Mumbai Ram Temple Installation BJP:श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त भाजपच्या वतीने नवी मुंबईत विविध कार्यक्रम – संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष
नवी मुंबई – अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली.
नाईक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात येते आहे. बोनकोडे येथील येथील पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह रामभक्तांनी मंदिरामध्ये स्वच्छतासेवा अर्पण केली. नवी मुंबईमध्ये २३२ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. सर्व मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. प्रत्येक मंदिरामध्ये प्रभू श्रीराम चंद्र यांच्या पताका आणि दीपोत्सवासाठी दिव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. २१ जानेवारी या दिवशी कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर श्रीरामाची २ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहरामध्ये ५० हजार किलो लाडूंचे वाटप प्रसाद म्हणून केले जाणार आहे. तसेच शहरामध्ये होम हवन, कीर्तन, भजन, श्रीराम कंदील, महाप्रसाद, महाआरती, हनुमान चालीसा पठण, रामरक्षा पठण, ढोल ताशा सह शोभायात्रा, ध्वजपथक सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव, मंदिरांवर रोषणाई, रथयात्रा, आतिषबाजी अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वाशी येथील इच्छापूर्ती जागृत श्री सोमेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री राम कथा पठण कार्यक्रम प्रभाग ५८ मध्ये चालू असून उद्या त्याचा समारोप आहे. माजी नगरसेवक सुरज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेरूळच्या सेक्टर १२ येथील तेरणा विद्यालयाच्या क्रीडांगणावर २२ जानेवारीला सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भक्तिमय श्रीराम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने विविध उपक्रम आयोजित करून सर्वांनी भव्य श्रीराम मंदिरात विराजमान होणाऱ्या रामललाचे दर्शन घ्यावे. घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका, आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण साजरा करावा, असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी केले आहे. |