शिखांमध्ये शौर्य निर्माण करण्यासाठी प्रभु श्रीरामाचे चरित्र मांडणारे रामभक्त गुरु गोविंदसिंह !
|
‘गुरु तेगबहादूर यांनी धर्मरक्षणार्थ प्राणार्पण केले. त्यांचे पुत्र श्रीराम भक्त, वीर पुरुष, खालसा पंथाचे संस्थापक आणि शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंह ! यांनीच शीख पंथाची पुनर्बांधणी केली. असे गुरु गोविंदसिंह हे श्रीरामभक्त कसे होते ? आणि त्यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
१. गुरु तेगबहादूर यांचा औरंगजेबाने शिरच्छेद करण्याची आज्ञा देणे
शिखांचे ९ वे गुरु तेगबहादूर यांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले. त्यांचा अतोनात छळ केला. तरीही त्यांनी हिंदु धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला नाही. मुसलमानांच्या अत्याचारासमोर त्यांनी आणि त्यांच्या ४ प्रिय शिष्यांनी शरणागती पत्करली नाही. विविध प्रकारचा छळ केल्यानंतरही जेव्हा गुरु तेगबहादूर मुसलमान धर्म स्वीकारण्यास सिद्ध होत नाहीत, हे पाहिल्यावर औरंगजेबाने त्यांच्याशी धर्मचर्चा करण्याचे नाटक केले. त्या वेळी गुरु तेगबहादूर यांनी औरंगजेबाला कुराणातील सत्य कथन करताच तो संतापला आणि त्याने गुरु तेगबहादूर यांचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. औरंगजेबाच्या सेवकांनी त्याच्या आज्ञेचे तात्काळ पालन केले. देहलीच्या चांदणी चौकात गुरुद्वारा सीसगंज हे भीषण सत्य सार्या जगाला आज सांगत आहे. गुरु तेगबहादूर यांना जिथे अग्नी दिला, तेथे रकाबगंज गुरुद्वारा आहे. तो इस्लामचे क्रौर्य आणि शिखांचे शौर्य याची साक्ष देत आहे. अशा इस्लामिक अत्याचार्यांशी दोन हात करण्यासाठी स्वतःच्या अनुयायांना बळ मिळावे, या हेतूने गुरु गोविंदसिंह यांनी शीख पंथात काही सुधारणा केल्या.
२. गुरु गोविंदसिंह यांनी ‘बचित्तर नाटका’द्वारे ते प्रभु रामचंद्राचे वंशज असल्याचे सांगणे
मुसलमान हिंदूंना शस्त्रबळावर धर्मांतर करण्यास भाग पाडतात, तसेच हिंदूंची संपत्ती लुटून नेतात आणि हिंदु स्त्रियांना पळवून नेतात. एखाद्या हिंदूने दुसर्या एखाद्या हिंदूला आश्रय दिला, तर त्या आश्रय देणार्या हिंदूला औरंगजेबाकडून फाशीची शिक्षा दिली जात असे. अत्यंत क्रूर असलेल्या शत्रूशी लढण्यासाठी शौर्य हवे. ते शौर्य आपल्या अनुयायांमध्ये निर्माण करण्याच्या हेतूने गुरु गोविंदसिंह यांनी १४ अध्यायांचे ‘बचित्तर नाटक’ लिहिले. हे नाटक म्हणजे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी आहे. या नाटकातील एका अध्यायात त्यांनी ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभु रामचंद्राचे आपण वंशज आहोत’, असे म्हटले आहे. या नाटकात त्यांनी श्रीरामाने केलेल्या लढायांचे वर्णन केले आहे. ‘श्रीरामाचे शौर्य आणि लढाऊबाणा यांचा वारसा कलियुगात सोढी अन् बेदी या दोन कुळांनी पुढे चालवला’, असे गुरु गोविंदसिंह यांनी लिहिले आहे. बेदी घराण्यात गुरुनानक, गुरु अंगददेव आणि गुरु अमरदास या शीख पंथाच्या पहिल्या ३ गुरूंचा जन्म झाला. त्यानंतरचे शीख पंथाचे पुढचे ७ गुरु अनुक्रमे गुरु रामदास, गुरु अर्जुनदेव, गुरु हरगोविंदराय, गुरु हरिराय, गुरु हरिकिशन, गुरु तेगबहादूर आणि गुरु गोविंदसिंह यांचा जन्म सोढी घराण्यात झाला.
३. गुरु गोविंदसिंह यांनी शिष्यांमध्ये लढाऊवृत्ती वाढवून धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी केलेली उपाययोजना
शीख संप्रदायात त्या वेळी संघर्ष करण्याची वृत्ती मंदावली होती. ‘मुसलमानांशी धर्मयुद्ध करण्याचा प्रसंग आला, तर त्यांच्याशी दोन हात करण्याची क्षमता असणारे वीर निर्माण होणार नाहीत’, याची काळजी त्यांना वाटली; म्हणून त्यांनी त्यांच्या शिष्यांमध्ये युद्धप्रियतेसह लढाऊवृत्ती निर्माण करण्याच्या हेतूने उपाय केले. गुरु गोविंदसिंह यांच्या शिष्यांना त्यांचे हे मत मान्य झाले नाही. त्यांनी गुरुदेवांची माता गुजरीदेवी यांना साकडे घातले आणि त्यांचे मन वळवण्याची विनंती केली. माता गुजरीदेवींनी गोविंदसिंह यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण काही उपयोग झाला नाही. ते त्यांच्या मातेला म्हणाले, ‘मी जे काही करत आहे ते धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी करत आहे. माझे पिता आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहे, तसेच गुरुनानक आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. त्यांनी केलेल्या संस्कारांप्रमाणे केवळ धर्मकार्य माझ्या दृष्टीपुढे आहे. ‘दुष्ट दुर्जनांचा नाश करून धर्माचे रक्षण करा’, अशी गुरु हरगोविंदजी यांची आज्ञा आहे. ती आज्ञा न पाळणे मला शक्य नाही. त्यांनी केलेली आज्ञा तंतोतंत पाळण्यासाठी दोन प्रकारच्या तलवारींची आवश्यकता आहे. एक धर्मरक्षणासाठी आणि दुसरी राष्ट्राच्या रक्षणासाठी तलवार आवश्यक आहे. अन्याय आणि अत्याचार सहन करण्यार्यांचा मला संताप येतो. तेवढ्यासाठीच मी आपल्या बांधवांना संघटित करत आहे. त्यांचे बळ वाढवत आहे. कुणीही आमची मानहानी करण्याचे धाडस करू नये, यासाठीच माझा हा प्रयत्न आहे.’
४. ध्येय साध्य करण्यासाठी गुरु गोविंदसिंह यांनी केलेला अभ्यास
गुरु गोविंदसिंह यांच्या आयुष्यातील वर्ष १६७५ ते १६९९ हा २ तपांचा काळ अनेक चरित्रकारांनी ‘उद्योगपर्व’ म्हणून अधोरेखित केला आहे. गुरु गोविंदसिंह यांची ज्ञानलालसा अमाप होती. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी ते कोणत्याही प्रकारचे कष्ट सोसण्यास तत्पर होते. त्यांनी या कालखंडात प्राचीन भारतीय संस्कृत भाषेतील श्रेष्ठ ग्रंथ जसे पुराणे, रामायण, महाभारत, अशा अनेक ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला. हा अभ्यास करतांना त्यांनी स्वाभिमान, शौर्य आणि पराक्रम यांची गाथा या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. त्यांनी काव्यरचनाही केल्या आहेत. पंजाबी आणि हिंदी अशा मिश्र भाषेत ते काव्यरचना करत. त्यांच्या काव्याचा विषय, म्हणजे श्रीरामाने रावणाचा आणि अन्य राक्षसांचा केलेला पराभव, श्रीकृष्णाने केलेला कंसाचा वध, कुरुक्षेत्रावर पांडवांनी केलेला दुष्टांचा संहार, दुर्गाभवानीची अद्भुत लीला अन् तिने महिषासुराचे केलेले पारिपत्य इत्यादी.
५. गुरु गोविंदसिंह यांनी ‘खालसा पंथा’ची स्थापना करणे
शत्रूचे पारिपत्य करण्यासाठीच त्यांनी ‘खालसा पंथा’ची स्थापना केली. ‘खालसा’ हा शब्द ‘खालिस’ या अरबी शब्दापासून आला आहे. ‘खालिस’ या शब्दाचा अर्थ आहे तावून-सुलाखून निघालेला अत्यंत शुद्ध ! खालसा स्थापन करण्यामागचा त्यांचा उद्देश ‘धर्मांध वृत्तीची इस्लामी राजवट नष्ट करणे’, हा होता. या खालसा पंथात त्यांनी पंचककारावर विशेष भर दिला असल्याचे आढळून येते. हे पंचककार पुढीलप्रमाणे आहेत –
अ. केस : ते कापू नयेत. केसांचे सदैव रक्षण करावे.
आ. कंगा : केस स्वच्छ रहावेत म्हणून कंगवा बाळगावा.
इ. कछ : शरीर संरक्षणासाठी छोटी विजार घालावी.
ई. कडा : प्रत्येक शिखाच्या हातात लोखंडी कडे असले पाहिजे.
उ. कृपाण : स्वरक्षणासाठी कृपाणासारखे छोटे शस्त्र प्रत्येक पुरुष किंवा स्त्रीने नेहमी जवळ बाळगावे.
प्रत्येक शिखाने अभिवादन करतांना ‘वाहे गुरूका खालसा’ (मी माझ्या गुरूंचा सत्शिष्य होण्याचा निर्धार केलेला एक अनुयायी आहे.) आणि याला उत्तर म्हणून दुसर्याने ‘वाहे गुरूकी फतेह’ (आपल्या गुरूंचा सर्वत्र विजय निश्चित आहे.), असे म्हणावे.
६. गुरु गोविंदसिंह यांनी रामकथांविषयीचे ‘गोविंद रामायण’ लिहिणे
गुरु गोविंदसिंह यांची रामभक्ती विलक्षण होती. त्यांनी अनेक प्रकारची काव्यरचना केली; पण त्यांना ‘श्री रामायण’ लिहिल्यानंतर पूर्ण समाधान झाले. ‘हिंदूंमधील सहिष्णुता आणि सदाचार यांचे सामर्थ्य वाढले, तर ते रामायणामुळेच वाढेल’, असा त्यांचा दृढ विश्वास होता. रामायणासारख्या ऐतिहासिक महाकाव्यामुळेच खालसा पंथाला बळकटी आली, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी विविध रामकथांचा पद्धतशीर अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी एक स्वतंत्र रामायण रचले. ‘तुलसी रामायण’, ‘शंकर रामायण’, ‘गिरीधर रामायण’ अशी रामायणाची त्या काळात नावे प्रचलित होती. त्या नावाप्रमाणेच त्यांनी स्वरचित रामकथेला ‘गोविंद रामायण’ असे नाव दिले.
त्यांनी लिहिलेल्या रामायणात एकूण २२ कथा आहेत. या कथांपैकी ७ कथा या युद्ध वर्णनाशी निगडित आहेत. युद्ध घटनांचे सविस्तर वर्णन त्यांनी या कथांमधून केले आहे. रामकथा लिहितांना त्यांनी रघुकुलातील महापुरुषांच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन केले नाही. त्यांनी श्रीराम ‘विष्णूचा सगुण अवतार’ म्हणून त्यांच्या कथेतून रंगवला नाही. ‘नराने आपल्या प्रयत्नाने अधर्माचा नाश करावा आणि नारायण बनावे’, हे त्यांना जनमानसावर ठसवायचे आहे. तो हेतू मनात ठेवूनच त्यांनी रामकथांचे लेखन केले आहे. ‘एकवचनी, परमप्रतापी, सर्वसामान्यांचा उद्धार करणारा, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा, दुष्टांना मारून अधर्माचा नाश करून धर्माची संस्थापना करणारा राम’, हाच अखिल मानवजातीचा आदर्श पुरुष आहे. ‘श्रीरामांचे हे रूप जनमानसात असावे’, या हेतूने त्यांनी रामकथा लिहिल्या आहेत.
७. गुरु गोविंदसिंह यांनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र रेखाटण्यामागील कार्यकारणभाव
शीख संप्रदायातील गुरूंचा इतिहास सहज डोळ्यांखालून घातला, तरी त्यांच्या वीरवृत्तीचा धागा श्रीरामांच्या कथेच्या आधारे अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न गुरु गोविंदसिंह यांनी केला. ‘गुरु गोविंदसिंह यांनी स्वकियांची झालेली हत्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे. या क्रौर्याचा नाश करण्यासाठी शौर्याची आवश्यकता आहे’, असा सिद्धांत मांडून त्यांनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र रेखाटले आहे. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन दुष्टांचा नाश करण्याचे सामर्थ्य गुरु गोविंदसिंह यांनी शिष्यांमध्ये निर्माण केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी विश्वकल्याणाचा संदेश दिला आहे. ‘दुष्टांचा नाश केल्यावाचून विश्वाचे कल्याण होणे शक्य नाही’, हे श्रीराम-कृष्णांची शिकवण रामकथा आणि श्रीकृष्णकथा यांतून गुरु गोविंदसिंह यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून साकारली आहे.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१७.१.२०२४)