मालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारतद्वेषामुळे त्यांच्या देशातील १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !
भारताने दिलेली एअर अॅम्ब्युलन्स वापरण्यास राष्ट्रपतींनी नकार दिल्याने उपचाराच्या अभावी मुलाचा मृत्यू
माले (मालदीव) – मालदीव आणि भारत यांच्यातील तणावामुळे मालदीवच्या एका १४ वर्षांच्या मुलाचा नाहक मृत्यू झाला. याला मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू उत्तरदायी आहेत. या मुलाला ब्रेन ट्युमर होता. त्याला पक्षघाताचा झटका आला, तेव्हा त्याला त्याच्या गावातून वैद्यकीय उपचारांकरता विमानाद्वारे राजधानी माले येथे नेण्याची तातडीने आवश्यकता होती. यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची आवश्यकता होती; मात्र राष्ट्रपती मुइज्जू यांनी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे नेण्यास अनुमती नाकारल्याने या मुलाचा मृत्यू झाला. ही एअर अॅम्ब्युलन्स भारताने मालदीवला दिली होती. त्यामुळे राष्ट्रपती मुइज्जू यांनी तिचा वापर करण्यास नकार दिला. त्यांच्या या भारतद्वेषी मानसिकतेमुळे त्यांच्याच देशाच्या एका मुलाचा मृत्यू झाला. या घटनेवरून मालदीवच्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या, हे अद्याप समजू शकलेले नाही; मात्र मालदीवचे खासदार मीकाईल नसीम म्हणाले की, राष्ट्रपतींचे भारताशी असलेल्या वैरामुळे लोकांना त्यांच्या जिवाची किंमत मोजावी लागू नये.
सौजन्य विऑन
मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की, मुलाला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आम्ही तातडीने आयलंड एव्हिएशनशी संपर्क साधला होता; परंतु त्यांनी आमच्या संपर्काला तातडीने प्रतिसाद दिला नाही. मुलाला १६ घंट्यांनी माले येथे नेण्यात आले.
विमानात बिघाड झाल्यामुळे सुविधा देता आली नाही ! – आस्थापनाचा दावा
तातडीने एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध केली नाही, या आरोपावर संबंधित आस्थापनाने सांगितले की, आपत्कालीन एअर अॅम्ब्युलन्सची विनंती मिळाल्यानंतर लगेचच रुग्णाला माले येथे नेण्यासाठी प्रक्रिया प्रारंभ झाली होती; परंतु दुर्दैवाना शेवटच्या क्षणी विमानात काही तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे आम्हाला एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा देता आली नाही, असा दावा केला आहे.