५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला !
ऑक्टोबर १९९० मध्ये झालेल्या ‘श्रीरामजन्मभूमी अभियाना’साठी पाचल माध्यमिक शाळेत आमचे गुरुवर्य श्री. द.वि. ठाकूर देसाई आाणि रा.स्व. संघाचे श्री. वझे सर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी माझे नाव दिले. मनात केवळ ‘प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन त्यांचे दर्शन घेता येईल’ इतकेच होते.
राजापूर तालुक्यातून सुमारे २५ ते ३० कारसेवक निघणार होते. तत्कालीन आमदार श्री. शिवाजीराव गोताड आणि गुहागरचे आमदार श्री. श्रीधर (तात्यासाहेब) नातू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई गाठली आणि तेथून रेल्वेने अयोध्येकडे रवाना झालो. विश्व हिंदु परिषदेच्या आवाहनानंतर देशभरातून लक्षावधी रामभक्त येणार, हे उत्तरप्रदेश सरकार जाणून होते. संचारबंदी लागू करण्यात आली होती. आम्हालाही उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रतापगड रेल्वेस्थानकावरून खाली उतरण्यास भाग पाडले.
आम्हाला तेथील स्थानिक कारसेवकांनी अयोध्येपर्यंत सुमारे १३०-४० किलोमीटर पायीच नेले, तेही आडवळणातून, शेतातून, नदी-नाल्यांतून, चिखलातून आणि बांधांवरून ! जातांना वाटेत अर्थात्च रामभक्त हिंदूंच्या जवळ-जवळ प्रत्येक घरातून जाती-पातीचा कसलाही विचार न करता सेवा दिली जात होती. सुमारे अडीच-तीन दिवस प्रतिदिन १०-१२ तास चालणे होत असे. पहिला दिवस उत्साहात गेला, गोमती पार केली. नंतर पायाला फोड आलेले, बूट घालून चालणेही वेदनादायक होत होते; पण ‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकल्या की, पुढे पुन्हा उत्साहाने वाट चालाण्याची सगळी शक्ती एकवटली जायची.
३० ऑक्टोबरला सकाळी कारसेवकांनी बाबरी ढाचावर चढून भगवा फडकावला. सुमारे ५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला. ‘याचसाठी केला होता अट्टहास’, अशी बातमी मिळाली. दुर्दैवाने कारसेवकांवर बेछूट गोळीबार झाला. तेथील वातावरण हिंसक बनले. प्रशासनाने आमची रवानगी फैजाबाद रेल्वेस्थानकावर केली आणि तिथूनच मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करत आम्ही सगळे आपआपल्या घरी पोचलो. अत्यंत विमनस्क परिस्थितीत घडलेली ही यात्रा अपूर्णच राहिली.
– श्री. सुहास रंगनाथ सप्रे, मु.पो. तळवडे, राजापूर.