श्रीरामजन्मभूमी आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंच्या अविरत धर्मयुद्धाच्या विजयाचा दिवस !
‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक, तसेच गौरवाचे चिन्ह आहे. वर्ष १५२८ मध्ये बाबरने राममंदिराचा विध्वंस केला, तेव्हापासून हे अविरत धर्मयुद्ध चालू झाले. त्यानंतर वर्ष १९४९ पर्यंत विविध प्रकारचे संघर्ष झाले. रामजन्मभूमीवर बाबर, हुमायू, अकबर, औरंगजेब, नवाब अली असे सर्वांनी आक्रमण केले. वर्ष १६८४ मध्ये औरंगजेबाने रामजन्मभूमीवर आक्रमण केले होते. एवढेच नाही, तर इंग्रजांनीही वर्ष १९१२ ते १९३४ पर्यंत येथे संघर्षमय वातावरण निर्माण केले. इंग्रज शासनकाळात २ वेळा संघर्ष झाला. अशा प्रकारे रामजन्मभूमी वाचवण्यासाठी एकूण ७६ वेळा संघर्ष झाला. या भूमीसाठी आपले पराक्रमी राजे, साधूसंत आणि सामान्य जनता यांनी तन, मन अन् धन यांचा त्याग करून तीव्र संघर्ष केला आणि बलीदान केले. वर्ष १९८४ मध्ये या संघर्षाची गती अधिक वाढली.
३० ऑक्टोबर १९९० मध्ये अयोध्या येथे श्रीराम कारसेवा समितीची स्थापना झाली. सर्वांनाच माहिती आहे की, त्या वेळी कारसेवकांचे कशा प्रकारे दमन करण्यात आले. त्यांना या जन्मभूमीवर येण्यापासून थांबवण्यात आले. उत्तरप्रदेशच्या तत्कालीन मुलायम सिंह सरकारच्या आदेशान्वये पोलिसांनी निरपराध कारसेवकांवर गोळीबार केला. त्यात अनेक कारसेवकांनी या संघर्षासाठी त्यांच्या प्राणांचे बलीदान केले आहे. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी कारसेवकांनी बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला. तो एक मोठा ऐतिहासिक दिवस होता. आश्चर्याचे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदूंच्या श्रद्धांचे मोठे केंद्र असलेल्या श्रीराममंदिरासाठी मोठा संघर्ष करावा लागला. खालच्या न्यायालयापासून सर्वाेच्च न्यायालयापर्यंत हे अविरत धर्मयुद्ध चालले. परिणामी ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने अंतिम निवाडा करून रामजन्मभूमी श्री रामललाला परत केली. त्यानंतर एक प्रकारे हिंदूंनी ५०० वर्षे केलेल्या संघर्षाचा अंत झाला. आता रामजन्मभूमीमध्ये भव्य असे श्रीराममंदिर उभे राहिले आहे. २२ जानेवारी २०२४ या दिवशी तेथे रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. एक प्रकारे प्रभु श्रीरामाच्या कृपेने रामभक्तांचा विजयी दिवस आहे. हा दिवस पहाण्यासाठी आणि हिंदु धर्म वाचवण्यासाठी हिंदूंनी अविरत धर्मयुद्ध केले आहे, हे लक्षात ठेवायला हवे. यातूनच प्रेरणा घेऊन हिंदूंनी आता रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत !’
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (३१.१२.२०२३)