रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पुणे महानगर समितीच्या वतीने १३ लाख कुटुंबांशी संपर्क !

श्रीराममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण आणि निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – अयोध्येतील २२ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे महानगर समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियानात पुणे शहर आणि परिसरात १३ लाख कुटुंबांशी संपर्क करण्यात आला, अशी माहिती पुणे महानगर समितीचे संयोजक प्रसाद लवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहसंयोजक अभिजित बर्वे, विश्व हिंदु परिषद पुणे महानगर (पूर्व भाग) मंत्री धनंजय गायकवाड उपस्थित होते.

लवळेकर पुढे म्हणाले की, गृहसंपर्क अभियानांतर्गत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने एकूण ३५ सहस्र ३८२ रामसेवकांनी सहभाग घेतला. त्यात १० सहस्र १७८ महिलांचा सहभाग आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीत संपूर्ण पुणे शहर आणि परिसरात गृहसंपर्क अभियान राबवण्यात आले.

२२ जानेवारीला समाजातील सर्व नागरिक, गृहनिर्माण संस्था, मंदिरे, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळे, संस्था, संघटना आणि विविध ‘कॉर्पोरेट कंपन्यां’कडूनही पूर्ण पुणे महानगरात ७ सहस्रांहून अधिक उत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे आणि परिसरातील विविध ५० पेक्षा अधिक मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली आहेत.