ्रंश) शहर थायलंडची राजधानी होती. थायलंडमध्ये आजही ‘थाय रामायण’ प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये श्रीरामाला आदर्श राजा मानले आहे.
८. श्रीरामाशी संबंधित स्थाने पहाण्यासाठी अनेक दिवस लागणे
श्रीरामाशी संबंधित एकेका स्थानाचे दर्शन करायचे असल्यास काही दिवसही पुरणार नाहीत. दक्षिण भारतातील ‘रामेश्वरम्’ हे तीर्थक्षेत्र अत्यंत प्रसिद्ध आहे. रामेश्वरम् हे एक द्वीप आहे. या द्विपावर श्रीरामाशी संबंधित ६० पेक्षा अधिक स्थाने आहेत, जी बघायला किमान ४ दिवस लागतात. श्रीलंकेत श्रीरामाशी संबंधित ५४ स्थानांची ओळख आतापर्यंत झाली आहे. या सर्व स्थानांचे दर्शन करायला किमान १५ दिवस लागतात.
९. भारतातील हिंदूंचे जीवन रामनामाने व्यापलेले असणे
राम हे नाव भारतात एवढे प्रचलित आहे की, लाखो लोकांच्या नावांमध्ये रामाचा उल्लेख आहे. भारतातील हिंदूंच्या नावात तरी राम आहे, नाहीतर त्यांच्या दैनंदिन कृतीमध्ये राम भरलेला आहे. खेडोपाडी घरात मोठा ‘रानकिडा’ किंवा ‘भोवरा’ आल्यास ‘राम राम’ म्हणून त्याला शांत करण्याची किंवा बाहेर पाठवण्याची पद्धत आहे. उठतांना, बसतांना, एकमेकांना भेटतांना ‘राम राम’ म्हणण्याची पद्धत आहे. श्रीरामाचा जप वहीमध्ये लिहिण्याची पद्धत काही भागांमध्ये प्रचलित आहे.
श्रीरामाविषयी संशोधन करून लिहायचे झाल्यास अशा अगणित गोष्टी लक्षात येतील, एवढा श्रीरामाचा महिमा आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर ‘श्रीराम’ हा हिंदूंच्या हृदयात वसलेला आहे. श्रीराम हा भारताचा प्राण आहे. श्रीराम सनातन धर्माचे मूर्तीमंत रूप आहे. अशा श्रीरामाला त्रिवार वंदन करूया आणि त्याच्या नित्यस्मरणाने जीवन आनंदी करूया !
– श्री. विनायक शानभाग (वय ४० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), कुंभकोणम्, तमिळनाडू (१२.०१.२०२४)