नागपूर येथे शिक्षण संस्था महामंडळाकडून ‘परीक्षांवर बहिष्कार’ आंदोलनाची हाक !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाळा उपक्रमाला विरोध !
नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांतील शिक्षण मिळण्यासाठी विविध उपक्रम शाळांत राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शिंदे यांनी ‘प्रिय विद्यार्थी मित्रांना’ या मथळ्याखाली पत्रही लिहिले. ज्या पत्रामध्ये त्यांनी ‘चांद्रयान-३’पासून, तर विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, शेती, डिजिटल रोबोटिक प्रयोगशाळा, कला-वाणिज्य यांसह विविध क्षेत्रांत पारंगत करणारे शिक्षण शाळांमधून देण्याविषयी सांगितले आहे. शिंदे यांनी ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियानही चालू केले; परंतु मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर शिक्षणसंस्था चालकांनी मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमांना विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. शिक्षण संस्था महामंडळाने ‘परीक्षांवर बहिष्कार’ या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षणसंस्थांकडून ‘परीक्षांवर बहिष्कार’ आंदोलन !
शिक्षकांनी म्हटले आहे की, राज्यात वर्ष २०१२ पासून शिक्षकभरती बंद आहे. विद्यार्थ्यांना शिकवायला त्या-त्या विषयातील पारंगत शिक्षकच उपलब्ध नाहीत. रोबोटिक टिंकरिग प्रयोगशाळेत ‘इलेक्ट्रॉनिक्स संगणक’ या विषयातील पदवीधर किंवा अभियंता झालेले शिक्षक देण्याची घोषणा केली; पण त्यांची नियुक्ती कुठेही केली नाही. त्या त्या विषयाचे शिक्षक शाळेत नसतांना विद्यार्थ्यांना मात्र भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. प्रयोगशाळा नाहीत, इमारती मोडकळीस आल्या आहेत. असे असतांना मुख्यमंत्र्यांचे पत्र आाणि हे अभियान जखमेवर मीठ चोळणारे आहे. अशी सर्व विदारक परिस्थिती असतांना ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात ५० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करणे, हे न पटणारे आहे. शासनाच्या अशा धोरणांमुळेच शिक्षण संस्था महामंडळाने ‘परीक्षांवर बहिष्कार’ आंदोलनाची हाक दिली आहे. |
संपादकीय भूमिका :शिक्षण क्षेत्रातील अनेक मूलभूत समस्यांवर उपाययोजना न काढल्यास चांगले विद्यार्थी कसे घडवणार ? |