‘न भूतो न भविष्यति’ असा होत असलेला अयोध्येतील प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा !
|
१. श्रीरामामुळे हिंदूंना एका वर्षात दुसर्यांदा दिवाळी साजरी करण्याची संधी !
हिंदूंसाठी अयोध्येचे वेगळे महत्त्व आहे. ती राजा दशरथाची नगरी आणि रामललाचे जन्मस्थान आहे. श्रीराम एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा आणि श्रीविष्णूचा ७ वा अवतार होता. कुठे आदर्श असे राज्य किंवा व्यवस्था असेल, तर त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते. असा नावलौकिक राजा श्रीराम यांनी मिळवला होता. अयोध्या हे हिंदूंप्रमाणे जैन आणि बौद्ध यांचेही श्रद्धास्थान आहे. जैनांच्या २४ तीर्थंकरांपैकी ५ तीर्थंकर अयोध्येचे आहेत, तर गौतम बुद्ध यांनी येथे काही दिवस साधना केली आहे. त्यामुळे अयोध्या हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र ठरले आहे. अशा अयोध्येत २२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. त्या निमित्ताने संपूर्ण भारतभर त्याची सिद्धता चालू आहे. प्रचंड उत्साह जनतेमध्ये दिसून येत आहे. यानिमित्ताने हिंदू एकाच वर्षात दुसर्यांदा दिवाळी साजरी करत आहेत. गेली काही आठवडे सर्व देश आणि हिंदू राममय झाल्याचे दिसत आहेत. दूरचित्रवाहिन्या, सामाजिक माध्यमे, वर्तमानपत्रे, सामाजिक माध्यमे यांमध्ये केवळ प्रभु श्रीराम हाच विषय चालू आहे.
२. आध्यात्मिक पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने अयोध्येचा भव्य विकास !
केंद्रशासन अयोध्येला आध्यात्मिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रशासनाने विमानतळ, रेल्वेस्थानक आणि रस्ते यांच्या विकासासाठी सहस्रो कोटी रुपये व्यय केले आहेत. केवळ विमानतळासाठी १ सहस्र ४०० कोटी रुपये व्यय करण्यात आले आहेत. अयोध्या विमानतळाला ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे यथोचित नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे. उत्तरप्रदेशमध्ये अन्य ४ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार आहे. त्यामुळे ५ आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे उत्तरप्रदेश हे एकमात्र राज्य होणार आहे. केंद्रशासनाने रेल्वेस्थानकाची रचना आणि बांधकाम मंदिरासारखे केले आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व भारतभरातून अयोध्येसाठी विशेष रेल्वेगाड्या चालू केल्या आहेत.
अयोध्येत नव्याने पंचतारांकित आणि सप्ततारांकित हॉटेलची उभारणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. या मासात २ लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा कयास आहे. पुढे विशेष सणावाराला ही संख्या अनुमाने २० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश सरकारने ‘अयोध्या डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’ घोषित केली आहे. अयोध्येला ‘स्मार्ट सिटी अयोध्या २०२७’ आणि ‘स्मार्ट सिटी अयोध्या २०३१’ असे घोषित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येला श्रीरामजन्मभूमी घोषित केल्यानंतर तेथील भूमीचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. जेथे ९०० ते १ सहस्र रुपये प्रति चौरस फूट अशी भूमीचे मूल्य होते, ते आज मितीला ३० सहस्र रुपये प्रति चौरस फूट असे झाले आहे. सध्या तेथे १७ मोठी हॉटेल आहेत आणि लवकरच ४० पंचतारांकित हॉटेलची सोय होणार आहे.
‘अयोध्या मास्टर प्लॅन’ किंवा ‘अयोध्या डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’ने ज्या खासगी मालकीच्या जागा आहेत आणि ते त्यांच्या जागा, खोल्या किंवा बांधकामे भक्तांसाठी वापरायला देऊ इच्छितात, अशा ठिकाणांची प्रसिद्धी सरकार करणार आहे, तसेच त्याचे दरपत्रकही निश्चित करणार आहे. त्याचा लाभ दर्शनाला येणार्या भाविकांसह त्या जागेच्या मालकांनाही होणार आहे. काही ठिकाणी धर्मशाळा चालू करण्यात आल्या आहेत.
३. व्यावसायिक दृष्टीकोनातून अयोध्येतील श्रीराममंदिराचे महत्त्व !
२२ जानेवारी या दिवशी होणार्या कार्यक्रमाचा आपण आध्यात्मिकदृष्ट्या विचार करत आहोतच; पण व्यावहारिकदृष्ट्याही त्याचा प्रचंड असा लाभ होत आहे. ‘कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे पदाधिकारी प्रवीण खंडेलवाल यांच्या मते केवळ २२ जानेवारी या दिवशी तेथे ५० सहस्र कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होणार आहे. डिसेंबर २०२३ च्या शेवटी गोवा, मसुरी किंवा अन्य ठिकाणी न जाता पर्यटकांची प्रथम पसंती अयोध्येसाठी होती. अयोध्येत मोठ्या संख्येत पर्यटक पोचले आहेत. ‘ट्राफलगर स्क्वायर कॅपिटल ब्रिटीश कंपनी’ अयोध्येत ७५ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करू इच्छिते. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ५ मोठ्या आस्थपानांच्या माध्यमातून आयोजित केली आहे. हाँगकॉगची टॉशन ग्रुप, आर्.जी. ग्रुप, ऑस्टीन ग्रुप, कॉसिस ग्रुप, इंडो युरोपियन चेंबर ऑफ स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायझेस; युनिकॉर्न, जर्मनी इत्यादी आस्थापने तेथे गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. संरक्षण खात्याला आवश्यक उत्पादनांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे २६ सहस्र लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
श्रीराममंदिराची प्रतिकृती, रामललाची छायाचित्रे, रामललाचे लॉकेट, रामध्वज, चित्रे, रामाचे अंगवस्त्र, तसेच रामाचे किंवा श्रीराममंदिराचे छायाचित्र असलेल्या महिलांच्या रेशमी साड्या, वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड येथे मंदिराच्या प्रतिकृतीचा ‘रांगोळी छापा’ सिद्ध केला आहे, त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे या भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.
४. ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल, हे अयोध्येतील व्यवस्थेतून दिसणे आवश्यक !
गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकीया यांनी श्रीराममंदिरासाठी ११ कोटी रुपये, तर शिवसेना पक्षाने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जगभरातील हिंदु भाविक त्यांच्या परीने योगदान देत आहेत. अयोध्येत देवतांचा वास असल्याने तेथे सुबत्ता आणि संपन्नता रहाणारच आहे. येथे आर्थिकदृष्ट्या विकसित होणे किंवा पर्यटनस्थळ घोषित करून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येथे बोलावणे, हा उद्देश नाही. हिंदूंसाठी या शहराचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.
पूर्वी भारत हा विश्वगुरु होता, तेव्हा नालंदा, तक्षशिला आणि काशी येथे आंतरराष्ट्रीय स्तराची विश्वविद्यालये होती. त्यामुळे तेथे जगभरातून लोक आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येत असत. अगदी गेल्या काही शेकडो वर्षांपर्यंत धर्मसंसदेने दिलेला निर्णय जगभरातील हिंदू मान्य करत असत. रामललाच्या प्रतिष्ठापनेसाठी हिंदूंनी ५०० वर्षांहून अधिक काळ रक्तरंजित लढा दिला, त्याची इतिहासात तोड नाही. अयोध्येला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त व्हावे आणि यासमवेतच हिंदूंना धर्मशिक्षण मिळेल, या दृष्टीने अयोध्या शहराचा विकास झाला पाहिजे. आदर्श ‘रामराज्य’, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल, हे येथील व्यवस्थेतून दिसले पाहिजे. २२ जानेवारीला जगभरातून अनेक राष्ट्रांचे प्रमुख आणि जगभरातील अतीमहत्त्वाच्या व्यक्ती अयोध्येत येत आहेत. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, क्रीडा, नाट्य, कला, साहित्य, चित्रपट, उद्योग यांतील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार आहेत. अयोध्या हे सप्त मोक्षनगरींपैकी एक आहे. त्यामुळे २२ जानेवारीचा सोहळा जगभरात ‘न भूतो न भविष्यति’ असा साजरा होईल, यात शंका नाही.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (८.१.२०२४)