अयोध्येतील श्रीराममंदिर म्हणजे सोमपुरा घराण्याचे सुवर्ण अक्षरांत नोंदवले जाणारे अद्वितीय कार्य !
अयोध्येतील श्रीराममंदिराचा आराखडा बनवला तो वास्तूशिल्पकार श्री. चंद्रकांत सोमपुरा (वय ८० वर्षे) यांनी ! श्री. चंद्रकांत सोमपुरा यांनी ३० वर्षांहून अधिक काळ ‘श्रीराममंदिर कसे असावे ?’ यासाठी जीवतोड मेहनत घेतली आहे. वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला आणि त्यानंतर रामजन्मभूमीचे सूत्र २७ वर्षे न्यायालयात निर्णयासाठी प्रतीक्षेत होते; परंतु त्या काळातही विश्व हिंदु परिषदेचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष (स्व.) अशोक सिंघल यांच्यासह श्री. चंद्रकांत सोमपुरा अयोध्येत गेले होते अन् त्यांनी प्रस्तावित मंदिराची मोजमापे सुरक्षायंत्रणांच्या लक्षातही येणार नाही, अशा पद्धतीने केवळ पावलांच्या आधारे घेतली होती आणि त्यावरून प्रस्तावित मंदिराचा आराखडा बनवला होता.
नूतन श्रीराममंदिराविषयी श्री. चंद्रकांत सोमपुरा यांचा अभिप्रायसार्या जगाला ज्या मंदिर उभारणीची उत्सुकता होती, ज्या मंदिराच्या उभारणीसाठी स्वतंत्र भारतातही हिंदुस्थानातील हिंदूंना ३ दशके संघर्ष करावा लागला, अशा मंदिराचे वास्तूशिल्प बनवण्याचे भाग्य आमच्या कुटुंबाला मिळाले आहे, याचा मला अभिमान आहे. |
मंदिर बांधकामाची शैली आणि सोमपुरा घराण्याचा संबंध !मंदिर बांधकामाच्या नागर शैली, द्रविड शैली आणि वेसर शैली या एकूण ३ शैली आहेत. त्यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतात वापरली जाणारी शैली. उत्तर भारताच्या विशाल भूभागात या शैलीची असंख्य मंदिरे याआधीही बांधली गेली आहेत. ओडिशातील भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर, कोनार्कचे सूर्यमंदिर यांच्यासाठीही याच हिंदु स्थापत्यशैलीचा अवलंब करण्यात आला आहे. अगदी अलीकडचे या शैलीतील मंदिर, म्हणजे सोमनाथ मंदिर. सोमपुरा हेच त्याचेही शिल्पकार होते. वर्ष १९५०-५१ मध्ये कन्हैयालाल मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा बांधले गेले. तेव्हाच्या बांधकामाची संपूर्ण धुरा ‘मंदिर स्थापत्यकार’ म्हणून श्री. चंद्रकांत सोमपुरा यांचे आजोबा पद्मश्री प्रभाशंकर सोमपुरा यांनीच सांभाळली होती. प्रभाशंकर सोमपुरा हे केवळ मंदिर वास्तूशिल्पकार नव्हते, तर त्यांनी मंदिर बांधकामावर १४ पुस्तकेही लिहिली आहेत की, जी आज या विषयाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. |
श्री. चंद्रकांत सोमपुरा यांच्या घराण्याविषयी…गेली ५०० वर्षे सोमपुरा घराणे मंदिरांचे बांधकाम करत आहे. सोमपुरा कुटुंबाने आतापर्यंत देश-विदेशांतील २०० हून अधिक मंदिरांची निर्मिती केली आहे. सोमपुरा घराण्याची अशी श्रद्धा आहे की, मंदिर निर्माणाची कला सोमपुरा घराण्याला शिकवली ती थेट भगवान विश्वकर्मा यांनी ! मंदिर बांधणी हा त्यांचा व्यवसाय असला, तरी त्याकडे ते व्यावसायिक दृष्टीकोनातून पहात नाहीत. मंदिर निर्मितीच्या व्यवसायात असलेली श्री. चंद्रकांत सोमपुरा यांची ही १५ वी पिढी ! अयोध्येतील संकल्पित श्रीराममंदिराच्या बांधकामात आता प्रत्यक्ष लक्ष घालणारे श्री. चंद्रकांत सोमपुरा यांचे चिरंजीव श्री. निखिल आणि श्री. आशिष हे १६ व्या, तर श्री. निखिल यांचा मुलगा १७ व्या पिढीतील प्रतिनिधी आहे. श्री. चंद्रकांत सोमपुरा यांनी कोरोना महामारीच्या काळात स्वतःला अयोध्येत भूमीपूजनासाठी जाण्यापासून रोखले. असे असले, तरी श्री. आशिष आणि श्री. निखिल हे थेट कर्णावतीहून (गुजरात) भूमीपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत उपस्थित राहिले होते. |
श्रीराममंदिराचा प्रकल्प हाती घेतल्यानंतर ‘लार्सन अँड टूब्रो’चे उजळले भवितव्य !
अयोध्येतील कामास प्रारंभ झाल्यानंतर या आस्थापनाला बांगलादेश, नेपाळ, सौदी अरेबिया येथील कामे नव्याने मिळाली. तमिळनाडूमधील ५० मेगावॅट ‘फोटोव्होल्टाईक प्लॉट’चे कामही ‘लार्सन अँड टूब्रो’ला मिळाले आहे. हे पालटू लागलेले आर्थिक वातावरण हा श्रीराममंदिराच्या बांधकामाचा पायगुण तर नव्हे !
१. चंद्रकांत सोमपुरा यांचे श्रीरामजन्मभूमीच्या भूमीपूजनाविषयीचे बोल खरे होणे
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना श्री. चंद्रकांत सोमपुरा यांच्या घरी जात असत. त्या वेळी ते ‘श्रीराममंदिर केव्हा बांधणार ?’, असे श्री. सोमपुरा यांना विचारत असत. त्यावर श्री. सोमपुरा गमतीने म्हणत, ‘‘तुम्ही पंतप्रधान व्हा, म्हणजे श्रीराममंदिराचा मार्ग मोकळा होईल. तो झाला की, तुमच्या हस्ते भूमीपूजन होईल, तेव्हा मी नक्की येईन आणि मंदिर बांधून झालेले मी स्वतः बघीन.’’ प्रत्यक्षातही तसेच घडले.
२. श्रीराममंदिराचा आराखडा चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे येण्यामागील घटना !
श्री. चंद्रकांत सोमपुरा यांनी गुजरातेतील अक्षरधाम, मुंबईतील स्वामीनारायण मंदिर आणि कोलकातामधील बिर्ला मंदिर बांधले आहे. विहिंपचे अशोक सिंघल यांनी कोलकातामधील बिर्ला मंदिर पाहिल्यानंतर त्यांनी बिर्लाजींकडे ‘या मंदिराचे वास्तूशिल्पकार कोण आहेत ?’, याची विचारणा केली होती, तसेच प्रस्तावित श्रीराममंदिरासाठी ‘श्री. सोमपुरा हे कितपत सहकार्य करू शकतील ?’, याची विचारणा केली होती. त्यानंतर या उभयतांची भेट झाली. त्या वेळी श्री. सोमपुरा यांनी आनंदाने श्रीरामजन्मभूमीवरील प्रस्तावित बांधकाम करण्यास सहमती दर्शवली होती.
३. राममंदिर आणि त्याचे बांधकाम कसे आहे ?
श्री. चंद्रकांत सोमपुरा यांनी अशोक सिंघल यांच्यासह घेतलेल्या त्या मापांनुसारच मंदिराचे आणि मंदिर परिसराचे आरेखन केले, तसेच राजस्थानमधून दगड मागवून त्यावरील कोरीवकाम आणि नक्षीकाम चालू केले. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मंदिराचा नवा आराखडा सिद्ध करून त्यासाठी रीतसर अनुमती घेण्यात आली. आश्चर्य म्हणजे आज इतक्या वर्षांनंतरही ती मापेच ग्राह्य धरून मंदिराचे बांधकाम चालू करून ते पूर्ण झाले आहे. गेल्या ३० वर्षांत झालेल्या कोरीव-नक्षीकामातील एकही स्तंभ वाया जाणार नाही, याची काळजी घेऊनच हा नवा आराखडा सिद्ध करण्यात आला. २०० फूट खोल भूमीत गाडल्या गेलेल्या १ सहस्र २०० खांबांवर हे मंदिर उभे रहाणार आहे. प्रत्येकी १ मीटर व्यासाचे हे खांब (पिलर) आहेत. भूमीपूजनानंतरच्या काही आठवड्यांत अनुमाने २०० खांब भूमीत गाडून आणि त्यावर भरपूर दाब देऊन त्याची सहनशक्ती पडताळण्यात आली. श्रीराममंदिराच्या संपूर्ण बांधकामात कुठेही स्टीलचा वापर केलेला नाही. एकमेकांवर बसवलेले आणि ‘मेल-फिमेल’ पद्धतीने परस्परांशी जोडले जाणारे दगड वापरूनच मंदिराचे बांधकाम केले गेले.
हे मंदिर नागर शैलीत बांधले गेले असून ते ३ मजली आहे आणि त्याची उंची १६१ फूट आहे. त्याला ५ घुमटाकृती मंडप आणि १ शिखर असून ते सर्व वास्तूशास्त्रानुसार बांधले गेले आहे. श्रीराममंदिराकडे सोपवण्यात आलेली जागा ७० एकर आहे आणि त्यातील २.७७ एकर जागेवर मंदिराचे बांधकाम झाले आहे. मंदिराचा गाभारा अष्टकोनी आहे. मंदिरात एक प्रार्थना कक्ष, एक रामकथा कुंज (व्याख्यान कक्ष), वैदिक पाठशाळा, संत निवास, यती निवास (पाहुण्यांसाठी निवास), संग्रहालय, उपाहारगृह या सुविधा आहेत. भूकंप, वादळ किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तींपासून मंदिराला कसलीही हानी पोचू नये, याची पुरेशी काळजी मंदिर बांधतांनाच घेतली गेली आहे.
४. श्रीराममंदिराचे संपूर्ण बांधकाम ‘लार्सन अँड टूब्रो’ आस्थापनाने करण्यामागील घटना !
श्रीराममंदिराचे संपूर्ण बांधकाम केले ते बांधकाम क्षेत्रातील नावाजलेले आस्थापन ‘लार्सन अँड टूब्रो’ने ! वर्ष १९९० च्या काळात अशोक सिंघल यांची ‘लार्सन अँड टूब्रो’च्या वरिष्ठ अधिकार्यांशी भेट झाली होती. सिंघल यांनी तत्कालीन अधिकार्यांना ‘श्रीराममंदिराच्या बांधकामासाठी आपण सहकार्य कराल का ?’, अशी विचारणा केली. त्यावर आस्थापनाने ‘होकार’ दर्शवला. ३० वर्षांनंतर जेव्हा मंदिर बांधकामाविषयी पुन्हा एकदा ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे महासचिव श्री. चंपत राय यांनी पुन्हा एकदा ‘लार्सन अँड टूब्रो’च्या वरिष्ठांची भेट घेतली आणि तेव्हाच्या आश्वासनाविषयी पुनर्विचारणा केली. आस्थापनाने होकारार्थी उत्तर देतांना ‘हे सर्व काम आम्ही निःशुल्क आणि सेवाभावाने करू’, असेही स्पष्ट केले. श्रीराममंदिराच्या प्रकल्पासाठी आस्थापनाने कंपनीचे सीनियर डिझायनर आर्.एम्. वीरप्पन यांची नियुक्ती केली आहे.
अशा प्रकारे श्रीराममंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून श्री. चंद्रकांत सोमपुरा यांच्या घराण्याकडून इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल, असे अद्वितीय कार्य पूर्णत्वाला गेले आहे.
(साभार : विविध संकेतस्थळे)