किकली (सातारा) येथे हिंदु महासभेच्या वतीने २१ आणि २२ जानेवारी या दिवशी भव्य कार्यक्रम !
सातारा, १९ जानेवारी (वार्ता.) – अखिल भारत हिंदु महासभा आणि श्रीराम ध्यानमंदिर, किकली, जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ जानेवारी या दिवशी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील सोहळ्याच्या औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारत हिंदु महासभेचे प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्तात्रय सणस यांनी दिली.
१. २१ आणि २२ जानेवारी यादिवशी जांब-किकली येथील श्रीराम ध्यानमंदिरात हा भव्य कार्यक्रम होणार आहे. २१ जानेवारी या दिवशी सकाळी ९ वाजता भजन महोत्सवाला प्रारंभ होणार असून किकली पंचक्रोशीतील भाविकांना नामवंत भजनी मंडळांच्या भजनांचा आनंद घेता येणार आहे.
२. २२ जानेवारी या दिवशी पहाटे ६ ते रात्री ९ या वेळेत प्रभु श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन आणि गंगापूजन करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत भजनांचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ ते १ या वेळेत अयोध्या येथे होणार्या श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येईल. दुपारी १ ते २ या वेळेत अखिल भारत हिंदु महासभेने श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याविषयी मान्यवर मनोगत व्यक्त करतील. यामध्ये हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. धनराज जगताप, कोल्हापूर येथील संजय कुलकर्णी, तसेच विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख कार्यवाह जितेंद्र वाडकर यांचा समावेश आहे.
दुपारी २ ते ३ यावेळेत मान्यवरांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मुक्तीलढ्यामध्ये योगदान दिलेल्या कारसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तरी जांब-किकली पंचक्रोशीतील समस्त श्रीरामभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.