अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीतील सनातन संस्थेचा आध्यात्मिक सहभाग !
श्रीरामजन्मभूमी अयोध्येत श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष कारसेवा, कायदेशीर लढा, राजकीय लढा, प्रचार, जागृती, धनसमर्पण आदी विविध मार्गांनी कार्य घडले आहे. हा संघर्ष हिंदूंच्या स्वाभिमानाचा असल्याने प्रत्येकाने यथाशक्ती योगदान दिलेले आहे. या रामकार्यातील सनातन संस्थेचेही योगदान हे आध्यात्मिक स्वरूपाचे होते.
अध्यात्मातील अधिकारी संत किंवा आध्यात्मिक संस्था हे आध्यात्मिक पातळीवर कार्य करत असतात. हे कार्य कधीही प्रसिद्धीस येत नसते. असे कार्य करणार्यांपैकीच एक सनातन संस्था आहे. भव्य-दिव्य कार्ये घडत असतांना त्यात आध्यात्मिक पातळीवरही अनेक कृती केल्या जात असतात आणि त्याचे एक महत्त्व असते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आदी पातळीवर कार्य करणार्यांना याची थोडीफार माहिती मिळावी, यासाठी हे लेखन केले आहे.
१. वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात श्रीरामजन्मभूमीचा खटल्याचा निकाल लागणार होता, त्या वेळी सनातन संस्थेने सर्व साधकांना आणि समाजाला आवाहन केले होते, ‘रामजन्मभूमीचा निकाल हिंदु समाजाच्या पक्षात लागण्यासाठी प्रार्थना करा !’ (प्रार्थना म्हणजे प्रभु श्रीरामाचा आर्ततेने धावा करणे. असा धावा केवळ भगवंताचे भक्त, साधक आणि संत करू शकतात !)
२. सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत असल्याने ‘या कायदेशीर लढ्याला आध्यात्मिक बळ प्राप्त व्हावे आणि निकाल शीघ्रातिशीघ्र लागावा’, यासाठी जानेवारी २०१९ मध्ये सनातन संस्थेने देशभर ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ राबवले. ‘श्रीरामाचा नामजप करून या कायदेशीर लढ्याला आध्यात्मिक ऊर्जा देणे’, यासाठी हे अभियान राबवण्यात आले होेते.
३. जानेवारी २०१९ ते ९.११.२०१९ या ११ मासांच्या कालावधीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी देशभर भ्रमण करून अनेक तीर्थक्षेत्री अनुष्ठाने आणि यज्ञ केले.
४. ९.११.२०१९ या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयातील निकालाच्या दिवशी आणि निकालाच्या प्रत्यक्ष वेळी महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तिरुपति बालाजीसमोर उभे राहून अनुष्ठान केले.
५. १० नोव्हेंबर २०१९ या दिवशी, म्हणजे निकाल लागल्यानंतर दुसर्या दिवशी ‘श्रीरामजन्मभूमीत शीघ्रातिशीघ्र भव्य दिव्य मंदिर उभे रहावे’, यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन अनुष्ठान केले.
६. ३१.७.२०२० या दिवशी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अयोध्येला जाऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर न्यासाचे सचिव श्री. चंपत राय यांच्याकडे श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी सुवर्णाचे दान दिले. यासाठी महर्षींच्या आज्ञेने पंचमहाभूतांचे प्रतीक म्हणून सुवर्णाचे ५ मणी बनवून घेण्यात आले होते.
७. याच दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी प्रत्यक्ष शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताची माती, कैलास चरणस्पर्शाची माती, कैलास गौरीकुंडाची माती आणि मानस सरोवराचे जल श्रीरामजन्मभूमी मंदिर न्यासाचे सचिव श्री. चंपत राय यांच्याकडे सुपुर्द केले.
८. १५.१.२०२४ पासून सनातन संस्थेचे साधक ‘अयोध्येच्या श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम निर्विघ्नपणे व्हावा’, यासाठी प्रार्थना आणि अनुष्ठान करत आहेत.’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (१९.१.२०२४)