पुणे येथे ‘आभासी मराठी साहित्य संमेलना’चे २० आणि २१ जानेवारीला आयोजन !
पुणे – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते आणि सुप्रसिद्ध कांदबरीकार कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली येथे २० आणि २१ जानेवारी या दिवशी ‘आभासी मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. भाषा संचालनालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण पिढीला मराठीकडे आकर्षित करण्यासाठी आयोजन केले आहे. उद्घाटन भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार आहे.
२० जानेवारीला श्री. खोत यांची मुलाखत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे घेणार आहेत. कवी महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागर बोलीचा : बोलीभाषा’ कवी संमेलनाचे आयोजन रात्री ८ वाजता होणार आहे. परिसंवाद, व्याख्यान, ‘काव्यवंदना’ हा विशेष कार्यक्रम, तसेच ‘साहित्य आणि कलेचा धर्म’ या विषयावर समारोपाचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत. रसिक श्रोते आणि नागरिक यांनी मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत होणार्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाषा संचालनालयाच्या मराठी भाषा विभागाच्या संचालक विजया डोनीकर यांनी केले आहे.